

दुभंगलेले संसार पुन्हा आले जुळून
तात्या लांडगे
सोलापूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पतीवर संशय, पत्नी सतत मोबाईलवर बोलत असते, स्वयंपाक नीट येत नाही, मुलगा होत नाही, विवाहात मानपान नीट केला नाही, हुंडा दिला नाही... अशा कारणांवरून महिला पोलिसांत धाव घेत आहेत. दरमहा सरासरी ३५ महिला पोलिसांत तक्रारी देतात. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या ‘भरोसा सेल’ने मागील अडीच वर्षांत ५०१ महिलांची भांडणे मिटवून त्यांचा संसार पुन्हा जोडला आहे.
सोलापूर ग्रामीणमध्ये २५ पोलिस ठाणी आहेत. विवाहापूर्वी गोड गोड बोलणारा पती, सासू-सासरा, नणंद विवाहानंतर काही दिवसांतच किरकोळ कारणातून वाद घालायला सुरवात करतात. विवाहापूर्वी तूच आमची धनलक्ष्मी म्हणणारे सासरचे काही तोळ्यांच्या दागिन्यांसाठी, पैशांसाठी तिचा छळ करतात. घर बांधायला, नवीन घर किंवा जागा घ्यायला, गाडी घ्यायला, घरखर्चासाठी माहेरहून पैसे आण म्हणूनही सासरचे विवाहितेस त्रास देतात. चालू वर्षात जानेवारी ते मे या दरम्यान १६३ महिलांनी सासरच्या छळाला कंटाळून पोलिसांत धाव घेतली आहे.
माळशिरस, करमाळा, बार्शी, सांगोला, अक्कलकोट अशा जिल्ह्यांच्या टोकावरून महिला सोलापूरच्या पोलिस अधीक्षक कार्यालयात येतात. आपले लहान मूल, त्याचे भविष्य, माहेरी राहिल्यास समाज काय म्हणेल, या चिंतेतून विवाहितेचीच पुन्हा नांदायला जाण्याची धडपड असते. मात्र, सासरचे नांदायला तयारच नसल्याने अडीच वर्षांत १६७ महिलांनी पोलिसांत गुन्हे दाखल केले आहेत. तर अडीचशेहून अधिक महिलांनी न्यायालयात धाव घेतल्याचीही नोंद ग्रामीण पोलिसांकडे आहे.
अडीच वर्षांतील तक्रारी
वर्ष एकूण तक्रारी समझोता
२०२४ ४१९ १२५
२०२५ ४२५ २९१
२०२६ १६३ ८५
एकूण १००७ ५०१
‘या’ महिला पोलिस अधिकारी-अंमलदारांची धडपड
भरोसा सेलचे पोलिस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस उपनिरीक्षक गंगूबाई कवचाळे, पोलिस हवालदार मोहिनी भोगे, मधुमती शिंदे, अर्चना मस्के, ज्योती चव्हाण, सुमय्या तांबोळी, मनीषा पवार या महिला पोलिसांनी त्या महिलांचे संसार पुन्हा जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तक्रारदार विवाहितेच्या सासरच्यांना बोलावून त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड असते, जेणेकरून विवाहितेचा संसार तुटणार नाही. त्यासाठी त्यांना पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांचेही मार्गदर्शन लाभले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.