बांधकाम क्षेत्रात गुणवत्तापूर्ण सेवा व गुंतवणुकीची मोठी संधी ः क्रेडाईचे नियोजित राज्याध्यक्ष सुनील फुरडे

sunil furde new.jpg
sunil furde new.jpg

सोलापूर ः  क्रेडाईच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्राला नवे मानदंड स्थापित करण्याचे कार्य पुढील काळात सुरु राहतील., गुणवत्ता व सेवेला नवे आयाम देत बांधकाम क्षेत्राला चालना देण्याचे प्रयत्न केले जातील असे मत क्रेडाईचे  नियोजीत राज्याध्यक्ष सुनील फुरडे यांनी व्यक्त केले. 

"कॉफी विथ सकाळ'मध्ये ते बोलत होते. प्रारंभी "सकाळ'चे सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी क्रेडाईचे काम व बांधकाम क्षेत्राबद्दल मते मांडली. 

सोलापुरात बांदकाम गुंतवणूकीला संधी

सोलापुरात अगदी कमीत कमी दहा लाख रुपयांपासून वन बीएचके मिळू शकतो. प्रशस्त ऐसपैस शहरात कुठेही वाहतुकीचा त्रास नाही. इतर शहराच्या तुलनेत राहणीमान खर्च अत्यंत कमी आहे. नुकत्याच देशव्यापी सर्वेक्षणात ईझ लिव्हिंग इंडेक्‍समध्ये सोलापूरचा क्रमांक 17 वा आहे. खरे म्हणजे सोलापुरात बांधकाम गुंतवणुकीची मोठी संधी आहे. जागामध्येदेखील गुंतवणूक वाढते आहे. या सर्व गोष्टी सकारात्मक आहेत. काही तासांवर असलेल्या पुणे शहराच्या तुलनेत आजही सोलापुरात राहणीमानचा खर्च व घर बांधकामातील गुंतवणूक अत्यंत कमी किंमतीची आहे.  

रेरा कायद्यासाठी क्रेडाईचे योगदान 
रेरा कायदा होण्यासाठी क्रेडाईचा आग्रह होता. एक चांगल्या पध्दतीची नियमावली या बांधकाम क्षेत्राला मदत करणारी ठरू शकेल, यासाठी क्रेडाईने सातत्याने पाठपुरावा केला. प्रथमतः महाराष्ट्राने हा कायदा तयार केला, त्यानंतर केंद्रानेदेखील रेरा कायदा केला. त्या कायद्याचा उपयोग आता बांधकाम क्षेत्राला व ग्राहकालाही होत आहे. 

शासन, ग्राहकामधील दुवा 
पूर्वी राज्यातील विविध शहरांत बिल्डर संघटना होत्या. मात्र राज्याभर व देशभरही बांधकाम व्यवसायिकांसाठी एक व्यासपीठ व्हावे, यासाठी क्रेडाईची स्थापना झाली. तसेच सभासदत्वाचे नियमदेखील अत्यंत काटेकोर करण्यात आले. शासनस्तरावर क्रेडाईने नेहमीच व्यापक ग्राहक हिताला चालना मिळेल व तांत्रिक अडचणी कमी होऊन बांधकाम क्षेत्राला गती मिळवून दिली आहे. बांधकाम क्षेत्रातील सर्वच घटकांना मदत मिळेल, यासाठी अनेक समित्या स्थापन केल्या. अगदी ग्राहकांना काही तक्रारी असतील तर त्याचे निरसन करण्यासाठी देखील क्रेडाईने व्यासपीठ मिळवून दिले. त्यामुळे क्रेडाईने बांधकाम क्षेत्राच्या व ग्राहकांच्या शासकीय दरबारातील अडचणी सोडवण्यासाठी दिलेले योगदान अमूल्यच आहे. 

स्टॅम्प ड्युटीचा निर्णय महत्त्वाचा 
कोरोना काळात जमीन, प्लॉट, फ्लॅट, बंगले इत्यादींचे खरेदी-विक्री व्यवहार मंदावले, तेव्हा क्रेडाईने ग्राहकांना स्टॅम्प ड्युटी सवलत योजनेसाठी आणण्यासाठी शासनाकडे आग्रह धरला. शासनाने त्यास मान्यता दिल्यानंतर या क्षेत्रात उलाढालीचे प्रमाण वाढले. एका अर्थाने या क्षेत्राला चालना देण्याचे काम होऊ शकले. लोकांनी पुढाकार घेत आर्थिक उलाढालीला वेग दिला. त्यामुळे संकटात सापडलेल्या अर्थकारणाला सहजपणे चालना मिळाली. 

उलाढाल महत्त्वाची नाही 
साधारण बिल्डरांबद्दल जे काही समज होतात, ते फ्लॅटच्या किंमतीमुळे होतात. प्रत्यक्षात बिल्डर हा सर्व मंजुरी घेण्यापासून ते बांधकाम पूर्ण करून सर्व दृष्टीने तयार घर करून ग्राहकांना उपलब्ध करून देतो. या पध्दतीच्या कामामध्ये उलाढाल मोठी असली तरी प्रत्यक्षात उलाढालला नफा समजणे चुकीचे आहे. घराचे बांधकाम हे मजुरी व साहित्याच्या आधारे होते. या दोन्ही गोष्टीसाठी सातत्याने मोठा पैसा खर्चावा लागतो. त्यामुळे उलाढालीच्या आकडेवारीला जे हुरळून जातात, त्यांचे नुकसान होत असल्याची उदाहरणे आहेत. त्याची जाणीव ठेवून काम केले तर बिल्डरही अडचणीत येणार नाहीत. म्हणजे पाय जमिनीवर असावेत, हे महत्त्वाचे आहे. 

विकासासाठी अराजकीय फोरम असावा 
शहाराप्रमाणे सोलापुरातदेखील एखादा विकास कामाचा विचार करणारा अराजकीय स्वरुपाचा अभ्यासू तज्ज्ञांचा फोरम असावा. यामध्ये विविध व्यवसायिक संघटना व "सकाळ'सारखी विकासप्रेमी माध्यमे एकत्र यावेत. त्यामुळे लोकांच्या विकासांच्या गरजा नेमक्‍या काय आहेत व त्यांच्या प्राथमिकता काय आहेत, हे विकास प्रक्रियेत अधोरेखित झाले पाहिजे. सोलापुरात चालू असलेले बायपास लवकर झाले तर फ्लाय ओव्हरची नेमकी गरज कमी होणार आहे व शहरात येणारी वाहतूक व अपघात कमी होतील. या सारख्या तांत्रिक बाबी विकासकामाच्या बाबत स्पष्ट होतील. 

आयटी हब, विमानतळाची मोठी संधी 
सोलापूरच्या विकासात दोन मोठ्या संधी समोर आलेल्या आहेत. वर्क फ्रॉम होममुळे अनेक आयटी व्यावसायिक सोलापुरात आले आहेत. त्यांचा उपयोग करून आयटी हब सोलापुरात होण्यास फार मोठा वाव आहे. नुकतेच क्रेडाईच्या एका कार्यक्रमात आयटी तज्ज्ञ दीपक शिकारपूर यांनी याबाबत सुतोवाच केले आहे, त्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच विमानसेवा लवकर चालू झाली तर सोलापूर हे आंतरराष्ट्रीय दर्जाची स्मार्ट सिटी होण्यास आता वेळ लागणार नाही. 

पर्यावरणाचा समतोल महत्त्वाचा 
बांधकाम क्षेत्रात अनेक पर्यावरणाचे मुद्देदेखील आहेत. मध्यंतरी क्रेडाईने एक कोटी झाडांची लागवड करण्याची मोहीम राबवली. त्यासाठी राज्यभरातून बांधकाम व्यावसायिकांनी या मोहिमेला चांगला प्रतिसाद दिला. रेन वॉटर हार्वेस्टिंगची संकल्पनादेखील अंमलात आणली जाते. पर्यावरणीय उपायाचा वापर बांधकाम क्षेत्रात व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच वाळूला पर्याय म्हणून क्रश वाळू वापरली जात आहे. 

वैयक्‍तिक परिचय 
मूळचे बार्शीचे रहिवासी 
अभियांत्रिकी शिक्षण घेतल्यानंतर अध्यापनाचे कार्य 
अनेक वर्ष अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक व नंतर प्राचार्य 
प्राचार्यपदाची नोकरी सोडून व्यवसायात पदार्पण 
मालमत्ता मूल्यांकन क्षेत्रात सल्लागार 
बिल्डर व्यवसायात कार्यरत 
क्रेडाईसह अनेक संघटना, असोसिएशनची उभारणी व पदाधिकारी म्हणून काम 
1 एप्रिल 2021 पासून क्रेडाईचे राज्याध्यक्षाचे सूत्र स्वीकारणार  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com