'युपीएससी'त सोलापुरचा झेंडा! सोलापुरसह 'या' सहा तालुक्‍यांतील दहाजण उत्तीर्ण 

तात्या लांडगे
Tuesday, 4 August 2020

'युपीएससी'तील यशस्वी विद्यार्थी अन्‌ कंसात रॅंक 
सोलापूर शहर-जिल्ह्यातील यशस्वी विद्यार्थ्यांपैकी राहुल चव्हाण (109), अभयसिंह देशमुख (151), अश्‍विनी वाकडे (200), सागर मिसाळ (204), श्रीकांत खांडेकर (231), योगेश कापसे (249), अविनाश जाधवर (433), शशांक माने (743), निखील कांबळे (744) अजिंक्‍य विद्याधर (789) यांनी युपीएससी परीक्षेत ही रॅंक मिळविली. 

सोलापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता. 4) ऑनलाइन जाहीर झाला. त्यात सोलापूर शहरातील एक, तर ग्रामीण भागातील नऊ जणांनी यशाचा झेंडा रोवला. हे नवरत्न आता देशाच्या प्रशासकीय सेवेत दाखल होणार असून बहुतेक यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक शेती, मजुरी करतात. त्यांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. 

 

बार्शी शहरातील अजिंक्‍य विद्याधर, अविनाश जाधवर, पंढरपूर शहरातून अभयसिंह देशमुख, तर ग्रामीण भागातून खर्डी येथील राहुल चव्हाण, अक्कलकोटचे योगेश कापसे, मंगळवेढ्यातील श्रीकांत खांडेकर, माढा तालुक्‍यातील उपळाई बुद्रूक (बोकडदरवाडी) येथील अश्‍विनी वाकडे, निखील कांबळे, माळशिरसमधील सागर मिसाळ आणि सोलापुरातील शशांक माने या नऊजणांनी यश प्राप्त केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने सप्टेंबर 2019 मध्ये घेतली होती. तर फेब्रवारी 2020 मध्ये त्याच्या मुलाखती पार पडल्या. या परीक्षेचा निकाल आयोगाने मंगळवारी (ता. 4) ऑनलाइन जाहीर केला. देशभरातून 829 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात राज्यातील 56 विद्यार्थ्यांचा समावेश असून आता त्यांना देशाच्या प्रशासकीय सेवेत उच्च पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. 

'युपीएससी'तील यशस्वी विद्यार्थी अन्‌ कंसात रॅंक 
सोलापूर शहर-जिल्ह्यातील यशस्वी विद्यार्थ्यांपैकी राहुल चव्हाण (109), अभयसिंह देशमुख (151), अश्‍विनी वाकडे (200), सागर मिसाळ (204), श्रीकांत खांडेकर (231), योगेश कापसे (249), अविनाश जाधवर (433), शशांक माने (743), निखील कांबळे (744) अजिंक्‍य विद्याधर (789) यांनी युपीएससी परीक्षेत ही रॅंक मिळविली. 

तीनवेळा उत्तीर्ण होऊनही अपेक्षित यश नाही 
केंद्रीय लोकसेवा आयोगासाठी केलेल्या पाचपैकी तीन प्रयत्नांना आतापर्यंत यश मिळाले. मात्र, अपेक्षित रॅगिंग न मिळाल्याने आयएएस होण्याचे स्वप्न आताही पूर्ण होऊ शकले नाही. 2018 मध्ये इंडियन रेव्ह्यून्यू सर्व्हिसेस ('आयआरएस') आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये यश मिळाले. त्यानंतर आता पुन्हा उत्तीर्ण झालो, मात्र रॅगिंग खूप दूर असल्याने यंदाही स्वप्न पूर्ण होणार नाही. तरीही मी प्रयत्न सोडलेला नसून सध्या माझे नागपूर येथे 'आयआरएस'चे प्रशिक्षण सुरु आहे. दरम्यान, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे 'प्लॅन बी' तयार असायला हवा. जेणेकरुन अपेक्षित यश न मिळाल्यास त्याला पुन्हा जोमाने प्रयत्न करता येईल. स्मार्ट वर्क, संयम आणि चुकांवर जोर देऊन त्यात सुधारणा करणे, याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flag of Solapur in UPSC Ten from six talukas including Solapur passed