Vidhan Sabha 2019 : शिवसेनेने माझ्या घरावर केलेला हल्ला हा नामर्दासारखा : हर्षवर्धन जाधव

harsh.jpg
harsh.jpg

औरंगाबाद : शिवसेनापक्षप्रमुख व शिवसैनिकांबद्दल कथीत वक्‍तव्यानंतर शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर बुधवारी (ता.17) रात्री दगडफेक झाली. दरम्यान, माझ्या घरी पत्नी व मुलगा हे एकटेच असताना शिवसैनिकांनी केलेला हल्ला हा नामर्दासारखा वाटतो, अशा शब्दांत जाधव यांनी टोला लगावला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झालेली असून जाधव यांच्या घराला पोलिसांनी पहारा दिला आहे.

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे इम्तियाज जलील विजयी झालेले आहेत. जाधव यांच्यामुळेच चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. त्यांच्यामुळेच शिवसेनेचा भगवा खाली आणि हिरवा वर गेला. अशा प्रकारची टिका जाधव यांच्यावर करण्यात आली. त्याला दोन दिवसापूर्वी जाधव यांनी आपल्या सभेत उत्तर दिले.

ते म्हणाले, माझ्यामुळे भगवा खाली आणि हिरवा वर गेला असे म्हणता ना.? तुम्हाला मुस्लिमांचं एवढं वावड आहे, तर मग सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे बंडखोर अब्दुल सत्तार कसे चालतात, सत्तार तुमच्या आईचा नवरा आहेत का, असा जळजळीत सवाल त्यांनी शिवसेनापक्षप्रमुख व शिवसैनिकांना केला.

अशा विधानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर बुधवारी रात्री दीडच्या सुमारास जाधव यांच्या घरावर हल्ला चढवत कारवर दगडफेक करण्यात आली. याप्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली, व तपास सुरु केला आहे. दरम्यान, जाधव यांनी लेटरहेडवर क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, अजून डिटेल्स घ्यायचे असून त्यानंतरच तक्रार दाखल करून घेतल्या जाईल, असे पोलिस अधिकारी शिनगारे यांनी सांगीतले.
 

खैरे म्हणतात जाधव यांनी पळून जावे-
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बद्दलचे वक्‍तव्य आम्ही कुणीही सहन करणार नाहीत. हर्षवर्धन यांच्या डोक्‍यावर परिणाम झाला असल्याचे प्रमाणपत्रच आमच्याकडे आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी माझ्याकडे आल्या होत्या. मला हर्षवर्धनचा खुप त्रास आहे, असे त्यांनी म्हटले होते. आता त्याने लंडनला पळून जावे, अन्यथा आम्ही त्याला धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार नाहीत, असा इशारा माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी हल्ल्याच्या घटनेनंतर दिला आहे.

कोण आहेत हर्षवर्धन ?
हर्षवर्धन जाधव हे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. सध्या ते कन्नड विधानसभा मतदार संघातून चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. गेल्या दहा वर्षापासून ते निवडून आलेले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर त्यांनी राज्यातून पहिला राजीनामा दिल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने त्यांना लोकसभा निवडणुकीत मोठा पाठींबा दिला होता. आताही त्यांच्या पाठीशी मराठा समाज उभा राहतो का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हल्ल्यानंतर काय म्हणाले हर्षवर्धन जाधव ?
गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर शिवसेना, श्री. खैरे सतत आरोप करीत आहेत. मी, किती दिवस गप्प बसायचे? तुम्हाला लोकसभेला मुस्लिम चालत नाही. पण विधानसभेला चालतो, या दुटप्पी भूमिकावर मी बोट ठेवले. माझ्यावर घरावर शिवसेनेनी केलेला हा हल्ला अतिशय नामर्दासारखा आहे. एकीकडे शिवाजी महाराज यांचे नाव घ्यायचे आणि दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अंत्यत घाणेरडी भाषा वापरणाऱ्या श्रीपाद छिंदम यास पाठींबा शिवसेना पाठींबा देते, तेंव्हा त्यांचे हिंदूत्व कुठे जातं, असा प्रश्‍न श्री. जाधव यांनी उपस्थित केला आहे. खैरेचाही पराभवानंतर तोल जात असल्याचेही म्हटले. यात पोलिसांनी वेळीच लक्ष द्यावे, अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, असेही स्पष्ट केले.

अंबादास दानवे म्हणतात -
जाधव यांनी केलेल्या वक्‍तव्याबद्दल शिवसैनिकात रोष आहे. शिवसैनिक असा भ्याड हल्ला करणार नाहीत. कारण आम्हीच निवडणुक होईपर्यंत संयम बाळगायला सांगीतलेले आहे. स्टंटबाजी करून निवडणुकीत सहानुभुती निर्माण करण्याची त्यांना सवय आहे. याप्रकरणी त्यांना शिवसैनिक नक्‍की धडा शिकवणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com