अंतिम वर्षाची 5 ते 28 ऑक्‍टोबरदरम्यान परीक्षा ! महाविद्यालये अन्‌ पुढील परीक्षा "या' दिवशी होणार सुरू 

तात्या लांडगे 
Saturday, 26 September 2020

विद्यापीठ अनुदान आयोगाने 31 ऑक्‍टोबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून 1 नोव्हेंबरपासून पहिल्या सेमिस्टरचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना विद्यापीठांना दिल्या आहेत. तिथून चार महिन्यांत 5 एप्रिलपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करावा. 1 ते 8 ऑगस्ट 2021 पर्यंत परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी सुटी द्यावी. 9 ते 21 ऑगस्टपर्यंत अंतिम वर्षाची परीक्षा घ्यावी. 30 ऑगस्ट 2021 पासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरवात करावी, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. तत्पूर्वी, यंदाची अंतिम वर्षाची परीक्षा 5 ते 28 ऑक्‍टोबरदरम्यान होणार आहे. 

सोलापूर : विद्यापीठ अनुदान आयोगाने 31 ऑक्‍टोबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून 1 नोव्हेंबरपासून पहिल्या सेमिस्टरचे वर्ग सुरू करण्याच्या सूचना विद्यापीठांना दिल्या आहेत. तिथून चार महिन्यांत 5 एप्रिलपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण करावा. 1 ते 8 ऑगस्ट 2021 पर्यंत परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी सुटी द्यावी. 9 ते 21 ऑगस्टपर्यंत अंतिम वर्षाची परीक्षा घ्यावी. 30 ऑगस्ट 2021 पासून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरवात करावी, असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. तत्पूर्वी, यंदाची अंतिम वर्षाची परीक्षा 5 ते 28 ऑक्‍टोबरदरम्यान होणार आहे. 

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने यंदा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घरबसल्या ऑनलाइन घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी बहुपर्यायी प्रश्न पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. अंतिम सत्राची परीक्षा आणि बॅकलॉग विद्यार्थ्यांचीही परीक्षा ऑनलाइनच घेतली जाणार आहे. जे विद्यार्थी अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रात होते, ते सर्व विद्यार्थी बॅकलॉग विषयांची परीक्षा देऊ शकतात. मात्र, त्यासाठी त्यांनी विद्यापीठाकडे अर्ज केलेले असावेत, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. ऑनलाइन परीक्षा सुरू असता नेटवर्क गेल्यास परीक्षा खंडित होऊ शकते. परंतु, प्रत्येक पेपर हा 90 मिनिटांचा असणार आहे. मोबाईलचे नेटवर्क गेल्यास पाच तासांत कधीही पेपर सोडविण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. पेपर संपल्यानंतर आठवड्यात निकाल लावण्याची तयारी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केली आहे. 

विद्यार्थ्यांनो, असे करा परीक्षेसाठी लॉग इन 
परीक्षेसाठी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा पोर्टल बनविले आहे. या पोर्टलचे लॉग इन विद्यार्थ्यांच्या ई-मेल तथा मोबाईलवर मेसेजद्वारे 29 सप्टेंबरपर्यंत पाठविले जाणार आहेत. लॉग इन न मिळाल्यास www.pahsu.org या पोर्टलवरून स्वत:चा पीआरएन क्रमांक टाकून आणि मोबाईल ओटीपीच्या माध्यमाने पासवर्ड रिकव्हर करता येणार आहे. हा पीआरएन नंबरच विद्यार्थ्याचा युजर नेम असणार आहे. 5 ते 28 ऑक्‍टोबरदरम्यान परीक्षा घेतली जाणार असून, आठवड्यात निकाल जाहीर केला जाणार आहे. 

ठळक बाबी... 

  • ऑनलाइन परीक्षा न देणाऱ्या विद्यार्थ्यांची नियोजित वेळेतच होणार ऑफलाइन परीक्षा 
  • ऑफलाइन परीक्षा घेण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची असणार 
  • विद्यापीठातर्फे महाविद्यालयांना "ओएमआर शीट्‌स' देण्यात येतील; उत्तरपत्रिका तपासणीनंतर लगेच निकाल 
  • अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा प्रोजेक्‍ट, सेमिनार, वर्कशॉप, डेझरटेशनद्वारे महाविद्यालये घेतील 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The final year exams will be held from October 5 to 28