
कारवाईच्या बडगा उगारल्यानंतर अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊसबिले देऊन थकीत एफआरपी कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.
साखर आयुक्तांचा दणका! थकीत एफआरपीत घट
माळीनगर (सोलापूर) : यंदाच्या गाळप हंगामात थकीत एफआरपी (FRP) प्रकरणी राज्यातील २९ कारखान्यांवर साखर आयुक्तांनी आरआरसीअंतर्गत कारवाई केली आहे. साखर आयुक्तांच्या कारवाईच्या दणक्याने मे अखेर थकीत एफआरपीत घट झाल्याचे आकडेवारीवरुन दिसते. चालू हंगामातील जवळपास ९५ टक्के एफआरपी (FRP) शेतकऱ्यांना मिळाली आहे. सध्या एक हजार २७७ कोटी रुपये एफआरपी थकीत आहे. आरआरसी झालेल्या कारखान्यांकडे ६५७ कोटी रुपये थकले आहेत. (FRP has finally come down due to the action of sugar commissioner shekhar gaikwad)
साखर आयुक्तालयाने ३१ मे २०२१ अखेरचा थकीत एफआरपीचा अहवाल नुकताच जाहीर केला आहे. यंदाच्या हंगामात निव्वळ देय असलेल्या एफआरपीच्या २३ हजार ३२० कोटींपैकी २२ हजार ४३ कोटी रुपये (९४.५२ टक्के) दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. साखर आयुक्तांनी मार्चमध्ये २४ कारखान्यांना आरआरसीची नोटीस बजावली होती. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कारखान्यांचा समावेश आहे. कारवाईच्या बडगा उगारल्यानंतर अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊसबिले देऊन थकीत एफआरपी कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.
कारवाईनंतर औरंगाबाद जिल्ह्यातील शरद कारखान्याने १०० टक्के, उस्मानाबाद जिल्ह्यातील कंचेश्वर शुगरने ९३ टक्के, लातूर जिल्ह्यातील साईबाबा शुगरने ८१ टक्के, सोलापूर जिल्ह्यातील गोकुळ माऊली शुगरने ७८ टक्के, सिद्धनाथ शुगर व विठ्ठल रिफाइण्ड शुगरने ७५ टक्के, गोकुळ शुगर, जयहिंद शुगर व लोकमंगल ऍग्रोने ७३ टक्के, संत दामाजी ७१ टक्के, बीड जिल्ह्यातील जय भवानी कारखान्यांने ७५ टक्केपर्यंत एफआरपी दिली आहे. किसनवीर खंडाळा, किसनवीर भुईंज, तासगाव एसजीझेड अँड एसजीए शुगर, यशवंत शुगर, वैद्यनाथ सहकारी या कारखान्यांना एप्रिल, मे महिन्यात पुन्हा नोटीस बजावली आहे. पन्नगेश्वर कारखान्यांने शून्य टक्के एफआरपी दिली आहे.
एफआरपी थकीत असलेल्या साखर कारखान्यांना आरआरसी नोटीस बजावली आहे. त्या कारखान्यांमधील साखर जप्तीची कारवाई करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
- शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे
यंदाच्या हंगामात आरआरसी कारवाई झालेले कारखाने
- सोलापूर जिल्हा : भीमा टाकळी, श्री मकाई, श्री विठ्ठल, लोकमंगल शुगर्स, संत दामाजी, गोकुळ, जयहिंद शुगर, लोकमंगल ऍग्रो, सिध्दनाथ शुगर, विठ्ठल रिफाइण्ड शुगर, गोकुळ माऊली
- उस्मानाबाद जिल्हा : लोकमंगल माऊली शुगर, कंचेश्वर शुगर
- सातारा जिल्हा : किसनवीर खंडाळा, किसनवीर भुईंज
- सांगली : तासगाव एसजीझेड अँड एसजीए शुगर, यशवंत शुगर
- लातूर जिल्हा : पन्नगेश्वर शुगर, श्री साईबाबा शुगर
- बीड जिल्हा : वैद्यनाथ सहकारी, जय भवानी
- नाशिक जिल्हा : एस.जे शुगर्स
- नंदुरबार जिल्हा : सातपुडा-तापी (शहादा)
- औरंगाबाद जिल्हा : शरद (पैठण)
३१ मे २०२१ अखेरची फॅक्ट फाईल
- गाळप हंगाम घेतलेले कारखाने- १९०
- शेतकऱ्यांना देय एफआरपी- २३ हजार ३२० कोटी
- शेतकऱ्यांना दिलेली एफआरपी- २२ हजार ४३ कोटी (९४.५२ टक्के)
- थकीत एफआरपी- एक हजार २७७ कोटी (५.४८ टक्के)
- हंगामात आरआरसी झालेले कारखाने- २९
- आरआरसी झालेल्या कारखान्यांकडे थकीत रक्कम- ६५७ कोटी
- १०० टक्के एफआरपी दिलेले कारखाने- ११७
- ५० ते ९९ टक्के एफआरपी दिलेले- ६८
- १ ते ४९ टक्के एफआरपी दिलेले- ४
- शून्य टक्के एफआरपी दिलेले- १
(FRP has finally come down due to the action of sugar commissioner shekhar gaikwad)