आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात चार कोटींची रक्कम जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

राज्यात खुल्या आणि नि:पक्ष निवडणुका व्हाव्या यासाठी प्राप्तिकर विभाग इतर कायदा अंमलबजावणी संस्था आणि इतर सरकारी विभागांशी समन्वय साधत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई : विधानसभा निवडणुकीदरम्यान काळा पैसा आणि रोख रक्कमेच्या वापरावर आळा घालण्यासाठी प्राप्तिकर विभाग महासंचालनालयाने विशेष तपास मोहीम सुरू केली आहे. राज्यात 21 सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत प्राप्तिकर विभागाने चार कोटी रुपयांची बेकायदेशीर रोख रक्कम जप्त केल्याची माहिती प्राप्तिकर महासंचालक (तपास) नितीन गुप्ता यांनी मंगळवारी (ता.1) मुंबईत दिली. 

राज्यात खुल्या आणि नि:पक्ष निवडणुका व्हाव्या यासाठी प्राप्तिकर विभाग इतर कायदा अंमलबजावणी संस्था आणि इतर सरकारी विभागांशी समन्वय साधत असल्याचे त्यांनी सांगितले. रोख रक्कमेच्या हालचालींबाबत गुप्तचर विभागाने दिलेली माहिती एकत्रित करण्यासाठी तसेच यासंदर्भात त्वरित कारवाई करण्यासाठी एक नियामक प्रणाली कार्यरत करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबई, पुणे आणि नागपूर येथे 24 तास कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून 40 अतिशीघ्र पथके कार्यरत असून यामध्ये मुंबईतील सहा पथकांचा तसेच विविध जिल्हे आणि मतदार संघातील पथकांचा समावेश आहे. बेहिशोबी रोख रक्कमेबाबत लक्ष ठेवण्यासाठी राज्यातील विमानतळांवर हवाई गुप्तचर विभाग सतर्क आहेत, असे गुप्ता यांनी सांगितले. मुंबई विभागाचे प्रधान संचालक आनंद कुमार यांची संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्राप्तिकर विभागाचे मुख्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: four crore seized in Maharashtra after implement election code of conduct