ब्रेकिंग! परजिल्ह्यात व परराज्यात जाण्यासाठी बनावट पास देणारी टोळी जेरबंद 

तात्या लांडगे
Friday, 7 August 2020

बनावट पासद्वारे अनेकांचा आंतरजिल्हा प्रवास 
कोरोनाचा संसर्ग रोखला जावा, या हेतूने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आंतरजिल्हा प्रवासासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले. जिल्हाबंदी असल्याने संबंधित प्रवाशांकडे तसे प्रमाणपत्र गरजेचे आहे. मात्र, बहुतेक ठिकाणी त्याची तपासणीच होत नसल्याचा अनुभव अनेकांनी सांगितला. तर दुसरीकडे एखाद्या प्रवाशांकडील वैद्यकीय प्रमाणपत्रात छेडछाड करुन त्याची रंगीत झेरॉक्‍स काढून त्याद्वारे आंतरजिल्हा पास मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला जातो. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून काहीच पडताळणी न करता अथवा कागदपत्रे नावालाच पाहून पास दिला जातो. अशा प्रकारांमुळे काही दिवसांत सोलापुरातून अनेक प्रवासी परजिल्ह्यात तथा परराज्यात गेल्याची चर्चा आहे. 

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात वाढू नये म्हणून राज्य सरकारने 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढविला आणि जिल्हाबंदीचा निर्णय कायम ठेवला. तत्पूर्वी, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात तथा राज्यात प्रवास करण्यासाठी कोरोनासदृश्‍य लक्षणे नसल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र धेणे बंधनकारक आहे. मात्र, असे बनावट प्रमाणपत्र तयार करुन प्रवाशांना देणाऱ्या दोघांना सोलापुरातील सायबर पोलिसांनी शुक्रवारी (ता. 7) जेरबंद केले. याबाबत 'सकाळ'ने आजच्या अंकात वृत्त प्रकाशित करीत त्याकडे लक्ष वेधले होते. 

सोलापुरातील गुरुनानक चौकातील शुभम ई-सेवा ऑनलाइन शॉपमधून परजिल्ह्यात तथा परराज्यात जाण्यासाठी प्रवाशांना बनावट पास तयार करुन दिले जात होते. तत्पूर्वी, उमेजा क्‍लिनिकच्या डॉ. अफ्रीन अय्युब कलबुर्गे यांनी काही दिवसांपूर्वी प्रवाशांना वैद्यकीय प्रमाणपत्र दिले होते. त्या मुळ प्रमाणपत्रात छेडछाड करुन ऑनलाइन सेवा केंद्र चालविणाऱ्या दोघांनी प्रवाशांना बनावट पास तयार करुन दिले. त्याआधारे ऑनलाइन अर्ज करुन पास घेतले. संबंधित प्रवाशांकडून ज्यादा पैसे घेऊन असे प्रकार त्या दोघांकडून सुरु असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. शुभम विजयकुमार एकबोटे (वय 24) आणि राहूल विजयकुमार एकबोटे (वय 28) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. पोलीस आयुक्‍त अंकुश शिंदे, उपायुक्‍त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही. बी. बायस, पोलीस नाईक सचिन गायकवाड, अर्जुन गायकवाड, वसीम शेख, इब्राहिम शेख, प्रवीण शेळकंदे, दिपक जाधव, अमोल कानडे, पुजा कोळेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

बनावट पासद्वारे अनेकांचा आंतरजिल्हा प्रवास 
कोरोनाचा संसर्ग रोखला जावा, या हेतूने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आंतरजिल्हा प्रवासासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले. जिल्हाबंदी असल्याने संबंधित प्रवाशांकडे तसे प्रमाणपत्र गरजेचे आहे. मात्र, बहुतेक ठिकाणी त्याची तपासणीच होत नसल्याचा अनुभव अनेकांनी सांगितला. तर दुसरीकडे एखाद्या प्रवाशांकडील वैद्यकीय प्रमाणपत्रात छेडछाड करुन त्याची रंगीत झेरॉक्‍स काढून त्याद्वारे आंतरजिल्हा पास मिळण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला जातो. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून काहीच पडताळणी न करता अथवा कागदपत्रे नावालाच पाहून पास दिला जातो. अशा प्रकारांमुळे काही दिवसांत सोलापुरातून अनेक प्रवासी परजिल्ह्यात तथा परराज्यात गेल्याची चर्चा आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gangs arrested for giving fake passes to enter districts and othe states