बळीराजासाठी खुषखबर ! बॅंकांमधील हेलपाटे होणार कमी; आता मिळणार ऑनलाइन पीक कर्ज 

Agriculture_Loan
Agriculture_Loan
Updated on

सोलापूर : बळीराजालाही शेतीतील कामे सोडून वारंवार हेलपाटे मारायला लागू नयेत, या हेतूने आता त्यांना पीक कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या नव्या प्रयोगाला नांदेडनंतर आता रविवारी (ता. 7) सोलापुरातून सुरवात झाली. कोरोनामुळे सरकारी कार्यालये व विकास सोसायट्यांची कार्यालये बंद असल्याने सर्व उतारे संबंधित बॅंकांनी ऑनलाइन काढून प्राप्त अर्जावर तीन दिवसांत कार्यवाही करायची आहे. आता हा प्रयोग राज्यभर राबविला जाणार आहे. 


राज्यातील सुमारे 43 लाख शेतकरी महात्मा फुले शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरले असून त्यापैकी 28 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्या तयार आहेत, परंतु कोरोनामुळे काम थांबले आहे. तत्पूर्वी, कोरोनाचा फटका बळीराजाला बसू नये या हेतूने सरकारी पातळीवर सर्वोतोपरी प्रयत्न सुरु झाले आहेत. खरीप हंगामात 31 मेपर्यंत राज्यातील 28 जिल्हा बॅंकांनी एकूण उद्दिष्टापैकी 39 टक्‍केच कर्जवाटप केले असून राष्ट्रीयीकृत बॅंकांचीही स्थिती अशीच आहे. सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या खरीप हंगामात सर्वच पात्र शेतकऱ्यांना बॅंकांकडून पीक कर्ज मिळावे, या हेतूने हा ऑनलाईनचा नवा प्रयोग आता राज्यभर राबविला जाणार आहे. यामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून पशुसंवर्धनाच्या कर्जासाठीही अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. 


सोलापुरात रविवारी (ता. 7) या प्रयोगाला प्रारंभ 


कोरोनाचा संर्सग सोलापूरसह राज्यभर वाढू लागला असून आता खरीप हंगामाची लगबग सुरु आहे. या संसर्गापासून दूर असलेल्या बळीराजाला काम सोडून बॅंकांमध्ये हेलपाटे मारायला लागू नयेत म्हणून पीक कर्जासाठी घरबसल्या ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. खरीप हंगामातील कर्जवाटपाला आता वेग आला असून जूनमध्ये सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक कर्जवाटप होते. शेतकऱ्यांनी केलेल्या ऑनलाइन अर्जावर बॅंकांनी तीन दिवसांत कार्यवाही करणे बंधनकारक असून संबंधित शेतकऱ्यांकडून कागदपत्रे घेऊन पात्र शेतकऱ्याला कर्जवाटप करावे, असे निर्देश दिले आहेत. आता हा प्रयोग कायमस्वरुपी राज्यभर राबविला जाईल. 
- संतोष सोनोने, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, सोलापूर 

ठळक बाबी... 
- ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तीन दिवसांत कार्यवाही करणे बंधनकारक 
- शेतकऱ्यांनी केलेल्या ऑनलाइन अर्जाच्या पडताळणीसाठी जिल्हा समन्वयकांची नियुक्‍ती 
- आगामी काळात शेतकऱ्यांचे बॅंकांमधील हेलपाटे कमी करण्याच्यादृष्टीने प्रयत्न : मोबाईलवरच समजणार अर्जाचे स्टेटस 
- शेतकऱ्यांनी एकाच बॅंकेत, ज्या बॅंकेकडे त्यांचे गाव दत्तक आहे, त्याठिकाणी करावा अर्ज 
- किसान क्रेडिट कार्ड असलेल्यांनाही मिळणार कर्ज : ऑनलाइन अर्जास मोठा प्रतिसाद 
-------------- 
कर्ज नाकारल्यास बॅंकांना द्यावे लागणार कारण 


कर्जासाठी पात्र असूनही अनेकदा शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही तथा त्यास विलंब लावला जातो. या पार्श्‍वभूमीवर बळीराजा नाईलाजास्तव खासगी सावकाराचा दरवाजा ठोठावतो, अशी उदाहरणे पहायला मिळतात. मात्र, आता पीक कर्जासाठी ऑनलाइन सोय केल्याने बळीराजाला त्यांचा अर्ज अपात्र का ठरविला अथवा विलंब का लागला, याची कारणे बॅंकांना द्यावी लागणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे बॅंकांमधील हेलपाटे तर कमी होतीलच. तसेच बॅंकांची मनमानीही कमी होऊन बळीराजाला वेळेत कर्ज मिळण्यास मदत होईल, असा विश्‍वास अनेकांनी व्यक्‍त केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com