
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसमोर ग्लोबल टिचर भावूक! डिसले गुरुजींवरील कारवाईला ब्रेक
सोलापूर : जिल्हा परिषदेला क्युआर कोड शिक्षण पध्दती देणारे ग्लोबल ॲवार्ड विजेते रणजितसिंह डिसले यांनी ७ जुलैला राजीनामा दिला. २०१७ ते २०२० या काळात त्यांची प्रतिनियुक्ती दुसरीकडे असतानाही त्यांनी ना शाळेवर ना प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी काम केले. त्यामुळे त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आणि त्यांनी राजीनामाच दिला. त्यामुळे त्यांना आज (शनिवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलावून घेतले होते. त्यावेळी डिसले गुरुजींनी भावूक होऊन त्यांच्यासमोर व्यथा मांडली. या पार्श्वभूमीवर चौकशी समित्यांच्या अहवालाची वरिष्ठ स्तरावरून फेरपडताळणी होण्याची शक्यता असून तुर्तास त्यांच्यावरील कारवाईला ब्रेक लागला आहे.
राजीनामा न देण्याचा सल्ला
प्राथमिक शिक्षण विभागाच्या चौकशीनंतर ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले हे अडचणीत येणार हे निश्चित मानले जात आहे. चौकशींचा ससेमिरा मागे लागल्याने डिसले गुरूजींनी थेट राजीनामाच दिला. अधिकाऱ्यांच्या चौकशीला कंटाळून राजीनामा दिल्याची चर्चा झाली. त्यानंतर जागतिक स्तरावरील पुरस्कार मिळालेले जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने राजीनामा दिल्याने त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटायला बोलावले. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी त्यासाठी मध्यस्थी केली. आज (शनिवारी) डिसले गुरुजींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी ते भावूक झाले होते, भावूक होऊन त्यांनी सर्वकाही घडलेली स्थिती मांडली. त्यानंतर तुम्ही निश्चिंत राहा, कारवाई होणार नाही, राजीनामा देऊ नका, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिलासा दिल्याचे बोलले जात आहे. पण, सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केलेल्या चौकशी समित्यांचा अहवाल मागवून घेतला जाणार आहे.
तीन वर्षे प्रशासन गप्प का?
डिसले गुरुजींच्या ज्ञानाचा लाभ इतरांनाही व्हावा म्हणून त्यांची परितेवाडी (ता. माढा) येथील शाळेवरून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर (डायट) प्रतिनियुक्ती करण्यात आली. एका वर्षानंतर त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली. पण, तीन वर्षे त्यांनी तेथे काम केले नाही, तरीदेखील ‘डायट’ने त्याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना का कळविले नाही, शिक्षणाधिकाऱ्यांना कळविले होते तर त्यांनी डिसले गुरुजींवर त्याचवेळी कारवाई का केली नाही, वेतनासंबंधी दरवर्षी पडताळणी होते, मग डिसले गुरुजी स्वत: प्रभारी मुख्याध्यापक म्हणून वेतन काढत होते तर त्याचवेळी ती बाब समोर का आली नाही, विज्ञान केंद्राला दिलेले लाखो रुपयांचे साहित्य डिसले गुरुजींनी परस्पर दुसरीकडेच वापरले असतानाही त्या केंद्रातील अधिकाऱ्यांनी त्यासंबंधी जिल्हा परिषदेला का कळविले नाही, असे प्रश्न अनुत्तरीत आहेत. डिसले गुरुजींवर कारवाई करण्यापूर्वी त्या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.
Web Title: Global Teacher Ranjitsinh Disale Emotional In Front Of Chief Minister Deputy Chief Ministerbreak In Action Temparary Against Disley
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..