सहकारवाढीसाठी युवा पिढीला संधी द्या - उपमुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

मुंबई - बॅंकांनी अत्याधुनिक सुविधांचा वापर करून सहकार क्षेत्रवाढीसाठी युवा पिढीचा अधिक सहभाग बॅंकांच्या संचालक मंडळात करून घ्यावा. नवीन बदल बॅंकांनी स्वीकारावेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबई - बॅंकांनी अत्याधुनिक सुविधांचा वापर करून सहकार क्षेत्रवाढीसाठी युवा पिढीचा अधिक सहभाग बॅंकांच्या संचालक मंडळात करून घ्यावा. नवीन बदल बॅंकांनी स्वीकारावेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रभादेवी येथे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक असोसिएशनचा २४ वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाला, त्या वेळी ते बोलत होते. 

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘अर्बन बॅंका, जिल्हा बॅंकांकडे युवा पिढीचे येण्याचे प्रमाण कमी आहे. युवा पिढीच्या गरजा लक्षात घेऊन बॅंकांनी कामकाजात बदल करून युवा पिढीला सभासद म्हणून बॅंकांच्या संचालक मंडळात स्थान दिले पाहिजे. तसेच, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना तत्काळ सेवा उपलब्ध करून दिली पाहिजे. 

सहकारी बॅंकांनी नवीन बदल स्वीकारून कामकाजात मूलभूत बदल करत स्वतःचे भागभांडवल उभे करावे. बॅंक अडचणीत येणार नाही याचा विचार संचालक मंडळाने करावा. बॅंकांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक राहील.’’ 

गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, ‘‘सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. समाज माध्यमांवरून बॅंकिंग क्षेत्राशी संबंधित चुकीचे संदेश, दूरध्वनी येतात. यापासून बॅंका आणि ग्राहकांनी सतर्क राहावे. राज्यातील सायबर सेल हा देशातील सर्वाधिक अद्ययावत असा सेल आहे, त्याचीही अडचणींच्या काळात बॅंकांनी मदत घ्यावी. नियमानुसार वसुली करण्यास अडचणी असतील तर त्यासाठीही पोलिस संरक्षण उपलब्ध करून देण्यासंदर्भात सहकार्य करण्यात येईल.’’ 

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘‘सहकार क्षेत्र वाढविण्यासाठी या असोसिएशनचा महत्त्वाचा सहभाग आहे. बॅंकांनी वाढते सायबर गुन्हे लक्षात घेऊन त्यापासून सावध राहत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण कर्मचारी आणि अधिकारी यांना देणे आवश्‍यक आहे. सहकार क्षेत्र अधिक समृद्ध होण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, सहकारातून जनतेला उत्तम सेवा दिली पाहिजे.’’ 

या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती पांडे, बॅंकेचे कार्याध्यक्ष मुकुंद कळमकर, उपाध्यक्ष वसंत घुईखेडकर उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Give opportunity to the younger generation to increase cooperation says Deputy Chief Minister