'अंतिम' परीक्षा 31 ऑक्‍टोबरपर्यंत अशक्‍यच ! तांत्रिक अडचणींसह उत्सव, पाऊस, 'सीईटी'चा अडथळा

212SPPU_Students_20_20Copy_20_20Copy.jpg
212SPPU_Students_20_20Copy_20_20Copy.jpg

सोलापूर : अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या सुरवातीलाच परतीचा पाऊस, सर्व्हर क्रॅश, नेटवर्क प्रॉब्लेम, ऑनलाईनमधील तांत्रिक अडचणींमुळे नियोजित वेळापत्रकात बदल करण्याची नामुष्की विद्यापीठांवर ओढावली आहे. तर 21 ते 23 ऑक्‍टोबरला बीएड, बीपीएड, एमसीए, एमएडसह अन्य अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा आहेत. त्यामुळे विद्यापीठांसमोर नवा पेच निर्माण झाला असून अंतिम वर्षाच्या परीक्षेला 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी, अन्यथा सीईटी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यापीठांनी शासनाकडे केली आहे.


राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून अनेक जिल्ह्यांमधील वीज खंडीत झाली आहे. तर पावसामुळे मोबाइल नेटवर्कही कमी झाल्याचे चित्र आहे. हवामान खात्याने दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच सीईटीची परीक्षा ऑक्‍टोबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहेत. त्यामुळे सोलापूर, जळगाव, पुणे विद्यापीठासह अन्य विद्यापीठांचे नियोजित वेळापत्रक विस्कटले आहे. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पावसामुळे 14 आणि 15 ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या परीक्षा 19 व 20 ऑक्‍टोबरला घेण्याचे नियोजन केले आहे. तर नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास परीक्षा पुढे ढकलावी लागेल, तशी मागणी शासनाकडे केली जाईल, अशी माहिती प्र- कुलगुरु डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.


विद्यापीठांनी दिला शासनाला अहवाल
राज्यातील बीएड, बीपीएड, एमसीएसह अन्य अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा 21 ते 23 ऑक्‍टोबरला होणार आहे. पुढील अभ्यासक्रमाचा प्रवेश निश्‍चित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ती परीक्षा देणे अनिवार्य आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंतिम वर्षाची परीक्षा 31 ऑक्‍टोबरपर्यंत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे शासनाने सीईटीची परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी केल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठापीठचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी सांगितले. तर 31 ऑक्‍टोबरपर्यंत नव्हे तर 10 नोव्हेंबरपर्यंत परीक्षा घ्याव्या लागतील, असे पुणे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. महेश काकडे यांनी स्पष्ट केले. त्याबाबतचा शासनाला सर्वच विद्यापीठांनी अहवाल दिला आहे. आता शासनाने निर्णय घ्यावा, असेही विद्यापीठांनी स्पष्ट केले आहे. 


ठळक बाबी...

  • मराठवाडा विद्यापीठाने उस्मानाबाद जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलली
  • नाशिक, नगर आणि पुणे, सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा; परीक्षेचे नियोजन बदलले
  • 17 तारखेला घटस्थापना, 25 तारखेला दसरा अन्‌ 30 तारखेला ईदनिमित्त पुणे विद्यापीठ देणार सुट्टी
  • अतिवृष्टीमुळे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पुढे ढकलली परीक्षा
  • सीईटीमुळे 21 ते 23 ऑक्‍टोबरचे पेपर 1 ते 12 नोव्हेंबरपर्यंत घेण्याचे जळगाव विद्यापीठाचे नियोजन
  • 31 ऑक्‍टोबरपर्यंत सर्वच विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे अशक्‍य; विद्यापीठांनी मागितली 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
  • 'सीईटी'ला पुणे विद्यापीठाचे सहा हजार विद्यार्थी; त्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा होणार शेवटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com