esakal | नावीन्याची ‘चौकट’ बदलेल भविष्याचे ‘चित्र’

बोलून बातमी शोधा

नावीन्याची ‘चौकट’ बदलेल भविष्याचे ‘चित्र’
नावीन्याची ‘चौकट’ बदलेल भविष्याचे ‘चित्र’
sakal_logo
By
गणेश मतकरी

मराठी चित्रपटसृष्टीला मोठा इतिहास आहे. मात्र, गेल्या वर्षभरात कोरोनाच्या संकटामुळं व्यवसायाची गणितं पूर्णपणे बदलली आहेत. या परिस्थितीत ‘ओटीटी’चा नेटका वापर करीत दिग्दर्शकांनी काही वेगळं, चांगलं देण्याचा प्रयत्न करणं, केवळ रंजनात अडकून न राहणं आणि प्रेक्षकांनी यातले शक्य तेवढे प्रयत्न उचलून धरणं, या दोन्ही गोष्टी पुढल्या पंधरा ते वीस वर्षांसाठी महत्त्वाच्या आहेत. तसं झाल्यास मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा सोन्याचे दिवस येतील, यात शंका नाही...

ए क मे १९६० साली महाराष्ट्राची एक राज्य म्हणून स्थापना झाली, तेव्हा मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ हा ओसरत चाललेला होता आणि हिंदी चित्रपटांना अधिक महत्त्व येऊ लागलेलं होतं. भारताच्या चित्रपटांच्या इतिहासात महाराष्ट्राला फार महत्त्व आहे, किंबहुना हा इतिहास आपल्यापासूनच सुरू झाला, असं आपण म्हणू शकतो. भारतातला पहिला चित्रपट, दादासाहेब फाळकेंचा ‘राजा हरिश्चंद्र’ (१९१३) जरी मूकपट असला, तरी त्यामागचा विचार मराठी होता, त्याची निर्मिती पूर्णत: आपल्या बनावटीची होती. मूकपटांच्या काळात आणि पुढं बोलपट आल्यानंतरही स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा काळ मराठी चित्रपटांसाठी उत्तम होता. सादरीकरण आणि आशय या दोन्ही दृष्टिकोनांमधून हा चित्रपट दर्जा सांभाळून होता. व्ही. शांताराम, मास्टर विनायक, विश्राम बेडेकर, बाबूराव पेंढारकर, राजा परांजपे, आचार्य अत्रे, अनंत माने असे अनेक मोठे आणि महत्त्वाचे दिग्दर्शक या कालावधीत चित्रपटांशी जोडलेले होते. चित्रपटांचा प्रेक्षक सजग होता, विचार करू शकणारा होता आणि मनोरंजनाची व्याख्या ‘टाइमपास’ अशी झालेली नव्हती. १९६० पासून पुढला मोठा काळ, म्हणजे विसावे शतक संपेपर्यंत मात्र ती तशी झाली. या दिवसांमध्येही जब्बार पटेल, अमोल पालेकर, राजदत्त, पुढे सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर अशी चांगली नावं वेळोवेळी पाहण्यात आली, पण ‘नवं वळण’ नावानं ओळखला जाणारा आधुनिक सिनेमा नव्या शतकातल्या पहिल्या काही वर्षांतच दाखल झाला आणि हे चित्र बदललं. आता पुन्हा एकदा मराठी चित्रपटाला बरे दिवस आले आणि विषयाच्या वैविध्यासह वेगळ्या प्रकारचा चित्रपट आपल्याकडं अवतरला.

हेही वाचा: 'सत्य बोललो तर शीर कापलं जाईल'; अदर पुनावालांना बड्या हस्तींकडून धमक्या

महत्त्व दिग्दर्शकीय भूमिकेचं

या नव्या चित्रपटांत दिग्दर्शकीय भूमिकेला महत्त्व होतं, मांडणीत नवे प्रयोग होते, प्रेक्षकांचा विचार होता, पण त्यासाठी निर्बुद्ध करमणूक स्वीकारली जात नसे. दर्जा राखून करमणूक करणारा एक, तर आशयाची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करणारा दुसरा, असे दोन प्रमुख प्रकार या काळातल्या चांगल्या चित्रपटांमधून दिसायला लागले. या काळात आणखी एक गोष्ट झाली, ती म्हणजे काही चित्रपटांना आलेल्या उत्तम प्रतिसादाकडं आणि वाढत्या राष्ट्रीय पातळीवरल्या कौतुकाकडं पाहून नवे निर्माते उद्योगात आले आणि चित्रपटांच्या निर्मितीसंख्येचं प्रमाण खूप वाढलं. यातला सरसकट सगळा सिनेमा वरच्या दोन प्रकारांत बसणारा नव्हता. वर्षाकाठी येणाऱ्या शंभर ते सव्वाशे चित्रपटांत जेमतेम वीस टक्के चित्रपट हे वर सांगितलेल्या ‘चांगल्या’ चित्रपटांच्या वर्गात बसत. इतरांना मात्र ना कलात्मक पातळीवर यश दिसे, ना तिकीट खिडकीवर. त्यातही अलीकडच्या चार-पाच वर्षांत आशयाला प्राधान्य देणाऱ्या चित्रपटांनाही ओहोटी लागली, ती घसरत्या प्रतिसादामुळं. या काळात प्रेक्षक पुन्हा निर्बुद्ध करमणुकीकडे वळला. अशा परिस्थितीत हमखास यश मिळायचं, तर चित्रपट हमखास मनोरंजन करणारा तरी लागे किंवा चॅनेलसारख्या एखाद्या भरभक्कम निर्मितीसंस्थेचा पाठिंबा असणारा, जी संस्था चित्रपटाची वारेमाप प्रसिद्धी करून प्रेक्षकांना थिएटरकडे खेचून आणेल. यातली कोणतीही गोष्ट नसणारा चित्रपट कितीही उत्कृष्ट असला, तरी तो प्रेक्षक स्वीकारतीलच, याची खात्री उरली नाही.

‘ओटीटी’चे आगमन

२०१८ मध्ये भारतीय निर्मिती असणारी ‘सॅक्रेड गेम्स’ ही मालिका प्रथम ओव्हर दी टॉपवर (ओटीटी) स्वीकारली गेली आणि तेव्हापासून हा एक वितरणाचा नवा मार्ग म्हणून पुढं आला आहे. भारतातल्या सर्व भाषांतील मालिका आणि चित्रपट यावर यायला लागले आहेत आणि त्यात अर्थात मराठीचाही समावेश आहे. मात्र, यावर दिसणारे बहुसंख्य चित्रपट हे चित्रपटगृहात लागून गेलेले आहेत. संपूर्ण नव्या मराठी चित्रपटांचं प्रमाण इथं अत्यल्प आहे. गेल्या वर्षी चित्रपटगृह बंद झाल्यानंतर जी परिस्थिती तयार झाली, ती पाहता आपल्याला अशा नव्या चित्रपटांच्या वितरणाचं माध्यम म्हणूनच ‘ओटीटी’ चॅनेल्सकडे पाहणं हे अधिक गरजेचं आहे.

मराठी चित्रपटांसमोर मोठी आव्हानं

आज आणि नजीकचा भविष्यकाळ पाहिला, तर मराठी चित्रपटांसाठी वातावरण काळजीचं आहे, हे आपण नाकारू शकत नाही. यातला बराच काळ चित्रपटगृह बंदच असल्यानं सत्तर ते नव्वद चित्रपट वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत, असं ऐकतोय. आणि निर्मिती पुन्हा वेगात झाल्यावर वार्षिक शंभर सव्वाशे चित्रपट येतच असताना, या सर्वांना चित्रपटगृहात स्थान मिळू शकेल का? त्याबरोबरच आता आपल्याला घरबसल्या चित्रपट पाहायची जी सवय झाली आहे, ती मोडून आपण पूर्वीसारखे चित्रपटगृहात नियमितपणे जायला लागू का? जायचा विचार असला, तरीही आपल्या मनातली संसर्गाची भीती नाहीशी व्हायला किती वेळ लागेल? माणसं नोकरीधंद्यानिमित्त बाहेर पडणं वेगळं आणि मनोरंजनासाठी बाहेर पडणं वेगळं. पहिल्या गोष्टीला त्यांचा इलाज नाही, तर दुसऱ्या गोष्टीला त्यांच्याकडं आज ‘ओटीटी’चा पर्याय उपलब्ध आहे. मग भविष्यात इतर भाषक चित्रपटांबरोबर आपल्यालाही ‘ओटीटी’वर वितरणासाठी अवलंबून राहावं लागेल का? आणि तो पर्याय आपल्याला उपलब्ध आहे का? प्रत्यक्षात ‘ओटीटी’मध्ये एक फायदा असतो आणि तो म्हणजे सध्या मराठी चित्रपटांच्या स्वतंत्र निर्मात्यांसाठी डोईजड झालेली मार्केटिंग आणि वितरणाची जबाबदारी तुमच्या डोक्यावर राहत नाही. तुम्ही केवळ निर्मितीवर आपलं लक्ष केंद्रित करू शकता. ही निर्मितीही मुळातच ओटीटी प्लॅटफॉर्मनं ॲप्रूव्ह केलेली असेल, तर अधिकच चांगलं. शिवाय तुम्हाला जो काही नफा मिळणार आहे, त्यासाठी तुम्ही प्रेक्षकांनी चित्रपटगृहात येण्यावर अवलंबून नाही. आता एक आहे, की एखादा चित्रपट फारच मोठ्या प्रमाणात चालला, तर चित्रपटगृह ज्या प्रमाणात नफा देऊ शकेल, तितका ओटीटी माध्यमात मिळणार नाही, पण नुकसान होत नसेल आणि तुमचं काम जर मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असेल, तर हा काही वाईट मार्ग नाही. शिवाय प्रेक्षकांवर थेट अवलंबून नसल्यानं या मार्गानं तुम्हाला नवे काही प्रयोग करून पाहाणं, रंजनापलीकडचा आशय मांडणं शक्य होईल. यात एक अडचण मात्र आहे, आणि ती म्हणजे प्रस्थापित ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी अजून तरी नव्या मराठी चित्रपटांना हवा तसा प्रतिसाद दिलेला दिसत नाही. अलीकडेच अभिजित वारंग दिग्दर्शित ‘पिकासो’ या चित्रपटाचा प्रीमिअर ‘ॲमेझॉन प्राइम’ या ‘ओटीटी’वर झाला, पण अशी उदाहरणं ही अपवादात्मक आहेत. सध्या त्यांच्याकडं हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट उद्योगांमधले, मोठ्या बजेट्सचे आणि प्रसिद्ध स्टार्सना घेऊन केलेले चित्रपट थेट प्रदर्शनासाठी येत असताना ते मराठीसारख्या, चित्रपटगृहातही मर्यादित प्रतिसाद असणाऱ्या उद्योगाला का प्रोत्साहन देतील?

...तर भविष्य उज्ज्वल

यावर मार्ग आहेत. पहिला म्हणजे मराठीपुरतेच असे ओटीटी सुरू करणं आणि त्यावर मराठी चित्रपटांना स्थान देणं. यादृष्टीने याआधीच काही प्रयत्न सुरू झालेले आहेत. प्लॅनेट मराठी, लेट्सफ्लिक्स, आणि इतरही काही ‘मराठी’ ओटीटींच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहेत, पण केवळ आपली वेगळी चूल मांडणं हे पुरेसं नाही. आजवरचा इतिहास पाहता ते घातकच ठरलेलं आहे. कन्नड, तमीळ, बंगाली अशा भाषांमधला चित्रपट हिंदीला तुल्यबळ ठरत असताना मराठी चित्रपट मागे राहाण्याचं कारण आपल्या मर्यादित व्यवहारात दडलेलं आहे. मोठ्या प्रमाणात मराठी प्रेक्षक आपला सिनेमा पाहतोय, तिकिटांसाठी रांगा लागताहेत असं दृश्य दिसलं असतं, तर आपला चित्रपट मुळातच मागं राहिला नसता. पण अजूनही वेळ गेलेली नाही. केवळ मराठी ‘ओटीटी’वरच नाही, तर नेटफ्लिक्स, हॉटस्टार, प्राइम यांसारख्या प्रसिद्ध प्लॅटफॉर्म्सवरही त्यांच्याकडं असलेल्या मराठी चित्रपटांना लोक मोठ्या प्रमाणात पाहताहेत, हे लक्षात आलं, तर आपोआपच ही मागणी वाढेल, आणि तिथेही मराठीचा टक्का वाढू शकेल. अर्थात, हीच गोष्ट सारं स्थिरस्थावर झाल्यावर चित्रपटगृहांमध्येही दिसायला हवी. दिग्दर्शकांनी काही वेगळं, चांगलं देण्याचा प्रयत्न करणं, केवळ रंजनात अडकून न राहाणं आणि प्रेक्षकांनी यातले शक्य तेवढे प्रयत्न उचलून धरणं, या दोन्ही गोष्टी पुढील पंधरा-वीस वर्षांसाठी महत्त्वाच्या आहेत. गेल्या पंधरा वर्षांत आपण मराठी चित्रपटांच्या पुनरुज्जीवनाचा एक मोठा प्रयत्न केलेला आहे. आता तो टिकवून दाखवणं, आणि इतर उद्योगांशी स्पर्धेला तयार होणं, हेच पुढचं महत्त्वाचं पाऊल असेल.