esakal | सोलापुरातील कोरोनाचा तावरेंनी रचला पाया, शिवशंकर चढवू लागले कळस 
sakal

बोलून बातमी शोधा

smc

कोरोनाच्या संकटातही आरोग्य विभागाचा पोरखेळ 
सोलापूर शहरातील कोरोना आटोक्‍यात आणण्याची प्रमुख जबाबदारी असलेल्या महापालिका आरोग्य विभागाचा सध्या पोरखेळ सुरू आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचा पदभार सुरवातीला डॉ. संतोष नवले यांच्याकडे होता. तत्कालीन आयुक्त दीपक तावरे यांच्या बदलीनंतर डॉ. नवले यांचाही पदभार काढण्यात आला. सध्या ही जबाबदारी प्रभारी स्वरूपात डॉ. मंजिरी कुलकर्णी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पूर्णवेळ आरोग्य अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे परंतु ते रुजू झाले नाहीत. सोलापूर शहरातील कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी सर्वांत प्रथम महापालिकेच्या आरोग्य विभागाचा पोरखेळ आणि त्यानंतर महापालिकेचा कारभार सुधारण्याची आवश्‍यकता आहे. 

सोलापुरातील कोरोनाचा तावरेंनी रचला पाया, शिवशंकर चढवू लागले कळस 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : अवघ्या दहा ते अकरा लाख लोकसंख्येचे शहर असलेले सोलापूर आज कोरोनाबाधितांच्या आणि मृतांच्या संख्येत देशात अव्वल ठरू लागले आहे. सोलापूर शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास महापालिकेची आरोग्य यंत्रणा व महापालिका प्रशासनच जबाबदार असल्याचे सिद्ध झाले आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त दीपक तावरे यांनी केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे सोलापुरात कोरोनाचा पाया रचला गेला. तावरे यांची बदली झाली. त्यांची जागा थेट आयएएस असलेल्या पी. शिवशंकर यांनी घेतली. आयुक्त बदलले पण कोरोनाची स्थिती मात्र बदलली नाही. आयुक्त तावरे यांच्या काळात कोरोनाच्या रचलेल्या पायावर आता आयुक्त शिवशंकर यांच्या कालावधीत कळसच चढू लागला आहे. 

12 एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आणि पहिला बळी सोलापुरात गेला. अवघ्या तीन महिन्यातच सोलापूर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 249 झाली आहे. 303 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे तर 1 हजार 770 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 91 दिवसांमधील कोरोनाबाधितांची दररोज वाढणारी सरासरी ही 36 आहे. तर या 91 दिवसांमध्ये दररोज कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींची सरासरी तीन आहे. कोरोनामुक्त होण्याची सरासरी प्रतिदिन 19 आहे.

सोलापूरची लोकसंख्या आणि या ठिकाणी मृत पावणाऱ्या व्यक्तींची संख्या पाहता सोलापूर शहराने मुंबई, पुणे, औरंगाबाद या महाराष्ट्रातील मोठ्या शहरांनाही मागे टाकले आहे. सोलापुरात कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्ती या 60 वर्षावरील आहेत किंवा त्यांना इतर आजार असल्याचे कारण सांगून महापालिकेचे प्रशासन त्यांचे अपयश लपवीत आहे. राज्यातील सर्वच शहरांमध्ये साठ वर्षावरील व्यक्ती आणि इतर आजाराच्या व्यक्ती आहेतच, मग सोलापुरातच मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक का? आहे याचा शोध मात्र ना महापालिका प्रशासन घेत आहे, ना राज्य सरकार. 

सोलापूर शहरातील कोरोनाकडे महापालिका आयुक्तांनी व महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज सोलापूर शेजारी असलेल्या अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि मोहोळ तालुक्‍यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. सोलापुरातील कोरोनाचेच लोन या तालुक्‍यांमध्ये पोहोचल्याचा प्राथमिक अंदाज आहे. येत्या काळात कोरोनाचे हे लोन अधिक गडद होण्याची शक्‍यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील व सोलापूर परिसरातील कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी सोलापूर शहरातील कोरोना आटोक्‍यात येणे आवश्‍यक आहे. सोलापुरातील कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी सध्याची महापालिका यंत्रणा व आयुक्त हे अपयशी ठरत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. तुकाराम मुंडे यांच्या प्रमाणे कार्यशैली असलेल्या आयुक्तांची सोलापूर महापालिकेला नितांत आवश्‍यकता आहे. 

आरोग्य मंत्र्यांच्या सुनांनाही महापालिकेने नाही जुमानले 
राज्यातील ज्या शहरांनी इन्स्टिट्युन्शल क्वारंटाईन चांगल्या पद्धतीने राबविले ती शहरे कोरोनाच्या बाबतीत आटोक्‍यात आली आहेत. सोलापुरात सुरवातीपासून ते आतापर्यंत कोरोना व कोरोनाच्या उपाययोजनांकडे महापालिका प्रशासनाने फक्त कागदोपत्री घोडे नाचविले आहेत. सोलापुरातील इन्स्टट्युन्शल क्वारंटाईनची संख्या वाढवा अशी सूचना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोलापूरच्या दौऱ्यात दिल्या होता. दौरा होऊन पंधरा दिवस झाले तरीही महापालिका प्रशासनाने काहीच सुधारणा केल्या नाहीत. मुंबईतील धारावी सारखा झोपडपट्टीचा भाग कोरोनामुक्त होऊ शकतो मग सोलापूर का नाही? असाच सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. सोलापूर कोरोनामुक्त करण्यासाठी आवश्‍यक असलेले नियोजन व तत्पर यंत्रणा महापालिकेकडे नसल्याने सोलापुरातील कोरोना हाताबाहेर गेल्याचे चित्र आहे.