गोविंदपूर हत्याकांड! शेतीवरुन ६ जणांचा गोळ्या झाडून खून; भीमातिरावरील रक्तरंजित वैराचा इतिहास पुन्हा चर्चेत, सूडचक्राची सुरवात कोठून झाली, वाचा...

कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती भागातील टोळीयुद्धाच्या सुरुवातीच्या काळात केंद्रस्थानी मानल्या जाणाऱ्या माणिकप्पा मास्तरांसह त्यांच्या तीन मुलांचा या संघर्षात बळी गेला. त्यातील एका मुलाची दोन मुले आजोळी वाढली. त्यापैकी एकाने ग्रामपंचायतीचे सरपंचपदही मिळविले. मात्र, नुकत्याच घडलेल्या गोविंदपूर (ता. चडचण, जि. विजयपूर) हत्याकांडातील आरोपी म्हणून याच दोघा भावांची नावे पुढे आल्याने भीमातिरावरील चार-पाच दशकांच्या रक्तरंजित वैराचा इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे.
govindpura case, karnataka

govindpura case, karnataka

solapur sakal

Updated on

सोलापूर : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती भागातील टोळीयुद्धाच्या सुरुवातीच्या काळात केंद्रस्थानी मानल्या जाणाऱ्या माणिकप्पा मास्तरांसह त्यांच्या तीन मुलांचा या संघर्षात बळी गेला. त्यातील एका मुलाची दोन मुले आजोळी वाढली. त्यापैकी एकाने ग्रामपंचायतीचे सरपंचपदही मिळविले. मात्र, नुकत्याच घडलेल्या गोविंदपूर (ता. चडचण, जि. विजयपूर) हत्याकांडातील आरोपी म्हणून याच दोघा भावांची नावे पुढे आल्याने भीमातिरावरील चार-पाच दशकांच्या रक्तरंजित वैराचा इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे.

भीमातिरावरील टोळीयुद्धामुळे देवणगाव (ता. सिंदगी, जि. विजयपूर) आणि उमराणी (ता. चडचण, जि. विजयपूर) ही गावे अधिक चर्चेत आली. मात्र, या संघर्षाच्या इतिहासात सोन्न (ता. अफजलपूर, जि. कलबुर्गी) गावाची भूमिकाही तितकीच महत्त्वाची राहिली आहे. महाराष्ट्रातून वाहत कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या भीमा नदीच्या एका तीरावर सोन्न तर दुसऱ्या तीरावर देवणगाव वसले आहे. या दोन गावांना जोडणारा पूल अनेक रक्तरंजित घटनांचा आणि भीमेच्या पात्रात वाहून गेलेल्या मृतदेहांचा मूक साक्षीदार ठरला आहे.

देवणगावातील सिद्धप्पा बोरगी आणि निंगप्पा कणमेश्‍वर या कुटुंबांमध्ये शेतीच्या छोट्या तुकड्यावरून वाद होता. हा वाद स्थानिक पातळीवर मिटण्याची शक्यता असतानाच इतर हितसंबंध गुंतत गेले आणि संघर्ष तीव्र होत गेला. त्यात माणिकप्पा मास्तर यांचे नावही पुढे आले. त्यांच्या शेताच्या बांधावरूनही वाद निर्माण झाल्याची चर्चा त्या काळात होती.

सूडचक्राची सुरुवात

भुसनूरच्या साखर कारखान्यातून ऊसबिल घेऊन सायकलवरून गावाकडे परतणाऱ्या सिद्धप्पा बोरगी यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर घटनांनी वेग घेतला. पुढे भीमातिरावरील टोळीयुद्धातील कुख्यात नाव ठरलेल्या चंदप्पा हरिजन यांचे मोठे बंधू यल्लप्पा हरिजन यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांना पाय गमवावा लागला. या घटनांमधूनच पुढे शिवाजी बोरगी, चंदप्पा हरिजन आणि केशप्पा तावरखेड यांची टोळी आकाराला आली. त्यानंतर सुरू झालेले सूडचक्र अनेक वर्षे थांबले नाही. एका हत्येचा बदला दुसऱ्या हत्येने घेतला जात राहिला आणि भीमातिरावरील अनेक कुटुंबे या संघर्षात उद्ध्वस्त झाली.

संघर्षातील प्रमुख व्यक्ती, पण दुर्दैवी शेवट

टोळीयुद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यात माणिकप्पा मास्तर यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. मात्र, या संघर्षाने त्यांनाही सोडले नाही. ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी विजयपूर येथील गॅरेजमध्ये गेलेल्या मास्तर यांची हत्या करण्यात आली. माणिकप्पा मास्तर यांना सहा मुले होती. त्यापैकी बसवराज, युवराज आणि उमेश या तिघांचाही या वैरातून बळी गेला. विशेषतः उमेश यांची केशप्पा तावरखेड याने केलेली निर्घृण हत्या त्या काळात मोठ्या चर्चेचा विषय ठरली होती. अशा प्रकारे एका पिढीत सुरू झालेले वैर पुढील पिढीपर्यंत पोहोचले.

टोळीयुद्धाला मिळाले ‘राजकीय वळण’

माणिकप्पा मास्तर यांच्या हत्येनंतर संशयाची सुई चौळप्पागौडा यांच्याकडे वळली. त्यामुळे त्यांना सावध राहण्याचा सल्ला अनेकांनी दिला. मात्र, या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे मानून ते निर्धास्तपणे वावरत राहिले. दरम्यान, अतूनर फाट्याजवळ त्यांची जीप अडवून निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह जीपमध्येच टाकण्यात आला. या घटनेनंतर टोळीयुद्धाला केवळ गुन्हेगारी नव्हे, तर राजकीय स्वरूपही प्राप्त झाले. चौळप्पागौडा हे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यानंतर उभ्या राहिलेल्या विविध टोळ्यांनी कलबुर्गी, विजयपूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत अनेक गुन्हेगारी कारवाया केल्याच्या नोंदी आढळतात.

आजोबांनी वाढवलेले नातू, आता आरोपींच्या यादीत

माणिकप्पा मास्तर यांचा मोठा मुलगा बसवराज यांची पत्नी ही गोविंदपूर हत्याकांडातील दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी अप्पुगौडा पाटील यांची बहीण आहे. बसवराज यांच्या हत्येनंतर त्यांचे सासरे लक्कणगौडा पाटील यांनी मुलगी आणि तिच्या प्रकाश व प्रशांत या दोन मुलांना गोविंदपूर येथे आणून सांभाळले. प्रशांत ऊर्फ परूगौडा पाटील हे निवर्गी ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. मात्र, गोविंदपूर हत्याकांडात चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचे आरोपी म्हणून दोघा भावांची नावे समोर आली. त्यामुळे टोळीयुद्धाच्या सुरुवातीच्या काळातील माणिकप्पा मास्तरांपासून आजच्या पिढीतील नातवांपर्यंत पोहोचलेला रक्तरंजित इतिहास पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com