मोठी ब्रेकिंग ! अंतिम वर्षाची 'अशी' होणार परीक्षा; विद्यापीठाने घेतला निर्णय 

तात्या लांडगे
Saturday, 29 August 2020

दरवर्षी परीक्षा घेताना तीन बेंचवर सहा विद्यार्थी बसविले जातात. मात्र, सध्या कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने दोन हाताचे अंतर ठेवणे बंधनकारक आहे. या पार्श्‍वभूमीवर तीन बेंचवर एकच विद्यार्थी बसू शकणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईनची सुविधा उपलब्ध आहे, अशा विद्यार्थ्यांना घरबसल्या परीक्षा देता येणार आहे.

सोलापूर : अंतिम वर्षाच्या परीक्षेचा तिढा सुटल्यानंतर आता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन सुरु केले आहे. विद्यापीठाशी संलग्नित 108 महाविद्यालयांमध्ये तब्बल 22 हजार विद्यार्थी अंतिम वर्षात आहेत. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग ठेवून त्यांची परीक्षा घेणे अशक्‍य असल्याने त्यापैकी 60 टक्‍के विद्यार्थ्यांची ऑनलाइन तर 40 टक्‍के विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइन घेतली जाईल, अशी माहिती परीक्षा नियंत्रक श्रेणिक शहा यांनी दिली. दरम्यान, महाराष्ट्र  राज्यातील सर्वच जिल्ह्यांमधील कोरोनाची स्थिती विचारात घेऊन प्रत्येक विद्यापीठ आपापल्या स्तरावर निर्णय घेणार असल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

दरवर्षी परीक्षा घेताना तीन बेंचवर सहा विद्यार्थी बसविले जातात. मात्र, सध्या कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने दोन हाताचे अंतर ठेवणे बंधनकारक आहे. या पार्श्‍वभूमीवर तीन बेंचवर एकच विद्यार्थी बसू शकणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईनची सुविधा उपलब्ध आहे, अशा विद्यार्थ्यांना घरबसल्या परीक्षा देता येणार आहे. मात्र, त्यासाठी विद्यापीठाकडून 'प्रॉक्‍टरिंग' या नव्या प्रणालीचा वापर केला जाईल, अशीही माहिती देण्यात आली. तत्पूर्वी, न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकार राज्यातील कोरोना संसर्गाची स्थिती विद्यापीठ अनुदान आयोगाना कळवेल. आयोगाकडून परीक्षेचा कालावधी निश्‍चित करुन दिल्यानंतर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल, असेही शहा म्हणाले.

 

'प्रॉक्‍टरिंग' प्रणाली अशी आहे... 
घरबसल्या ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या 50-60 विद्यार्थ्यांवर कंट्रोल ठेवण्यासाठी एक स्वतंत्र पर्यवेक्षक दिला जाणार आहे. संगणकाद्वारे संबंधित पर्यवेक्षक तीन तासापर्यंत त्या विद्यार्थ्यांवर वॉच ठेवतील. या नव्या प्रणालीद्वारे त्या विद्यार्थ्याची हालचाल, अनावश्‍यक हालचाल, सभोवतालचा वेगळा आवाज ओळखता येतो. त्या विद्यार्थ्यांजवळ दुसरा व्यक्‍ती आल्यास त्याची माहिती मिळू शकणार आहे. पेपर दिल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांच्या हालचालीवरुन त्याची विश्‍वासार्हता निश्‍चित केली जाईल. त्यानुसार त्या विद्यार्थ्याच्या विश्‍वासर्हतेच्या 80 टक्‍के गुण दिले जातील. ही प्रणाली बहुतांश विद्यापीठांकडून वापरली जाईल, असेही सांगण्यात आले. 

 

कोरोनाची स्थिती जाणून करावे नियोजन

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आता विद्यापीठाने एकच परीक्षा पध्दत अवलंबून परीक्षा घ्यायला हवी. ऑनलाइन परीक्षा घेणे शक्‍य नसल्याचे चित्र आहे. शहर-जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती जाणून विद्यापीठाने परीक्षेचे नियोजन करावे. 
- डॉ. आबासाहेब देशमुख
, अध्यक्ष, प्राचार्य संघटना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Final year online and offline exams; The decision was made by universities