चीन, आखातातही द्राक्षांची निर्यात वाढवा : पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

शरद पवार यांचा द्राक्ष बागायतदारांना सल्ला; दिल्लीत बैठकीचे आश्‍वासन 

पुणे : जागतिक बाजारपेठेत भारतातून निर्यात होत असलेल्या एकूण द्राक्षांपैकी 98 टक्के उत्पादन पाठविणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. सध्या देशातील द्राक्षांची निर्यात युरोपातच होत आहे. आखाती देश, चीनमध्येही द्राक्षांच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांनी त्या देशांमध्येही निर्यात वाढवावी. यासाठी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आणि राज्य सरकारने संयुक्त प्रयत्न करावेत, असा सल्ला माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला. निर्यातवाढीच्या समस्या सोडवण्यासाठी, संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्लीत बैठक घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेन, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. 

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे 59 व्या वार्षिक अधिवेशनाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या वेळी भारतीय अनुसंधान परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहपात्रा, उपमहासंचालक (कृषी विस्तार) डॉ. ए. के. सिंग, बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे (राहुरी) कुलगुरू डॉ. के. पी. विश्‍वनाथ, द्राक्ष बागायतदार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सोपान कांचन, राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, कैलास भोसले, शिवाजी पवार, अरविंद कांचन उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ""भारत हा एकेकाळी अन्नधान्य आयात करणारा देश होता; परंतु तो आता अन्नधान्य निर्यात करणारा देश बनला आहे. देशातील शेतकऱ्यांनी अन्नधान्याची गरज भागविण्याचे काम केले आहे. आता या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी फळांच्या उत्पादनांची जोड दिली पाहिजे. कारण, राज्यात साखर विक्रीची समस्या असली तरी, द्राक्षांच्या बाबतीत ही स्थिती नाही. तरीही द्राक्षांच्या विक्रीसाठी आंतरराष्ट्रीय बाजारात उतरले पाहिजे.''
 
राजेंद्र पवार यांनी अध्यक्षपद कसे स्वीकारले हे कळत नव्हते; परंतु सर्व उत्पादकांच्या आग्रहास्तव त्यांनी हे पद स्वीकारल्याचे सांगण्यात आले. या पदाला ते योग्य तो न्याय देतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मोहपात्रा, सिंग यांनीही मनोगत व्यक्त केले. 

मार्केटिंगसाठी दरवर्षी प्रदर्शन घ्या 
राज्यातील द्राक्ष बागायतदारांचे वार्षिक अधिवेशन घ्या आणि त्याला द्राक्षांच्या मार्केटिंगची जोड द्या. यासाठी वार्षिक अधिवेशनाप्रमाणेच दरवर्षी राष्ट्रीय पातळीवरचे द्राक्षे विक्रीबाबतचे प्रदर्शन भरवा. जेणेकरून देशी, परदेशी खरेदीदारांना आकर्षित करणे सोपे जाईल, असा सल्ला शरद पवार यांनी दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Grapes Export increase in china and gulf countries says Sharad Pawar