Maharashtra Budget 2019 : कोणत्या क्षेत्रासाठी किती तरतूद?

टीम ई-सकाळ
मंगळवार, 18 जून 2019

- राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आल्या महत्त्वपूर्ण तरतूदी.

- विविध क्षेत्राच्या दृष्टीने घेण्यात आले निर्णय.

मुंबई : राज्य सरकारचा शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज (मंगळवार) विधिमंडळात सादर करण्यात आला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत 2019-20 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर झाला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. 

राज्य सरकारच्या या अर्थसंकल्पात कृषी, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण क्षेत्रासह विविध तरतूदी करण्यात आल्या. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागासाठी साडेसोळा हजार कोटी, कृषी सिंचन योजनेसाठी 2 हजार 720 कोटी, कृषी विद्यापीठांसाठी 600 कोटी, दुष्काळासाठी साडेचार हजार कोटी तसेच दिव्यांगांना घरकुल योजनेसाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली. 

राज्याच्या अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे : 

- सार्वजनिक बांधकाम विभाग : 

सार्वजनिक बांधकाम क्षेत्रासाठी विविध महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. यामध्ये दिव्यांगांना घरकुल योजनेसाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली. राज्य सरकारच्या माध्यमातून 80 टक्के दिव्यांगांना घरे बांधून देण्यात येणार आहे. रस्ते विकासासाठी चार हजार 245 कोटींची तरतूद करण्यात आली. सायन-पनवेल मार्गावर खाडी पुलासाठी 775 कोटी रुपयांची तरतूद यामध्ये करण्यात आली. तसेच 3 लाख कोटींच्या रस्ते बांधणीला मंजुरी देण्यात आली. मुंबईत अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. 

- कृषी क्षेत्र : 

कृषी सिंचन योजनेसाठी 2 हजार 720 कोटींची तरतूद करण्यात आली असून, बळीराजा योजनेसाठी 1 हजार 530 कोटींची तरतूद करण्यात आली. बळीराजाचे जीवनमान उंचावण्याचे सरकारचे ध्येय असून, गेल्या 4 वर्षांत 140 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधीही देण्यात आला असून, जलयुक्त शिवार योजनेसाठी 8 हजार 946 कोटींचा निधी दिला असल्याचे अर्थमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

- शिक्षण क्षेत्र :  

राज्य सरकारच्या या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये कृषी क्षेत्राशी आधारित शिक्षणासाठी सरकारकडून योजना सुरु करण्यात येणार आहेत. राज्यातील चार कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी 600 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना फीमध्येही सवलत देण्यात आली आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

- इतर तरतूदी : 

- बळीराजा योजनेसाठी 1 हजार 530 कोटींची तरतूद-

- चंद्रपूर, जामखेड, यवतमाळ, पेठ येथे अन्न व कृषी विद्यालयांना मान्यता

- काजू उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली.

- राज्यातील वस्त्रोद्योग प्रकल्पांना 10 टक्के अर्थसहाय्य देण्यात आले.

- एसटी स्थानकांच्या नूतनीकरणासाठी 136 कोटींची तरतूद

- एसटी विभागाला 700 बसेस खरेदीसाठी 160 कोटींची तरतूद

- तिर्थक्षत्रांच्या बस स्थानकांच्या नूतनीकरणासाठी 100 कोटींचा निधी

-  जे. जे. स्कूल ऑफ आर्टससाठी 150 कोटींची तरतूद

- 75 हजार कृषीपंपाना वीज जोडणी देण्याचा उद्दिष्ट 

- क्रीडा विभागासाठी विशेष धोरणांची तरतूद वर्ध्यातील गांधी आश्रमासाठी 50 कोटींची तरतूद

- विधवा, घटस्फोटित महिलांसाठी स्वयंरोजगार योजनेसाठी 200 कोटींची तरतूद

-  इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांसाठी 36 विश्रामगृहे उभारणार

- धनगर समाजाच्या विकासासाठी 100 कोटींची तरतूद

- शबरी आदिवासी घरकूल योजनेसाठी 500 कोटींची तरतूद

- ओबीसी महामंडळासाठी 200 कोटींची तरतूद.

- अल्पसंख्यांक तरुण महिलांना रोजगार देण्यासाठी 100 कोटींची तरतूद

- आदिवासी विकास विभागासाठी 10 हजार 705 कोटींची तरतूद.

- महिला सुरक्षितता पुढाकारासाठी 225 कोटी

- ग्रामीण भागातील कोतवालांच्या मानधनात 50 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ. तसेच 40 टक्के पदे कोतवालांसाठी राखीव ठेवणार

- 10 आणि 12 नापास विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना राबविणार

- विधी आणि न्याय विभागासाठी 2775 कोटींची तरतूद

- आरोग्य योजनांसाठी 10581 कोटींची तरतूद.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Financial Provisions For Various Sectors in Maharashtra Budget