"सिव्हिल' मधील नव्या वॉर्डासाठी पाचशे कर्मचाऱ्यांची गरज 

प्रमोद बोडके
Saturday, 18 July 2020

नव्या वॉर्डाची पाहणी आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी केली. जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, बी ब्लॉकमध्ये 20 बेड आयसीयू आणि 80 बेड ऑक्‍सिजन सुविधेने विकसित करण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्‍यक असणारे फेरबदल करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुरू आहे. हे काम गतीने पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत.

सोलापूर : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी सर्वोपचार रुग्णालयातील (सिव्हिल हॉस्पिटल) बेडची संख्या वाढवण्यात येणार आहे. या नव्या वॉर्डमध्ये उपचारासाठी सुमारे पाचशे डॉक्‍टर, कर्मचारी, नर्सची आवश्‍यकता आहे. हे मनुष्यबळ उपलब्ध करून त्यांना आवश्‍यक ते प्रशिक्षण देण्याची सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली आहे. 

कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यासाठी सोलापूर शहरातील बेडची संख्या वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. सिव्हिल हॉस्पिटलच्या बी आणि सी ब्लॉकमध्ये काही बेड वाढवता येतात का? याबाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी संबंधितांशी चर्चा केली होती. त्यानुसार तेथे आणखी 100 बेड वाढवण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने काम सुरू आहे. या कामाची प्रगती पाहण्यासाठी श्री. शंभरकर आणि श्री. शिवशंकर यांनी आज भेट दिली. यावेळी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष शेलार, डॉ. राजेश चौगुले आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five hundred staff needed for the new ward in "Civil"