

तात्या लांडगे
सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण ५२ टक्क्यांपर्यंत भरले आहे. त्यातील दोन टीएमसी पाणी शासनाच्या परवानगीने आषाढी वारीसाठी भीमा नदीत सोडले जाणार आहे. दुसरीकडे, जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी शेतीसाठीही पाणी सोडण्याची मागणी केली आहे. पण, ‘एल निनो’च्या संकटामुळे धरणातून पाणी सोडण्यासाठी शासनाच्या परवानगीची अट घालण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यात जुलैअखेर सरासरी १५० ते २०० मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा कोणत्याही तालुक्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाळा सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी उडीद, सोयाबीन, मका, तूर, हरभरा आदी पिकांची पेरणी केली, बागा लावल्या. मात्र, अजूनही अपेक्षित पाऊस पडलेला नाही. त्यामुळे मोहोळ, पंढरपूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, करमाळा, माढा या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी उजनीतून कालव्याद्वारे शेतीला पाणी सोडण्याची मागणी केली आहे. मात्र, एकाही आमदाराने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंत्यांना लेखी पत्र दिलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना उजनीच्या पाण्याची नव्हे, तर पावसाचीच वाट पाहावी लागणार आहे.
उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय शासन स्तरावर
"सोलापूर जिल्ह्यात पाऊस न झाल्याने शेतीसाठी उजनी धरणातून पाणी सोडा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. काही लोकप्रतिनिधींनीदेखील तशीच मागणी केली आहे. मात्र, सर्वांनी तोंडी किंवा फोनवरून मागणी केली असून लेखी कोणाचीही मागणी आलेली नाही. उजनीतून पाणी सोडण्याचा निर्णय शासन स्तरावरच होईल."
- एस. एस. खांडेकर, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर
११ वर्षांनंतर पहिल्यांदाच पाण्याची मागणी
२०१५ मध्ये सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला होता. त्यावेळीदेखील शेतकऱ्यांनी ऐन पावसाळ्यात उजनीतून पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता २०२६ मध्ये पावसाळा सुरू असताना शेतकऱ्यांची तशीच मागणी आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी जिल्ह्यात महापूर आला होता. पण, यंदा सरासरी एवढादेखील पाऊस झालेला नाही. पेरण्या खोळंबल्या असून पेरणी केलेल्या क्षेत्रावर दुबार पेरणीचे संकट आहे.
उजनी धरणातील पाणीसाठा
एकूण पाणीसाठा
९१.३५ टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा
२७.६९ टीएमसी
पाण्याची टक्केवारी
५१.६० टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.