पोलिस भरतीसाठी प्रथम ५० गुणांची मैदानी चाचणी! १ जागेसाठी १० जणांची लेखीसाठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी
पोलिस भरतीसाठी प्रथम ५० गुणांची मैदानी चाचणी! १ जागेसाठी १० जणांची लेखीसाठी निवड

पोलिस भरतीसाठी प्रथम ५० गुणांची मैदानी चाचणी! १ जागेसाठी १० जणांची लेखीसाठी निवड

सोलापूर : राज्यभरात पोलिसांची १४ हजार ९५६ पदे भरली जाणार आहेत. त्यात सोलापूर शहरातील ९८ तर ग्रामीणमधील २६ पदांचा समावेश आहे. या परीक्षेत पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार असून, त्यानंतर लेखी चाचणी होईल. नोव्हेंबर महिन्यातच अर्ज भरायला सुरुवात होणार आहे.

तीन वर्षांपासून न झालेली पोलिस भरती आता होत आहे. एकूण पदांसाठी अंदाजित १५ लाखांपर्यंत अर्ज येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान (महा-आयटी) विभागाने स्वतंत्र संकेतस्थळ विकसीत केले आहे. त्यावर पुढील महिन्यात अर्ज भरायला सुरवात होईल. साधारणत: राज्याच्या २९ शासकीय विभागांमध्ये पावणेतीन लाख पदे रिक्त असतानाही मागील सहा वर्षांत पदभरतीच झाली नाही. तसेच कोरोना काळात बऱ्याच तरूणांची वयोमर्यादा संपली असल्याने या भरतीत वयोमर्यादा वाढण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. तलाठी भरतीदेखील याच काळात होणार असल्याने एका उमेदवाराला दोन्ही परीक्षा देताना अडचणी येणार आहेत. पण, तरूणांनी पोलिस भरतीची जय्यत तयारी सुरु केली आहे. ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना पोलिस भरतीत वाव मिळावा म्हणून पहिल्यांदा मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. मैदानी चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर लेखी चाचणी होईल आणि त्यानंतर गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांची निवड होईल.

भरतीसंबंधी ठळक बाबी...

  • - नोव्हेंबरमध्ये अर्ज भरायला सुरवात; डिसेंबरमध्ये भरती प्रक्रिया

  • - पहिल्यांदा ५० गुणांची मैदानी चाचणी होईल आणि नंतर १०० गुणांची लेखी परीक्षा

  • - मैदानीमधून एका पदासाठी उत्तीर्ण झालेल्या १० जणांची लेखीसाठी होईल निवड

  • - मुंबईत सर्वाधिक सहा हजार ७४० जागा तर सोलापूर शहर-जिल्ह्यात १२४ जागा

जात प्रवर्गनिहाय ‘अशा’ असतील जागा

राज्याच्या या पोलिस भरतीत अनुसूचित जातीसाठी एक हजार ८११, अनुसूचित जमातीसाठी साडेतेराशे, विमुक्ती जाती (अ) प्रवर्गासाठी ४२६, भटक्या जमातीसाठी (ब) ३७४, भटक्या जमाती (क)साठी ४७३, भटक्या जमाती ‘ड’साठी २९२ जागा असतील. तसेच विमुक्त मागास प्रवर्गासाठी २९२, इतर मागास प्रवर्गासाठी दोन हजार ९२६, ‘ईडब्ल्यूएस’साठी एक हजार ५४४ आणि खुल्या प्रवर्गासाठी पाच हजार ४६८ जागा राखीव असतील.