ऑटोचालकांच्या सामाजिक सुरक्षेसाठी फाउंडेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Auto-Rickshaw
ऑटोचालकांच्या सामाजिक सुरक्षेसाठी फाउंडेशन

ऑटोचालकांच्या सामाजिक सुरक्षेसाठी फाउंडेशन

नागपूर - ऑटोरिक्षाचालक कल्याण मंडळाची रचना कॉंग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात २०१३ मध्ये तयार झाली. नंतर सत्ताबदल झाला. २०१४ मध्ये भाजपप्रणित सरकार राज्यात आले. भाजप सरकारने २०१७-१८ ऑटोचालकांसाठी कल्याणकारी महामंडळाची घोषणा केली. दहा वर्षानंतरही मंडळ तयार झाले नाही. ऑटोचालक दारिद्रयाखाली जगत आहे. त्याला वाली उरला नाही. याच प्रेरणेतून ऑटोरिक्षा चालक वेल्फेअर फाउंडेशनची संकल्पना आकाराला आली. याच पार्श्वभूमीवर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विलास भालेकर यांच्याशी केवल जीवनतारे यांनी साधलेला संवाद.

१. शासनदरबारी किंमत शून्य

मध्यरात्र असो की पहाटेची वेळ; मोबाईल खणखणला, की गणवेश घालून ऑटोचालक निघतात. कुणी अचानक बिमार पडले किंवा गर्भवती महिलांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी ऑटोचालक सर्वात पुढे असतात. प्रवासी वाहतुकीसोबतच एकप्रकारे ऑटोरिक्षा म्हणजे एकप्रकारची मोफत रुग्णवाहिकाच आहे, मात्र शासनदरबारी ऑटोचालकांची किंमत शून्य आहे. ऑटोतून प्रवास करणाऱ्या ग्राहकांपासून तर परिवहन विभागातील अधिकाऱ्यांसाठी आम्ही ऑटोचालक म्हणजे उपेक्षेचे धनी आहोत. ऑटोचालकांसाठी कल्याण मंडळ स्थापन करण्यात येत नसल्याने अनेकदा ऑटोचालकाच्या मृत्यूनंतर लेकरांची आभाळ होते. त्यांच्या जगण्यासाठी कोणतेही साधन नसते.

२. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न कायम

ऑटोचालकांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न कायम असतो. दरदिवशी किती पैसे मिळतील याची कधीच शाश्वती नसते. यामुळे ऑटोचालकांच्या कल्याणासाठी आता ऑटोचालकांनीच पुढे येण्याची गरज लक्षात घेतली. या संकल्पनेतून ऑटोरिक्षा चालक वेल्फेअर फाउंडेशनची स्थापना करण्यात आली असून यातून ऑटोचालकांचे पॅटर्न बदलण्याची शक्यता असल्याचे संस्थापक अध्यक्ष विलास भालेकर म्हणाले.

३. आरोग्यासाठी शासकीय योजना नाही

नागपूर शहरात सुमारे १८५०० ऑटोचालक आहेत. यातील ९० टक्के ऑटोचालक झोपडपट्टीत किंवा चेहरा नसलेल्या वस्तीत राहातात. अस्वच्छतेसह रोगराईचा कायमस्वरूपी विळखा त्यांच्यासभोवताल असतो. ऑटोचालक व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी सरकारी योजना नाही. कित्येकांकडे रेशनकार्ड नाही. त्यात स्वतःचा ऑटो असेल तर परिवहन खात्यातील पोलिसांचा ससेमिरा कायमचाच. परवाना शुल्कापासून तर चालानमुळे सर्व ऑटोचालकांचा जीव मेटाकुटीला आला आहे. सरकारकडून ऑटोचालकांच्या कल्याणासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात येत नसल्यामुळे ऑटोचालकांना थोडीफार मदत मिळावी म्हणून ‘फाउंडेशन’ तयार केले आहे. ऑटोचालकांना आरोग्यासह इतर कारणांसाठी मदत करता येईल. हे मॉडेल यशस्वी झाल्यास इतर शहरातही तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

४. ऑटोचालक संघटित नाहीत

ऑटोचालक असंघटित क्षेत्रात मोडतात. सरकारच्या दुटप्पी धोरणामुळे गिरणी कामगारांची वाताहत झाली. त्यापेक्षा भयावह स्थिती ऑटोचालकांची आहे. ऑटोचालकांचे राहणीमान सुधारावे, त्याचा सामाजिक दर्जा सुधारावा, त्यांचा मुलांचे शिक्षण व्हावे, मुलींच्या लग्नासाठी त्यांना मदत मिळावी. एकूणच ऑटोचालकांच्या सामाजिक सुरक्षेसाठी ऑटोरिक्षा चालक वेल्फेअर फाउंडेशन तयार केले आहे. ऑटोचालकांचा आकस्मिक मृत्यू, गंभीर आजार, फ्रॅक्चर झाल्यास, ऑटोचालकांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, घर बांधण्यासाठी, पत्नीच्या प्रसूतीसाठी मदत करण्याची क्षमता फाउंडेशनमध्ये तयार होत आहे. यासाठी ऑटोचालकांनी सदस्य मोहीम सुरू केली आहे. नुकतेच फाउंडेशनचे सदस्य किशोर जनबंधू यांचा नैसर्गिक मृत्यू झाला. नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी १० हजार रुपयांची मदत केल्याचे भालेराव यांनी सांगितले.

Web Title: Foundation For Social Security For Auto Rickshaw Driver Vilas Bhalekar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top