Budget 2023 : गरजू घटकांच्या कल्याणासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात सहा पटीने आर्थिक तरतूद

नियोजन विभागाकडून विविध घटकांसाठी २५० कोटी रूपयांची तरतूद
financial provision of Rs 250 crores municipal budget for welfare of needy
financial provision of Rs 250 crores municipal budget for welfare of needySakal
Updated on

यंदा आर्थिक वर्ष २०२३-२०२४ साठी महानगरपालिका प्रशासनाने गरजू समाज घटकांच्या कल्याणासाठी मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल सहा पट अधिक तरतूद करुन आपल्या अर्थसंकल्पाला सामाजिक चेहरा देण्याचा असल्याचे दाखवून दिले आहे.

महानगरपालिका प्रशासनाने आपल्या नियोजन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱया वेगवेगळ्या योजनांसाठी भरीव तरतूद केली आहे. विशेष म्हणजे, आर्थिक वर्ष २०२२-२०२३ मध्ये नियोजन खात्याच्या निरनिराळ्या योजनांसाठी ४० कोटी ३८ लाख रुपयांची तरतूद केली होती, ही तरतूद यंदा सुमारे सहा पटीने वाढवून आर्थिक वर्ष २०२३-२०२४ साठी एकूण २५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

यामुळे नियोजन विभागाची वाटचाल आता एका नवीन पर्वाकडे होत आहे, अशी माहिती सहायक आयुक्त (नियोजन) प्रशांत सपकाळे यांनी दिली. आर्थिकदृष्टया दुर्बल घटक जसे की, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी यांच्या सामाजिक कल्याणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून काम करत असते.

महिलांचा जीवनस्तर उंचावणे व त्यांचे सक्षमीकरण यासाठी महानगरपालिका नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन ठेवून वेगवेगळ्या मार्गाने मदत करत असते. जेंडर बजेट अंतर्गत महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा, त्यांचे जीवनमान उंचावणे शक्य व्हावे, विकास कामांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग लाभावा, यासाठी निरनिराळ्या योजना राबविल्या जातात.

महिला बचत गटांची संख्या वाढावी व एकत्रित सहभागातून त्यांची आर्थिक उन्नती व्हावी, या दृष्टीने ११. ६५ कोटी रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. प्रति महिला बचतगट अनुदानाची रक्कम वाढवून ती जास्तीत-जास्त रुपये ५०,०००/- इतकी करण्यात आली आहे. दीनदयाळ अंत्योदय योजने अंतर्गतच्या बचत गटाला अतिरिक्त भांडवलाची रक्कम वाढवून रुपये ३५,०००/- इतकी करण्यात आली आहे. महिला बचत गटांना व्यवसायासाठी वरील व्याजावर अनुदान देण्यात येईल.

महिलांसाठी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत १०० कोटी ९१ लाख रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे. शिवणयंत्र, घरघंटी, मसाला कांडपयंत्र व अगरबत्ती बनविण्याचे यंत्र इत्यादींचा समावेश आहे. तसेच निराधार आणि दुर्बल घटकातील उच्च शिक्षण घेणाऱया मुली व महिला यांना परदेशी शिक्षणासाठी व्हिजा तसेच तत्सम परवान्याकरिता अर्थसहाय्य यांचा देखील यामध्ये समावेश आहे.

महिलांना स्वयंरोजगारासाठी ई-बाईक व मालवाहक ई-रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य, जिल्हास्तरीय खेळाडू एकरकमी प्रोत्साहन अशा योजनांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. दिव्यांग व्यक्तिंसाठी अर्थसहाय्य करतानाच या योजनेअंतर्गत २५ कोटी ३२ लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. बेस्ट बसेसमधून मोफत प्रवास, स्कूटर खरेदीसाठी अर्थसहाय्य, स्वयंरोजगारासाठी यंत्रसामुग्री खरेदीकरीता अर्थसहाय्य व ज्येष्ठ दिव्यांग व्यक्तिंसाठी एकरकमी अर्थसहाय्य देणे, अशा योजनांचा त्यात समावेश करण्यात आला आहे.

कोणत्या घटकासाठी किती तरतूद ?

  • तृतीय पंथीयांसाठी अर्थसहाय्यः २ कोटी

  • ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्थसहाय्यः ११ कोटी ३५ लाख रुपये

  • महिलांसाठी प्रशिक्षणः ६ कोटी ४४ लाख रुपये

  • महिला बचतगटांचे आधारकेंद्रः ११ कोटी ८८ लाख रूपये

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.