मोठी बातमी! अंतिम वर्षातील "एवढी' मुले म्हणताहेत परीक्षा नको! 

तात्या लांडगे
Saturday, 11 July 2020

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने अंतिम वर्षातील बीए, बीकॉम, बीएससी, एमए, एमकॉम, एमएससी यासह अन्य पारंपरिक अभ्यासक्रमांसाठी असलेल्या विद्यार्थ्यांना गुगल फॉर्म दिले. त्यानुसार 11 हजार 400 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन संमतिपत्र देत परीक्षाऐवजी ग्रेडचा पर्याय निवडला. तर सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी दर्शविली. 

सोलापूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने यंदा प्रथम, द्वितीय व अंतिम वर्षातील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अंतिम वर्षातील परीक्षेचा पेच अद्याप संपला नसून, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांमुळे राज्य सरकार तोंडघशी पडले आहे. तत्पूर्वी, सोलापूरसह अन्य विद्यापीठांनी पारंपरिक अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची मते जाणून घेतली. त्यानुसार ग्रेडचा पर्याय 89 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी मान्य केल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा : शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान न दिल्यास पायी दिंडी 

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने अंतिम वर्षातील बीए, बीकॉम, बीएससी, एमए, एमकॉम, एमएससी यासह अन्य पारंपरिक अभ्यासक्रमांसाठी असलेल्या विद्यार्थ्यांना गुगल फॉर्म दिले. त्यानुसार 11 हजार 400 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन संमतिपत्र देत परीक्षाऐवजी ग्रेडचा पर्याय निवडला. तर सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी दर्शविली. मात्र, संमतिपत्रानुसार आगामी काळातील परिस्थितीस तथा नुकसानीस विद्यार्थी स्वत: जबाबदार असतील, विद्यार्थ्यांनी पालकांना विचारून निर्णय घ्यावा, असे काही प्रश्‍न दिले होते. मात्र, दोन्हींपैकी कोणताच पर्याय न निवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा निर्णय, जोपर्यंत ते विद्यापीठ तथा संबंधित महाविद्यालयाकडे एक पर्याय निवडत नाहीत, तोपर्यंत प्रलंबित ठेवला जाणार आहे. 

हेही वाचा : आनंदाची बातमी; चार दिवसात उजनी धरण येणार "प्लस'मध्ये 

कोणताच पर्याय न निवडलेल्यांचा निर्णय राहणार पेंडिंग 
याबाबत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विकास घुटे म्हणाले, राज्य सरकारच्या 29 जूनच्या परिपत्रकानुसार पांरपरिक अभ्यासक्रमास असलेल्या अंतिम वर्षातील सुमारे 20 हजार विद्यार्थ्यांपर्यंत संमतिपत्राचे अर्ज ऑनलाइन पोच करण्यात आले. त्यामध्ये 11 हजार 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेत त्यापैकी सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्याचा पर्याय निवडला आहे. तर सुमारे नऊ हजार विद्यार्थ्यांनी काहीच उत्तर दिलेले नाही. अशा विद्यार्थ्यांपर्यंत महाविद्यालयांच्या माध्यमातून पोचण्याचा प्रयत्न आहे. 

ठळक बाबी... 

  • 29 जूनच्या शासन निर्णयानुसार विद्यापीठाने पारंपरिक अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाचा तयार केला निकाल 
  • विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णयानुसारही विद्यापीठाने ठेवली परीक्षा घेण्याची तयारी 
  • व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेबाबत राज्य सरकारचे तोंडावर बोट; "यूजीसी'च्या निर्णयानुसार द्यावी लागेल परीक्षा 
  • कोव्हिड-19 च्या विलगीकरण सेंटरसाठी इमारती, हॉस्टेल अडकल्याने परीक्षेचा विद्यापीठांसमोर निर्माण झाला पेच 
  • राज्य सरकारचा निर्णय अन्‌ "यूजीसी'च्या मार्गदर्शक सूचनांमुळे विद्यार्थी संभ्रमात; संमतिपत्राबाबत नो कमेंट 
  • संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Final year students are saying dont want exams