संचालकाचे अपहरण प्रकरण; महाजनांच्या निकटवर्तीयांच्या घरातुन कागदपत्रे जप्त | Girish Mahajan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MLA Girish Mahajan

संचालकाचे अपहरण प्रकरण; महाजनांच्या निकटवर्तीयांच्या घरातुन कागदपत्रे जप्त

पुणे : जळगावमधील शैक्षणिक संस्था ताब्यात घेण्यासाठी संचालकाचे अपहरण करून खंडणी मागितल्याप्रकरणी भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासह 29 जणांविरुद्ध दाखल गुन्ह्यात पुणे पोलिसांच्या पथकाने महाजन यांच्या निकटवर्तीयांच्या घराची झडती घेतली. त्यानंतर या झडतीमध्ये मोठ्या प्रमाणात महत्वाची कादगपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.

गिरीश दत्तात्रेय महाजन (रा. जामनेर, जळगाव), तानाजी भोईटे (रा. कोंढवा), नीलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे (रा. भोईटेनगर जळगाव) यांच्यासह 29 जणांविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ऍड. विजय पाटील (वय 52) यांनी कोथरुड पोलिस ठाण्यात जानेवारी 2021 मध्ये याप्रकरणी फिर्याद दिली होती. जळगावमधील जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित या शैक्षणिक संस्थेचे ऍड. विजय पाटील संचालक आहेत.

हेही वाचा: कोरोनामुक्त गाव बनवा अन् ५० लाख जिंका

संबंधित संस्था भाजपचे गिरीश महाजन यांना पाहिजे होती. त्यासाठी महाजन यांनी ऍड. पाटील यांना एक कोटी रुपये देण्याचे आमिष दाखविले. परंतु पाटील यांनी त्यांना नकार दिला. त्यामुळे आरोपींनी त्यांना पुण्यात बोलावून सदाशिव पेठेतील एका सदनिकेमध्ये डांबून ठेवून मारहाण केली होती. तसेच ऍड. पाटील यांनी संस्थेच्या सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाहीत, तर त्यांना "एमपीडीए'च्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत त्यांच्याकडून पाच लाख रुपयांची खंडणी घेतली होती.

दरम्यान, पुणे पोलिसांच्या एका पथकाने रविवारी जळगाव येथे या प्रकरणातील संशयित आरोपींच्या घरांमध्ये झडती घेतली. दोन दिवस झडती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. त्यांच्या घरातुन पोलिसांनी मोठ्या प्रमाणात महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. झडती घेतलेल्या व्यक्तींमध्ये बहुतांश व्यक्ती या गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत. सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली 40 जणांचे पथक जळगावला गेले होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top