Coronavirus: राज्यात चार नवीन रुग्ण 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 मार्च 2020

राज्यात आज दिवसभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले चार नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५२ झाली आहे.

मुंबई : राज्यात आज दिवसभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले चार नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५२ झाली आहे. या चार रुग्णांपैकी दोघे मुंबईतील असून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. सध्या रुग्णालयात भरती असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४१ जणांना कोणतीही लक्षणे नाहीत तर आठ जणांना सौम्य लक्षणे आहेत. मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात भरती असलेल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे. देशात आज नवे ५२ रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या २२३ झाली आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्यातील काही कोरोनाबाधित रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत असून अशा रुग्णांचा १४ दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुन्हा चाचणी केली जाईल. त्यात त्यांचे नमुने निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. मुंबई येथे आज आढळून आलेल्या दोन रुग्णांपैकी एका ३८ वर्षीय तरुणाने तुर्कस्तान येथे प्रवास केला असून ६२ वर्षीय व्यक्तीने इंग्लंड येथे प्रवास केलेला आहे. संसर्ग झाल्याचे आढळून आलेल्या पुण्यातील २० वर्षीय तरुण स्कॉटलंड येथून आला होता तसेच, पिंपरी चिंचवड परिसरातील २४ वर्षीय नव्या रुग्णाच्या भावाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे दोन दिवसांपूर्वी उघड झाले होते. 

राज्यात आज परदेशातून आलेले एकूण २८१ प्रवासी सर्वेक्षणाखाली आहेत. आत्तापर्यंत बाधित भागातून एकूण १,५८६ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत १,३१७ जणांना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी १,०३५ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत, तर ५२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. 

शहरे आणि रुग्ण 
पिंपरी चिंचवड : १२ 
पुणे : ९ 
मुंबई : ११ (२० मार्च रोजी १ रुग्ण आढळून आला) 
नागपूर : ४ 
यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण : प्रत्येकी ३ 
नगर : २ 
रायगड, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी : प्रत्येकी १ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Four new patients in the state