दहा दिवसात पाच हजार अँटिजेन टेस्ट 

प्रमोद बोडके
Thursday, 16 July 2020

रेमडेसिवीर, टॉसिलिझुमाब, आयटोलिझुमाब सोलापुरात 
कोरोनाबाधित रुग्णांसाठी रेमडेसिवीर, टॉसिलिझुमाब आणि आयटोलिझुमाब ही इंजेक्‍शन सोलापूर शहरासह बार्शी येथे उपलब्ध आहेत. सोलापुरात बलदवा इंटरप्रायजेस (संपर्क-0217-2624074, 9822072130), अश्विनी औषध भांडार (0217-2319900, 9689540365), सीएनएस मेडिकल (8888843673), हुमा फार्मा आणि सर्जिकल्स (9960445558), केशवाह फार्मसी (9765999855, 9049998919), श्री मार्कंडेय औषधी भांडार (0217-2721320, 9822441381), यशोधरा फार्मसी (0217-2323001, 8888049390) आणि श्री महालक्ष्मी मेडिकल, बार्शी (02184-224003, 9420754003) येथे हे इंजेक्‍शन असल्याची माहितीही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात येत्या दहा दिवसात पाच हजार रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात 861 अँटिजेन टेस्ट झाल्या आहेत. या टेस्टमुळे अर्ध्या तासातच कोरोनाची लागण झाली आहे किंवा नाही हे समजणार आहे. अकरा तालुक्‍यात येत्या दहा दिवसात अँटिजेन टेस्टची व्यापक मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. 

अक्कलकोट, बार्शी, माळशिरस, पंढरपूर, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्‍यातून टेस्टला सुरवात झाली आहे. अँटिजेन टेस्टला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोरोना बाधा झालेल्या व्यक्तीचे झटपट अलगीकरण करणे, त्यांच्यावर उपचाराची सुरवात करणे शक्‍य झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 861 अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या असून अक्कलकोट तालुक्‍यात 90, बार्शी तालुक्‍यात 257, माळशिरस तालुक्‍यात 32, पंढरपूर तालुक्‍यात 161, उत्तर सोलापूर तालुक्‍यात 87 तर दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 234 टेस्ट झाल्या आहेत. 

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा भंग करणाऱ्यांकडून सुमारे 65 लाख 11 हजार 80 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक, तहसीलदार कार्यालय आणि नगरपालिका प्रशासनाकडून याबाबतची कारवाई करण्यात आली. 6 ते 16 जुलै दरम्यान ही कारवाई करण्यात आली.

यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणे, दुचाकी वरून दोघांनी प्रवास करणे, तीन, चार चाकी वाहनातून मर्यादेपेक्षा जास्त व्यक्तींचा प्रवास, निर्धारित वेळेनंतर दुकाने सुरू ठेवणे, सोशल डिस्टन्सींग न पाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखूचे सेवन करणे याबद्दल ही कायदेशीर कारवाई केली आहे. यामध्ये पोलिस अधीक्षकांनी 28827 प्रकरणात 48 लाख 39 हजार 350 रुपयांचा दंड वसूल केला. सर्व तहसीलदार कार्यालयाने 9 हजार 25 प्रकरणात 12 लाख 56 हजार 450 रुपयाचा तर सर्व नगरपालिका प्रशासनाकडून 3 हजार 120 प्रकरणात 4 लाख 15 हजार 280 रुपयांचा दंड वसूल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Five thousand antigen tests in ten days