esakal | संजय राठोड उद्या देणार मंत्रिपदाचा राजीनामा?, तर विदर्भातील आमदाराला मिळणार वनखाते?
sakal

बोलून बातमी शोधा

forest minster sanjay rathod may give resignation says source nagpur news

संजय राठोडांचा राजीनामा घेतला नाहीतर विरोधक अधिवेशनामध्ये आक्रमक होतील. तसेच सरकारमधील इतर दोन पक्षांचा राजीनाम्यासाठी दबाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संजय राठोड उद्या देणार मंत्रिपदाचा राजीनामा?, तर विदर्भातील आमदाराला मिळणार वनखाते?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : पूजा चव्हाणप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर वेगवेगळे आरोप होत आहेत. राठोड हे आरोपांमध्ये चांगलेच घेरले आहेत. त्यामुळे पक्षासोबतच राज्य सरकारची बदनामी होत असल्याने संजय राठोड उद्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी टिकटॉक स्टार पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने पुणे येथे आत्महत्या केली होती. तिचे वनमंत्री संजय राठोड यांच्याशी संबंध असल्याचे बोलले जात आहे. तसे आरोपही त्यांच्यावर केले आहे. संजय राठोड यांचा कार्यकर्ता अरुण राठोडला याप्रकरणी ताब्यात घेतले होते. तसेच पूजा चव्हाणला पूजा राठोड बनवून यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गर्भपात केल्याचेही बोलले जात आहे. याप्रकरणी अनेक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर विरोधी पक्षाने संजय राठोड यांच्यावर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. इतके आरोप होत असताना संजय राठोड हे जवळपास दहा ते पंधरा दिवस माध्यमांच्या समोर आले नाहीत. त्यानंतर माध्यमासमोर येऊन त्यांनी माझ्या समाजाची आणि कुटुंबाची बदनामी करू नका, असे म्हटले. 

हेही वाचा - आदेशानुसारच 'अवनी'ची हत्या; वन अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करता येणार नाही,...

दरम्यान, दररोज वेगवेगळे आरोप होत असल्याने महाविकास आघाडीमधील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचा राजीनाम्यासाठी सेनेवर दबाव असल्याची माहितीही विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तसेच पक्षाची बदनामी होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील संजय राठोड यांच्यावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उद्या संजय राठोड मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

हेही वाचा - सावधान..! उपराजधानीत चोरांचा सुळसुळाट, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अधिवेशनात मुद्दा गाजण्याच्या भीतीनं निर्णय? -
येत्या १ मार्चला राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यामध्ये विरोधक संजय राठोडांचा मुद्दा चांगलाच लावून धरणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे हे अधिवेशन वादळी होणार आहे. संजय राठोडांचा राजीनामा घेतला नाहीतर विरोधक अधिवेशनामध्ये आक्रमक होतील. तसेच सरकारमधील इतर दोन पक्षांचा राजीनाम्यासाठी दबाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

विदर्भातील शिवसेनेच्या आमदाराला देणार वनमंत्रिपद?   -
संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर विदर्भातील शिवसेनेच्या एका आमदाराला वनमंत्रिपद देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे आमदार पश्चिम विदर्भातील असून त्यांच्याकडे असणारी जबाबदारी ही दुसऱ्यावर सोपविणार असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.  

संपादन - भाग्यश्री राऊत
 

loading image