आनंदाची बातमी; उजनीमध्ये सहा दिवसात वाढले दोन टीएमसी पाणी 

संतोष सिरसट 
Tuesday, 23 June 2020

उजनी धरणातील पाण्याची स्थिती 
16 जून ः उपयुक्त पाण्याची टक्केवारी ः वजा 23.18 टक्के 
16 जून ः उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमध्ये ः वजा 12.42 टीएमसी 
22 जून ः उपयुक्त पाण्याची टक्केवारी ः वजा 19.32 टक्के 
22 जून ः उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमध्ये ः वजा 10.35 टीएमसी 
मागील वर्षीची स्थिती ः उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ः वजा 58.35 
मागील वर्षीची स्थिती ः उपयुक्त पाणीसाठा टीएमसीमध्ये ः वजा 31.26 टीएमसी 

सोलापूर ः पावसाळ्याच्या हंगामामध्ये सोलापूरसह पुणे, नगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा या उजनी धरणाकडे लागलेल्या असतात. कधी एकदा धरण शंभर टक्के भरते याकडे सगळ्यांच्या नजरा असतात. नुकतेच मृग नक्षत्र संपले आहे. या नक्षत्रामध्ये यंदा चांगला पाऊस झाला आहे. त्या पावसामुळे मागील सहा दिवसात उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये जवळपास दोन टीएमसीने वाढ झाली आहे. ही बातमी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची आहे. 

उजनी धरणाला जिल्ह्याची वरदायिनी असे म्हटले जाते. या धरणावर जिल्ह्यातील जवळपास सव्वा दोन लाख हेक्‍टरवरील उसक्षेत्र अवलंबून आहे. या धरणाच्या जोडीला नीरेचे पाणीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मदतीला येत असल्यामुळे जिल्ह्याचे नंदनवन झाले आहे. मात्र, याला काही तालुके अपवाद आहेत. या तालुक्‍याला उजनी व निरेचे पाणी देण्यात अद्यापही राज्यकर्त्यांना यश आले नाही. मात्र, ज्या-ज्या भागामध्ये उजनीचे पाणी फिरले आहेत. त्या भागातील उसाचे क्षेत्र जोमाने वाढले आहे. ऊस वाढल्याने त्याठिकाणच्या शेतकऱ्यांमध्ये सुबत्ता आली आहे. आर्थिक सुबत्ता आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

यंदाच्या उन्हाळी हंगामात धरणातून शेतीसाठी पाणी सोडले होते. त्यामुळे धरणाची पाणीपातळी वजा 25 टक्‍यांच्या पुढे गेली होती. त्यातच पावसाळा सुरु झाल्याने मृग नक्षत्रात धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला आहे. त्या पावसाचे पाणी धरणात आल्याने धरणाच्या पाणीपातळीत जवळपास दोन टीएमसी इतकी वाढ झाली आहे. त्याचबरोबर धरणाच्या पाणीपातळीत मागील सहा दिवसात तब्बल चार टक्‍यांनी वाढ झाली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news; Two TMC of water increased in six days in Ujjain