मोठी ब्रेकिंग! अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी; आता राज्यातील 'एवढ्या' ग्रामपंचायतींवर प्रशासक 

तात्या लांडगे
Friday, 26 June 2020

ग्रामपंयातींवरील प्रशासक नियुक्‍तीचा पुढील आठवड्यात शासन निर्णय 
राज्यातील एप्रिल, मे आणि जूनमध्ये एक हजार 566 ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. तर जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत 12 हजार 668 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार मुदत संपलेल्या एकूण 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे अशक्‍य आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार प्रशासक नियुक्‍तीचा अध्यादेश राज्यपालांकडे पाठविला होता. त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झाली असून पुढील आठवड्यात त्याबाबत शासन निर्णय जारी होईल. 
- हसन मुश्रिफ, ग्रामविकास मंत्री

सोलापूर : एप्रिल, मे आणि जूनमध्ये मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायती आणि जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान प्रस्तावित असलेल्या 12 हजार 668 ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्‍तीच्या अध्यादेशावर राज्यपालांनी गुरुवारी (ता. 25) स्वाक्षरी केली आहे. आता पुढील आठवड्यात त्याबाबतचा अध्यादेश जारी केला जाणार आहे. 

मुदत संपलेल्या व कोरोनामुळे निवडणुका होऊ न शकणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. ग्रामपंचायत कायद्यामध्ये आवश्‍यक दुरुस्ती करण्यासाठी अध्यादेश काढण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. निवडणुका पुढे ढकलण्याचा अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. एप्रिल, मे आणि जूनमध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका वेळेत होणे आवश्‍यक होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणे, निवडणुकीचे कामकाज, प्रचारसभा, मेळावे आदींचे आयोजन केले जाते. मात्र, कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन या ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. 

निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार... 
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार कोणत्याही कारणांमुळे (नैसर्गिक आपत्ती, आणीबाणी, युद्ध, वित्तीय आणीबाणी किंवा प्रशासकीय अडचणी इत्यादी मुळे) मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींबाबत निवडणूक आयोगाच्या घोषित कार्यक्रमानुसार निवडणूक घेता येत नसल्यास शासनास त्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्‍तीचा अधिकार देण्यात आला आहे. जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची कार्यवाही थांबवावी. तसेच ज्या ग्रामपंचायतींची 5 वर्षांची मुदत संपेल, तिथे विद्यमान कार्यकारिणी पुढे तशीच चालू न ठेवता, त्या ठिकाणी मुदत संपण्यापूर्वी योग्य प्रशासकाची नेमणूक करावी, असेही आयोगाने स्पष्ट केले होते. दरम्यान, वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेऊन व आवश्‍यकतेनुसार राज्य शासनाशी सल्लामसलत करुन निवडणुकांवरील स्थगिती उठवण्याबाबत व निवडणुकींबाबत निर्णय घेतला जाईल, असेही आयोगाने राज्य सरकारला कळविले आहे. 

ग्रामपंयातींवरील प्रशासक नियुक्‍तीचा पुढील आठवड्यात शासन निर्णय 
राज्यातील एप्रिल, मे आणि जूनमध्ये एक हजार 566 ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. तर जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत 12 हजार 668 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार मुदत संपलेल्या एकूण 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे अशक्‍य आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार प्रशासक नियुक्‍तीचा अध्यादेश राज्यपालांकडे पाठविला होता. त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झाली असून पुढील आठवड्यात त्याबाबत शासन निर्णय जारी होईल. 
- हसन मुश्रिफ, ग्रामविकास मंत्री

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Governor signs ordinance appointing administrators unable to hold elections for 14 thousand 234 Grampanchayatis