फर्निचरचे काम अपूर्ण, तरी आचारसंहितेपूर्वी करेक्ट कार्यक्रम! बुधवारी २०० खाटांच्या सोलापूर जिल्हा रुग्णालयाचे ‘या’ मंत्र्यांसह खासदार-आमदारांच्या उपस्थितीत लोकार्पण

२०० खाटांच्या महिला व नवजात शिशू रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे काम वर्षभरापूर्वीच पूर्ण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागाला ताबाही दिला. मात्र, फर्निचरचे काम अजूनही अपूर्ण आहे. आता लोकसभा निवडणुकीपूर्वी रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा उरकला जाणार आहे.
sakal breaking
sakal breakingsakal

सोलापूर : सार्वजनिक आरोग्य विभागाने येथील गुरुनानक चौकानजीक बांधलेल्या २०० खाटांच्या महिला व नवजात शिशू रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे काम वर्षभरापूर्वीच पूर्ण झाले आहे. चार महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागाला ताबाही दिला. मात्र, फर्निचरचे काम अजूनही अपूर्ण आहे. आता लोकसभा निवडणुकीपूर्वी या जिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा उरकला जाणार असून बुधवारी (ता. १३) रुग्णालय रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे.

सकाळी ११ वाजता सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्षस्थानी राहतील. याप्रसंगी डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, रणजितसिंह नाईक निंबाळकर, ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे खासदार, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, प्रणिती शिंदे, सचिन कल्याशेट्टी, बबनराव शिंदे, रणजितसिंह मोहिते पाटील, अरुण लाड, जयंत आसगावकर, शहाजी पाटील, संजय शिंदे, यशवंत माने, राजेंद्र राऊत, राम सातपुते, समाधान आवताडे हे आमदार उपस्थित राहणार आहेत.

तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव नवीन सोमा, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार, संचालक डॉ. नितीन आंबाडेकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार, अधीक्षक अभियंता संजय माळी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री ढवळे यांची उपस्थिती राहणार आहे.

तळमजल्यावर तातडीची वैद्यकीय सेवा

गुरुनानक नगराजवळील ९७६०.३५ चौरस मीटर जागेवर ३४२५.५० लाख खर्चून हे तीन मजली २०० खाटांचे जिल्हा रुग्णालय बांधले आहे. यात महिला व नवजात शिशू रुग्णालय व जिल्हा रुग्णालय प्रत्येकी १०० खाटांचे आहे. २० फेब्रुवारी २०२३ मध्ये सुरू झालेले काम ३१ मार्च २०२३ रोजी पूर्ण झाले. यात तळमजल्यावर अपघात व तातडीची वैद्यकीय सेवा, सहा खाटांचे अतिदक्षता विभाग, बाह्यरुग्ण विभाग, नोंदणी, औषध वितरण विभाग, सोनोग्राफी, भौतिकोपचार विभाग, स्वयंपाकगृह, रक्त साठवणूक केंद्र व पोलिस चौकी आहे.

पहिल्या मजल्यावर गर्भवतींसाठी अतिदक्षता विभाग

पहिल्या मजल्यावर सुसज्ज प्रसूती कक्ष, तीन मॉड्युलर शस्त्रक्रिया गृह, प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात गर्भवतींसाठी अतिदक्षता विभाग, विशेष नवजात शिशु उपचार विभाग, नातेवाईकांसाठी प्रतीक्षागृह, पिण्याच्या पाण्याची सोय तर दुसऱ्या मजल्यावर प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात गर्भवतींसाठी आंतररुग्ण विभाग, बालरोग विभाग, नातेवाईकांसाठी प्रतीक्षागृह आहे.

२४ तास मिळणार या सेवा

महिला व नवजात शिशू रुग्णालयात २४ तास सेवा मिळणार आहे. यात प्रसूती, प्रसूती शस्त्रक्रिया, एसएनसीयू, गर्भवतींसाठी प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात अतिदक्षता विभाग, गर्भपात, स्त्रियांचे कर्करोग निदान, स्किल लॅब.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com