
Nanded Crime : बाप अन् सख्खा भाऊच ठरले 'ती'चा 'काळ'; नात्यातील मुलाशी प्रेमसंबंध ठेवल्याने केली हत्या
Nanded Crime: नांदेडमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली असून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीचे नात्यातल्या मुलाशी प्रेमसंबंध असल्यामुळे कुटुंबाकडून हत्या करण्यात आली आहे.
नराधम पिता आणि भावांकडून तिची क्रूरपणे हत्या करण्यात आली असून हत्येनंतर तब्बल तीन दिवसांनंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा
दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लिंबगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महिपाल पिंप्री (ता.नांदेड) येथील बीएचएमएसच्या तिसऱ्या वर्षात शिकणारी शुभांगी जोगदंड (वय २३) हिचे गावातीलच एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. याची कुणकुण आई-वडिलांना लागली होती.
तीची समज काढण्याचाही प्रयत्न केला होता. दरम्यान आई-वडिलांनी तीचा विवाह इतरत्र जुळवला होता. तरीही ती त्या प्रियकरासोबतच फोनवर बोलतच होती.
आपली आता समाजामध्ये बदनामी होईल, याकारणाने आई-वडिलांनी शुभांगीचे मामा, काका व काकाच्या दोन मुलांना हाताशी घेऊन शुभांगीचा खून केला आणि तिला जाळून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने राख इतरत्र फेकून दिली.
शुभांगी तीन दिवसांपासून बेपत्ता असून, ती नातेवाईकांकडेही नाही याची चर्चा पहिपाल पिंप्री गावात सुरु होती. गावातील काही नागरिकांनी गुरुवारी (ता.२६) लिंबगाव पोलिस ठाण्याचे ठाणेदार चंद्रकांत पवार यांना माहिती दिली.
श्री. पवार यांनी गोपनीयपद्धतीने चौकशी केली असता, शुभांगीच्या आई-वडिलांनी मामा, काका व काकाच्या दोन मुलांच्या मदतीने शुभांगीचा खुन करून पुरावा नष्ट केल्याची बाब समोर आली आहे.
याप्रकरणी वडील जनार्दन जोगदंड, भाऊ केशव जोगदंड, मामा गिरधारी आणि भाऊ कृष्णा, गोविंद या आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
यांच्यावर लिंबगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल असून आई-वडिलांनी पोटच्या मुलीचा खून केल्याच्या या घटनेमुळे नांदेड शहर व परिसर सुन्न झाले आहे.
हृदयाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे गावामध्ये खळबळ माजली असून तेथील लोकं एकमेकांशी बोलायला तयार नाहीत. पोलिसांनी कारवाई सुरू केली असून अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.