तीर्थस्वरूप आईस...!!!  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar

प्रेमस्वरुप आई, वात्सल्य सिंधू आई... बोलवू तूज मी कोणत्या उपायी!... नाही जगात झाली आबाळा या जिवाची, तुझी उणीव चित्ती आई, तरीही जाची... आईच्या अस्तित्वाची महती आणि उणिवेचा बोच या पत्रात आहे.

तीर्थस्वरूप आईस...!!! 

"आई माझा गुरू, आई कल्पतरू... सौख्याचा सागरू, माझी आई...' साने गुरुजींनी लिहिलेल्या दोन ओळीत आई या नात्याचं केवढं तत्त्वज्ञान सामावलेले आहे. प्रत्येकालाच जगाची ओळख करून देणारी ही दोन अक्षरं आयुष्यभर आपल्याला काही न्‌ काही देतच असतात... अक्षराची पहिली ओळख, लहान मुलांच्या मुखातून बाहेर पडणारा पहिला बोल, नंतरची मूल्ये आणि संस्कार ही आईच रुजवत असते. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर आईला लिहिलेलं पत्र नुकतंच पोस्ट केलं आहे. यानिमित्तानं

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आई नावाचे हे माहात्म्य प्रत्येकासाठी वेगवेगळे आहे. थॉमस अल्वा एडिसन ते माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार ते सामान्य व्यक्ती या प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व फुलविण्यात त्यांच्या आईचे महत्त्वाचे योगदान असते. पवार यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर त्यांनी आईस लिहिलेले पत्र नुकतेच पोस्ट केले आहे. ते सध्या व्हायरल झाले आहे. दिवाळीसाठी सर्व पवार कुटुंबीयांनी बारामतीला एकत्र जमावे, अशा शिरस्ता होता. त्याची सुरवात पवार यांच्या आई शारदाबाई यांनी केली होती. ही आठवण नमूद करताना शारदाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू पवार यांनी पत्रात उलगडले आहे. प्रत्येक प्रसंगात त्यांना खंबीर राहण्याची उमेद आणि शिकवण आईने कशी दिली, हे या पत्रात दिसते. लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे संदर्भ यात आहे. निवडणुकीतील अपयशाचा उल्लेख करताना ते पचविण्याचा गुणही त्यांना मिळाल्याचे ते हे पत्र दाखवते. अपार कष्ट करण्याची प्रेरणा, कौटुंबिक जबाबदारी, सामाजिक बांधिलकी जपण्याचा संस्कार या पवार कुटुंबीयांना शारदाबाईंनी दिला. केवळ मुलांच्या शिक्षणाचा विचार न करता, बरोबरीने मुलींच्या शिक्षणाचा आग्रह आणि त्यांना शिकविणे, तसेच विचाराचे स्वातंत्र्य शारदाबाईंनी दिले, ही दूरदृष्टी देखील या पत्रात दिसते. राजकारणाचे बाळकडू आईकडून कसे मिळाले, याचा उल्लेख या पत्रात आहे. कुटुंबातील सर्व भाऊ आणि बहिणी यांनी त्यांच्या त्यांच्या आयुष्यात मिळविलेले यश पाहण्यासाठी तुम्ही नाहीत, असा गहिवरही त्यात आहे. पवार यांनी राज्याच्या प्रमुखपदाची अर्थात मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा त्यांच्या आईची होती. परंतु ते पाहण्यासाठी आई नाही, याची आठवण काढत या पत्रातून व्यथित होतात. परंतु आईने त्यांच्यात आणि कुटुंबातील प्रत्येकात रुजविलेला कणखरपणाही पवार यांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दांमधून दिसतो. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रेमस्वरुप आई, वात्सल्य सिंधू आई... बोलवू तूज मी कोणत्या उपायी!... नाही जगात झाली आबाळा या जिवाची, तुझी उणीव चित्ती आई, तरीही जाची... आईच्या अस्तित्वाची महती आणि उणिवेचा बोच या पत्रात आहे. तसेच अभावातून भव्य काहीतरी निर्माण करण्याचा आईने दिलेला गुण आणि मूल्याची साक्षही या पत्रात आहे. प्रत्येकाचे आयुष्य या दोन अक्षरांभोवती फिरत असते. अनेक दिग्गज आपल्या जडणघडणीचे श्रेय आईला देतात. पवार यांचे हे पत्र निमित्त आहे. परंतु अनेक दिग्गजांच्या वाटचालीत आईचे योगदान आम्ही आपल्या समोर ठेवत आहोत. 

टॅग्स :Sharad Pawar