अगोदर कोरोनाला घालवतो मग राष्ट्रवादीतील नाराजी दूर करतो 

प्रमोद बोडके
Sunday, 26 July 2020

गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यासह इतर ज्येष्ठ नेत्यांची पवार यांच्यासोबत भेट होऊ शकली नाही. शासकीय विश्रामगृहाच्या बाहेरच या नेत्यांना अडविण्यात आले होते. आम्हाला आत सोडा यासाठी या नेत्यांनी पालकमंत्री भरणे यांना वारंवार भ्रमणध्वनी केला. त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळे आमची पवार यांच्यासोबतची भेट झाली नाही असा आरोप या ज्येष्ठ नेत्यांनी केला होता. 

सोलापूर : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे सरकार आहे. राज्यातील सरकारप्रमाणेच जिल्ह्यात काम करतानाही आम्ही एकत्रित मिळून काम करत आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मी सर्वांचे फोन घेतो, बैठकीत असल्यावर कसा फोन घेणार?, बैठक संपल्यानंतर मी त्या व्यक्तींना परत फोन करत असल्याची माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आज दिली.

सध्या कोरोनाचे संकट महत्त्वाचे आहे. हे संकट अगोदर संपवू त्यानंतर महाविकास आघाडीतील पक्षाच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीतील नाराज मंडळींचा गैरसमज दूर करू असा विश्‍वास पालकमंत्री भरणे यांनी आज व्यक्त केला. कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, मोहोळचे आमदार यशवंत माने, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आरोपावर उत्तर देताना पालकमंत्री भरणे म्हणाले, पक्षाध्यक्ष पवार आणि सोलापूर हे नाते जिव्हाळ्याचे आहे. सोलापूरचे आपण काही तरी देणे लागत असल्याने पवार यांनी सोलापुरातील कोरोना स्थितीची आढावा बैठक घेतली. या दौऱ्यात फक्त लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे पदाधिकारी यांनाच बोलविण्यात आले होते. इतर कोणालाही या दौऱ्यात आपण भेटणार नसल्याचे पक्षाध्यक्ष पवार यांनी सांगितले होते. त्यानुसारच आपण मोजक्‍या व्यक्तींना निरोप दिल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले. सोलापुरातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळे कोरोनाचा संकट दूर झाल्यानंतर या सर्व नेत्यांची एकत्रित बैठक घेऊन त्यांचा गैरसमज आपण दूर करणार असल्याचेही पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First he expels Corona, then he removes the resentment of the NCP