esakal | नायगावच्या ग्रामपंचातीच्या निवडणूकीत उच्चशिक्षीत पती-पत्नी आमनेसामने
sakal

बोलून बातमी शोधा

नायगावच्या ग्रामपंचातीच्या निवडणूकीत उच्चशिक्षीत पती-पत्नी आमनेसामने

निवडणुकीत दोघांनीही एकमेकांसमोर अनवधानाने अर्ज टाकला आहे, असे दोघांचेही म्हणणे आहे.

नायगावच्या ग्रामपंचातीच्या निवडणूकीत उच्चशिक्षीत पती-पत्नी आमनेसामने

sakal_logo
By
कैलास शिंदे

जळगाव : ग्रामपंचायत निवडणुकीत भावकीची लढाई अधिक असते. अनेक ठिकाणी भाऊ विरुद्ध भाऊ, दीर विरुद्ध भावजय अशा लढती होत आहेत; परंतु पतीविरुद्ध पत्नीनेच निवडणुकीच्या मैदानात आव्हान दिले आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीत ही चुरशीची लढत होत आहे. विशेष म्हणजे दोघेही उच्चशिक्षित असून, माजी सरपंच आहेत. राज्यातील ही एकमेव लढत ठरणार आहे. 
 

आवश्य वाचा- पाच वर्षांनी एकमेकांना दिले आलिंगन..उपस्थितांच्या डोळ्यात आले पाणी 

जळगाव जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या नायगाव (ता. यावल) साधारणतः सात हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात पाच प्रभाग आहेत, तर गावात १३ ग्रामपंचायत सदस्यांची संख्या आहे. नायगाव येथील नरेंद्र रंगराव पाटील यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी मीनाक्षी नरेंद्र पाटील या मैदानात आहेत. प्रभाग क्रमांक पाच (ब)मधून ही लढत होत आहे. 

दोघेही उच्चशिक्षित 
नरेंद्र पाटील व मीनाक्षी पाटील यांच्या लग्नाला २७ वर्षे झाली आहेत. मीनाक्षी पाटील यांचे वडील ‘बीएचईएल’मध्ये असल्यामुळे त्यांचे बीएस्सी (कृषी)पर्यंतचे शिक्षण मध्य प्रदेशात भोपाळ येथे झाले आहे. नरेंद्र पाटील नायगाव येथील सधन शेतकरी आहेत. त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. शेतीसोबत ते बांधकामाचा व्यवसायही करतात. त्यांना मुलगा व मुलगी आहे. मुलगा व मुलीचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. 

दोन्हीही गावांतील माजी सरपंच 
नरेंद्र पाटील व मीनाक्षी पाटील हे दोघे गावातील माजी सरपंच आहेत. २००५ ते २०१० या कालावधीत मीनाक्षी पाटील सरपंच होत्या, तर २०१० ते २०१५ च्या कालावधीत नरेंद्र पाटील सरपंच होते. सद्य:स्थितीत मीनाक्षी पाटील ग्रामपंचायत सदस्या आहेत. 

आवर्जून वाचा- मृत्यूची प्रतीक्षा करताय का? जळगावकर संतप्त !
 

अशी होत आहे लढत 
नरेंद्र पाटील व मीनाक्षी पाटील यांच्यात दोन वर्षांपासून कौटुंबिक वाद आहे. मात्र तो सामोपचाराने सोडविण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्याबाबत त्यांची चर्चाही सुरू आहे. मात्र निवडणुकीत दोघांनीही एकमेकांसमोर अनवधानाने अर्ज टाकला आहे, असे दोघांचेही म्हणणे आहे. दोघेही सध्या विभक्त राहत आहेत. मीनाक्षी पाटील यांनी प्रभाग क्रमांक १ (ब), २ (क)मधून अर्ज दाखल केला आहे. 

माघारीचा प्रयत्न 
प्रभाग क्रमांक पाच या सर्वसाधारण गटातून त्यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्यासमोर पती नरेंद्र पाटील यांनीही अर्ज दाखल केला. ज्या वेळी दोघांनी एकाच प्रभागात आमनेसामने अर्ज असल्याचे समजले, त्या वेळी दोघांमध्ये सामोपचाराचा प्रयत्न झाला. परंतु माघारीची वेळ निघून गेली आहे. त्यामुळे आताही जाहीर माघारीचे प्रयत्न सुरू आहेत, अर्थात सध्याची ही लढत मैत्रीपूर्ण असेल. या प्रभागात दोघांशिवाय आणखी एक उमेदवार आहे. मात्र आता या लढतीकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे. प्रभाग पाचमध्ये ५७४ मतदार आहेत. त्यामुळे हे मतदार कोणाला कौल देणार हे मतमोजणीतच स्पष्ट होईल. 

हेही वाचा- महापालिकेचा रस्त्याच्या कामासाठी नवा ७० कोटींचा आराखडा

नायगावच्या विकासासाठी आपण कार्य करीत आहोत. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आपण विकासासाठी मैदानात आहोत. या प्रभागातून जाहीर माघार झाली नाही तर पतीविरुद्ध आपली लढत होईल. जनतेचा कौल आपल्याला मान्य असेल. 
-मीनाक्षी नरेंद्र पाटील 


राजकारण माझा व्यवसाय किंवा प्रतिष्ठाही नाही, गावाच्या विकासासाठी आपण समाजसेवा करीत आहोत. पत्नीच्या विरोधात या प्रभागातून माझा अर्ज आहे. प्रभागातून सामोपचाराने जाहीर माघार घेण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. मात्र न झाल्यास आपली लढत होईल व जनतेचा कौल आपल्याला मान्य असेल. 
-नरेंद्र रंगराव पाटील 

 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top