राज्यातील कडक लॉकडाउनची तारीख ठरली? 'या' दिवसापासून होऊ शकतो 14 दिवसांचा लॉकडाउन

2lockdown_67.jpg
2lockdown_67.jpg

सोलापूर : राज्यात कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला असून आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. रुग्णवाढीच्या तुलनेत मृत्यूदर वाढू लागला आहे. 1 ते 10 एप्रिल या काळात राज्यात तब्बल चार लाख 88 हजार रुग्ण वाढले असून पावणेतीन हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर 17 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन होऊ शकतो, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. मात्र, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे एक-दोन दिवसांत अधिकृत घोषणा करणार आहेत. तत्पूर्वी, नागरिकांना जिवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी व परराज्यातील व राज्यातील विविध जिल्ह्यांमधील जे कामगार इतरत्र आहेत, त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी वेळ जाणार आहे.

ठळक बाबी...

  • मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, जालना, नांदेड व नागपुरात मृत्यूदर वाढला 
  • राज्यात दहा दिवसांत वाढले चार लाख 87 हजार 788 रुग्ण 
  • 1 ते 10 एप्रिल या काळात राज्यभरातील दोन हजार 740 रुग्णांना कोरोनाने घेतला बळी 
  • राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये मोठी रुग्णवाढ; दहा जिल्ह्यांमध्ये वाढू लागला मृत्यूदर 
  • नागरिकांना जिवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी तर कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठी दिला जाणार वेळ 
  • लॉकडाउन काळात लसीकरण सुरु राहण्याची शक्‍यता; उद्दिष्टानुसार प्रत्येक केंद्रांवर टोचली जाईल लस 
  • शेतकरी, कामगार, उद्योजकांसह सर्वसामान्य घटकांसाठी राज्य सरकार देईल विशेष पॅकेज 
  • शेतकऱ्यांना सध्या द्राक्ष, संत्रा, कलिंगड, टोमॅटो, कांदा यासह अन्य भाजीपाल्याची चिंता 
  • लॉकडाउनमध्ये शेतमाल विक्रीसाठी बळीराजाला हवीय शेतमाल विक्रीची सवलत 
  • 17 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून 30 एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचे नियोजन 
  • आठ दिवसांची की 14 दिवसांचा लॉकडाउन? ख्यमंत्री लवकरच जाहीर करणार तारीख

राज्यातील ठाणे, मुंबई, पुणे, नागपूर, रायगड, सोलापूर, नाशिक, जालना, नगर, जळगाव, नंदूरबार, औरंगाबाद, लातूर, नांदेड, बुलडाणा, भंडारा या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रूग्णवाढ आहे. सार्वजनिक वाहतूक सुरु असल्याने ये-जा करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. आता बहुतेक जिल्ह्यांमध्ये शनिवार, रविवार वगळता सोमवार ते शुक्रवार, जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी खंडीत होणे अशक्‍य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्‍त केले आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी शेतकरी, 12 बलुतेदार, उद्योजक, हातावरील पोट असलेल्यांसाठी सरकारने विशेष पॅकेज जाहीर करून लॉकडाउन करण्याची मागणी लावून धरली आहे. या पार्श्‍वभूमीवर आता ठाकरे सरकार काय सवलत अथवा अर्थसहाय करणार, याची उत्सुकता आहे. दरम्यान, लॉकडाउन हा अचानक केला जाणार नसून त्याची नागरिकांना काही दिवस अगोदर पूर्व कल्पना दिली जाणार आहे. त्यामुळे कोणीही बसस्थानक, रेल्वे स्थानकांसह अन्य ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

व्यापारी, शेतकऱ्यांचा विरोध कायम
23 मार्च 2020 नंतर तब्बल तीन ते चार महिने राज्यात लॉकडाउन करण्यात आला होता. आता व्यापार, उद्योग पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा लॉकडाउन केल्यास आर्थिक अडचणीत भर पडणार असून अनेकांसमोर अडचणींचा डोंगर उभारणार आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून शेतकऱ्यांसमोरील अडचणीही वाढल्या आहेत. आता शेतात अनेक पिके काढायला आली आहेत. त्यातच लॉकडाउन केल्यास हा शेतमाल विकायचा कुठे, या चिंतेत बळीराजा आहे. त्यामुळे निर्बंध कडक करा, परंतु सरसकट कडक लॉकडाउन नकोच, अशी भूमिका शेतकरी व उद्योजकांनी घेतली आहे. या घटकांना राज्य सरकार काय मदत करणार काय सवलत देणार, याकडेही लक्ष लागले आहे.

संकट दूर होण्यासाठी लॉकडाउनची गरज
कडक निर्बंध करूनही अनेकजण नियमांचे पालन करत नाहीत. मागील वर्षापासून नागरिकांना कोरोनाचे संकट दूर व्हावे म्हणून मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, स्वच्छता राखा असे आवाहन केले जात आहे. आता शनिवार, रविवारी बहुतांश जिल्ह्यांमध्ये संचारबंदी असून अन्य दिवशी जमावबंदी आहे. तरीही पोलिसांच्या कारवाईतून हे लक्षात येते की, अजूनही लोक नियम पाळत नाहीत. त्यामुळे कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी विषाणूची साखळी खंडीत होणे गरजेचे आहे. राज्याची स्थिती सुधारल्यानंतर सर्वच घटकांचे प्रश्‍न सुटतील आणि सर्व व्यवहार पुन्हा सुरळीत होऊ शकतात. त्यासाठी 15 दिवसांचा लॉकडाउन गरजेचा आहे, असे मत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत व्यक्‍त केले आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोध विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com