तब्बल ११ वेळा आमदार राहिलेले गणपतराव देशमुख यांचं निधन

तब्बल ११ वेळा आमदार राहिलेले गणपतराव देशमुख यांचं निधन

सोलापूर : सांगोला, : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, राजकारणातील ऋषितुल्य नेतृत्व, एकाच मतदारसंघातून, एकाच पक्षातून विक्रमी अकरा वेळा आमदार झालेले, अभ्यासू, संयमी व विशेषतः 'जनसामान्यातील माणूस' म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार भाई गणपतराव देशमुख यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने "जनसामान्यांचा लोकनेता" हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर 16 जुलैपासुन सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्यावर पित्ताशयातील खड्याची शस्त्रक्रियाही झाली होती. त्यांच्या प्रकृतीत अनेकवेळा चढ-उतार सुरू होता काही वेळेस त्यांची प्रकृती चिंताजनकही बनली होती. आज शुक्रवार (ता. 30) रोजी सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मावळली.

तब्बल ११ वेळा आमदार राहिलेले गणपतराव देशमुख यांचं निधन
पुणे जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत एक-दोन दिवसांत निर्णय

शेतकरी कामगार पक्षाची ओळख सामान्यापर्यंत आपल्या कार्यातून पोचविणारे, प्रत्येक अडचणीतील व्यक्तीला मदत करणारे, त्यांच्या समस्या सोडवुन लोकांना नेहमी आपलेसे करणारे खरे लोकनेते होते. वकीली व्यवसाय सोडुन सामान्यांच्या प्रश्नांसाठी राजकारणात आले. 1962 ला ते पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले. 1972 व 1995 चा अपवाद वगळता विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत विजयी झाले. आकरा वेळेस विधानसभा जिंकल्यामुळे वर्ल्ड गिनीज बुकमध्ये आबांच्या कारकिर्दीची नोंद झाली आहे. गणपतराव देशमुख (आबा) हे बहुतांशी काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले, तेव्हा आणि 1999 मध्ये शेकापने कॉंग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा ते मंत्रिमंडळात मंत्री होते. एकाच मतदारसंघातून, एकाच पक्षातुन तब्बल अकरा वेळा निवडून येण्याची किमया आबांनी दाखूवन दिलीय. 2019 विधानसभेची निवडणूक प्रकृतीच्या कारणाने त्यांनी लढविली नव्हती. प्रत्येक विषयाचा गाढा अभ्यास करण्याबरोबर चिकाटीने काम करण्याची जिद्द त्यांच्यात होती.

तब्बल ११ वेळा आमदार राहिलेले गणपतराव देशमुख यांचं निधन
पुणे राष्ट्रवादीचं कार्यालय पुन्हा वादात; काळ्या बाहुलीवर अंनिससह भाजपचाही आक्षेप

आबासाहेबांनी वकिली व्यवसाय सोडून समाजकार्याकडे व राजकारणाकडे वळले होते. 1950 पासून विद्यार्थिदशेत असताना ते आंदोलनात सहभागी झाले होते. 1990, 2004 व 2009 साली विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून काम केले होते. त्यांच्या उज्ज्वल कारकिर्दीमुळे आबांना महाराष्ट्र विधान मंडळाचा जीवनगौरव पुरस्कार, वस्त्रोद्योग महर्षी पुरस्कार, लोकनेते बाळासाहेब पाटील समाज भूषण पुरस्कार, यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार, सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कार, रयत माउली सौ. लक्ष्मीबाई पाटील पुरस्कार, भारती विद्यापीठ पुणचा जीवन साधना गौरव पुरस्कार तसेच महाराष्ट्र राज्य विधिमंडळात 55 वर्षे कारकिर्दीबद्दल महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्यांचा 2017 मध्ये सन्मान झाला आहे. * जनसामान्यांत हळहळ - आबांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे पसरली. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावात निधनाच्या वृत्ताने नागरिक हळहळ व्यक्त करीत होते. 'आपल्यातील, आपला माणुस हरपला' अशी भावना सामान्य कष्टकरी, शेतकरी, कामगार यांच्यात झाली होती. आयुष्यभर त्यांनी आपला वेळ, आपली राजकीय ताकद जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी घालविली होती. त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्यानंतर सांगोल्यातील अनेक ठिकाणी अभिषेक व प्रार्थना करण्यात येत होत्या. * चळवळीतील आमदार म्हणूनही ओळख - आयुष्यभर आबासाहेब दुष्काळी सांगोला तालुक्याला पाणी मिळाले पाहिजे यासाठी आयुष्यभर संघर्ष करीत राहिले. तत्त्वनिष्ठ राजकारणामुळे त्यांनी शेकाप पक्ष सोडून इतर कोणत्याही पक्षाचा विचार केला नाही. त्यामुळे नेहमी विरोधी बाकावर असणारे गणपतराव (आबा) तालुक्याच्या टेंभू, म्हैसाळ, नीरा-उजवा इत्यादी पाणी योजनांचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी शेवटपर्यंत पाणी परिषदा, पाण्यासाठीचे आंदोलने, मेळावे करीत राहिले. तालुक्याला पाणी मिळावे यासाठी आयुष्यभर झटणारे आबासाहेब चळवळीतील खरे 'पाणीदार आमदार' म्हणुनही ओळखले जावु लागले. जनसामान्यांसाठी विविध वेळेला केलेल्या आंदोलनामुळे तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सहभाग यामुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगवासही भोगावा लागला आहे. प्रत्येक कष्टकरी, कामगार, शेतकरी अशा सर्व सामान्यांंसाठी आयुष्यभर झगडणारे गणपतराव देशमुख यांच्या निधनाची बातमी समजतात संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे. राज्याच्या व देशाच्या राजकारणात गणपतराव देशमुख यांच्या जाण्याने राजकारणात मोठी पोकळी निर्माण होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com