शेतकरी, कारखान्यांसाठी साखरेची ‘गोड बातमी’

संतोष शेंडकर
बुधवार, 8 जानेवारी 2020

जागतिक बाजारात तीन वर्षांनंतर साखर दर ३६८ डॉलर प्रतिटन होता. मागील हंगामात ३९ लाख टन निर्यात झाली आणि चालू हंगामात २५ लाख टनाचे करार झालेत. देशांतर्गत साखर निर्मितीही २६३ लाख टन इतकी खाली येणार आहे.
 - राजेंद्र यादव, कार्यकारी संचालक, सोमेश्‍वर साखर कारखाना

सोमेश्‍वरनगर - आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची तूट आणि देशातून होणाऱ्या समाधानकारक निर्यातीमुळे तब्बल दोन वर्षांनंतर साखरेच्या भावात प्रतिक्विंटल शंभर रुपयांची वाढ झाली आहे. आज लहान साखरेचा भाव प्रतिक्विंटल ३१०० रुपयांहून ३२०० रुपये झाला. साखर कारखाने आणि शेतकरी यांच्यासाठी ही ‘गुड न्यूज’ ठरणार असून, एकरकमी ‘एफआरपी’साठी हा दर उपयुक्त ठरेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सन २०१७-१८ च्या हंगामाच्या सुरुवातीला साखरेचे दर प्रतिक्विंटल ३४ रुपये होते. मात्र, केंद्र सरकारने केलेली आयात आणि अतिरिक्त साखरेमुळे साखरेचा दर प्रतिक्विंटल २३०० रुपयांवर आला. 

साखर कारखाने मोडीत निघू नयेत, यासाठी केंद्र सरकारने हा दर २९०० रुपये प्रतिक्विंटल, असा निश्‍चित केला आणि सन २०१८- १९ या हंगामात ३१०० रुपये केला. मात्र, या दरात २५०० ते ३००० रुपये प्रतिटन असणारी एफआरपी एकरकमी देणे शक्‍य नव्हते. राज्यातील जवळपास निम्मे कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. मागील वर्षाचीच ‘एफआरपी’ अजून काही कारखान्यांनी दिलेली नाही. चालू ‘एफआरपी’चेही अनेकांपुढे संकट आहे. राज्यातल्या २४ कारखान्यांना तर थकहमी देण्याची वेळ राज्य सरकारवर आली. अशा परिस्थितीत साखरेचे दर प्रतिक्विंटल ३५०० रुपये करावा, अशी मागणी साखर कारखान्यांकडून होत होती. मात्र, केंद्र सरकारकडून त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, आता नैसर्गिकरीत्या दर वाढत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे ८० लाख टनांची तूट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ६० लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी ऑक्‍टोबर ते डिसेंबर या कालावधीत तब्बल २५ लाख टन निर्यातीचे करार पूर्ण झाले. त्यामुळे देशांतर्गत साठाही कमी होत आहे. ब्राझीलने इथेनॉलकडे लक्ष वळविल्याने आंतरराष्ट्रीय दरही वाढत आहेत. देशांतर्गत दर दोन वर्षांनी प्रतिक्विंटल ३१०० रुपयांपुढे जात आहेत. सोमेश्वर कारखान्याला मंगळवारी झालेल्या साखर विक्रीत लहान साखरेला प्रतिक्विंटल ३२०० रुपये; तर मोठ्या साखरेला ३४०० रुपये असा दर मिळाला. त्यामुळे कारखान्यांना दिलासा मिळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: good news for farmer and sugar factory