
Shivsena: खोतकरांचा शिंदे गटाला पाठिंबा? तळ्यात मळ्यात कायम
जालना : अखेर शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकरांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचं समोर आलं होतं. त्यांनी आज खासदार रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते शिंदे गटात जाणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या पण मी अजून शिवसेनेत असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिलं होतं. त्यानंतर आता शिंदे गटाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात खोतकरांचा शिंदे गटाला पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण त्यानंतर आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी पुन्हा दिल्याने त्यांचे तळ्यात मळ्यात कायम आहे.
(Arjun Khotkar In Shinde Group)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जेव्हा पहिल्यांदा शिवसेनेच्या खासदारांची दिल्लीत भेट घेतली होती त्यावेळी अर्जुन खोतकरांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती पण ही भेट बंद खोलीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आजही त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. शिंदे गटाने प्रसिद्धीपत्रकात खोतकरांचा शिंदे गटाला पाठिंबा असल्याचा दावा केल्यानंतर खोतकरांनी मी शिवसेनेत असल्याचा खुलासा केला आहे.
हेही वाचा: सेनेपाठोपाठ राष्ट्रवादीलाही खिंडार? दोन आमदार फडणवीसांच्या भेटीला
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अर्जुन खोतकरांवर ईडीची धाड पडली होती. जालना सहकारी साखर कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत त्यांची काही मालमत्ता जप्त करण्यात आली होती. कारखान्याची इमारत, यंत्रसामग्री, जमीनीवर ईडीने जप्ती आणली होती. ईडीच्या या दबावामुळे त्यांनी शिंदे गट आणि भाजपची वाट धरल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Web Title: Former Mla Arjun Khotkar Supports Shivsena Eknath Shinde Group
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..