Baramati News: बारामतीमध्ये दुर्दैवी घटना; बायोगॅस टाकीची साफसफाई करताना चार जणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Breaking News

Baramati News: बारामतीमध्ये दुर्दैवी घटना; बायोगॅस टाकीची साफसफाई करताना चार जणांचा मृत्यू

बारामती तालुक्यात दुर्दैवी घटना घडली आहे. खांडज येथे बायोगॅस टाकीत पडून चार लोकांचा गुदमरून मृत्यु झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. बारामती शहरातील सरकारी सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये त्यांना प्राथमिक उपचारासाठी आणले असता उपचारा अगोदरच त्यांची प्राणज्योत मावळली.

मिळालेल्या माहिती नुसार, बारामती तालुक्यात खांडज येथे जनावरांच्या मलमूत्राच्या साठवण केलेल्या टाकीत पडून चौघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये आटोळे कुटुंबीयातील तिघे, तर गव्हाणे कुटुंबीयांमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भानुदास अंबादास आटोळे (वय ६०) , प्रवीण भानुदास आटोळे( वय ३२), प्रकाश सोपान आटोळे(वय ५५) आणि बाबा पिराजी गव्हाणे(वय ३८) यांचा समावेश आहे.

मयत भानुदास व प्रवीण हे पिता पुत्र आहेत. या घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्ताना स्थानिकांनी बारामती शहरातील सरकारी सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारासाठी आणले असता उपचारा अगोदरच त्यांची प्राणजोत मावळ्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

डॉक्टर अजित कोकरे व डॉक्टर निर्मल कुमार वाघमारे, डॉक्टर महेश जगताप यांनी अपघातग्रस्त व्यक्तींना प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. या घटनेची माहिती मिळताच गावात एकच खळबळ उडाली. नातेवाईकांसह अनेकांनी बारामती शहरातील सिल्वर जुबली हॉस्पिटलकडे धाव घेत गर्दी केली. माळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने प्राप्त स्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :accident case