Amol Kirtikar: ''प्रत्येकाची वैयक्तिक मतं असतात...'' कीर्तिकरांच्या मुलाने मांडली भूमिका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amol Kirtikar Gajanan Kirtikar

Amol Kirtikar: ''प्रत्येकाची वैयक्तिक मतं असतात...'' कीर्तिकरांच्या मुलाने मांडली भूमिका

मुंबईः खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटामध्येच आहेत. आज संजय राऊत यांनी अमोल कीर्तिकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली.

शिवसेनेचे जुने नेते, खासदार गजानन कीर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटात काल प्रवेश केला आहे. कीर्तीकर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जुने सहकारी आहेत. त्यांच्या शिंदे गटात जाण्यामुळे ठाकरे गटाचे मोठं नुकसान झालं आहे. कारण त्यांचा राजकीय अनुभव हा ठाकरे गटासाठी फार महत्त्वाचा होता. गजानन कीर्तिकर यांच्या शिंदे गटात जाण्याने ठाकरे गटातील खासदारांची संख्या आणखी कमी झाली आहे. विशेष म्हणजे गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात गेले असले तरी त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर यांनी ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतलाय.

हेही वाचाः गौतमी नाचली, तुमचं काय गेलं?

आज खासदार संजय राऊत यांनी अमोल कीर्तिकर यांची भेट घेतली. यावेळी बोलतांना संजय राऊत म्हणाले की, अमोल कीर्तिकर हे आदित्य ठाकरेंच्या संपूर्ण राजकीय प्रवासात सोबत राहिलेल शिवसैनिक आहेत. गजाभाऊंनी निर्णय घेतला पण अमोल त्यांच्यासोबत नाहीत. याचा आम्हाला आनंद आहे. शंभर दिवस तुरुंगात राहून बाहेर आल्यानंतर जेवढा आनंद झाला नाही त्यापेक्षा जास्त आनंद आज झाला, अशा भावना संजय राऊत यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केल्या.

तो त्यांचा निर्णय- अमोल कीर्तिकर

वडिलांच्या पक्षांतरावर बोलतांना गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर म्हणाले की, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. प्रत्येकाचे वैयक्तिक मतं असतात. त्यावर मी जास्त बोलणार नाही. मात्र मी कालही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात काम केलं. इथून पुढेही करेन.

राज्यात मध्यावधीची तयारी सुरु- राऊत

राज्यामध्ये मध्यावधी निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे बोलले ते खरं आहे. शिंदे गटामध्येही फूट पडण्यास सुरुवात झालीय, असं संजय राऊत म्हणाले.

त्यामुळे राज्यामध्ये अंतर्गत राजकारणत नेमकं काय शिजतंय, हे बाहेर कळू शकत नसलं तरी ठाकरे गटातून सतत मध्यावधींचा उल्लेख केला जातोय.