ऐतिहासिक साज अन् नाण्यांचा नजराणा

उत्कर्षा पाटील
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

वैविध्यपूर्ण अलंकारांचा संग्रह
भारतीय संस्कृतीत अलंकारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात वैविध्यपूर्ण अलंकारांचा संग्रह आहे. ज्यामध्ये सिंधू संस्कृतीतील मणी, कौसंबी येथे सापडलेले मौर्य व कुशाणकालीन मणी, उत्खननात सापडलेले जुने सोने-चांदीचे दागिने, राजेशाही थाटाच्या शृंगाराच्या वस्तू आणि अप्रतिम व वैविध्यपूर्ण असे सामान्य माणसांचे अलंकार आहेत. या दालनात भारतीय साज-शृंगाराची एक झलक पाहायला मिळेल. पंचधातू, अष्टधातूंचे अलंकार इथे पाहायला मिळतील.

मुंबई - अतिप्राचीन वास्तू किंवा वस्तूची भुरळ आजही आपल्याला पडते. त्यांचा ऐतिहासिक साज नेहमीच एक वेगळी अनुभूती देतो. आताही इ. स. पूर्व सहाव्या शतकापासून ते आत्तापर्यंतच्या नाण्यांचा इतिहास रसिकांना पाहता येणार आहे. भारतीय पारंपरिक दागिन्यांची घडण, त्यांची शैली आणि वैशिष्ट्ये यांचाही इतिहास दर्शवणारी ज्वेलरी गॅलरी व मनी गॅलरी अशी दोन स्वतंत्र दालने छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात तयार होत आहेत. 23 फेब्रुवारी रोजी त्यांचे उद्‌घाटन होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतावर अनेक राजवटींनी राज्य केले. त्यांनी आपापली नाणी चलनात आणली. त्यापैकी मौर्य, गुप्त, चोल, खिलजी, मुघल, डच, मराठा आदी राज्यकर्त्यांची नाणी प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

मनी दालनाच्या क्‍युरेटर वंदना प्रपन्ना आहेत. दागिने दालनाच्या क्‍युरेटर मनीषा नेने व उषा बालकृष्णन आहेत. वस्तुविनिमय प्रणालीतून धातूच्या पहिल्या नाण्याच्या शोधापर्यंत आणि पुढे धातू मूल्य असलेल्या नाण्यांपासून ते कागदी चलन आणि प्लॅस्टिक मनी (क्रेडिट कार्ड) सारख्या प्रतीकात्मक मुद्रेपर्यंतच्या इतिहासात चलनाने विविध रूपे धारण केली. त्याचा प्रवास दालनात मांडण्यात येणार आहे. वेगवेगळ्या राजवटींच्या काळात आलेली नाणी त्यांचा इतिहास दर्शवतात. त्यातून त्या राज्यकर्त्यांचे महत्त्व विशद होते. विविध सम्राटांचा उदय आणि अस्ताच्या कथा नाण्यांमधून उलगडण्यात आल्या आहेत. 

महाराष्ट्र-वैभवशाली परंपरा असा वेगळा प्रदर्शनीय भाग असेल ज्यात महाराष्ट्राच्या दागिन्यांची घडण व त्याच्या इतिहासाची माहिती अंतर्भूत असणार आहे. त्यामध्ये दागिना घडवण्याची साचा पद्धत आणि चटईच्या वीण तंत्रावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

दोन्ही दालनांतून भारतीय इतिहासावर प्रकाशझोत पडणार आहे. नाणी व दागिन्यांमध्ये अनेकांना खूप रस असतो. त्यामुळे दोन्ही दालने त्यांना नक्की आवडतील. दागिना दालनामध्ये ते कसे तयार केले जात होते याचे तंत्रही काही चित्रफितींद्वारे दाखवण्यात येणार आहे. दोन्ही दालने उभारण्यासाठी हेमेंद्र कोठारी फाउंडेशनने मोलाचे सहकार्य केले.
- मनीषा नेने, क्‍युरेटर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gift of historical decoration and coins