esakal | पालकमंत्री भरणे म्हणाले, सोलापूरच्या जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

bharne mama

महापालिकेच्यावतीने कॉल सेंटर स्थापन करा. या कॉल सेंटरच्या माध्यमातून को-मॉर्बिड नागरिकांवर लक्ष ठेवा. त्यांना आरोग्याची काळजी घेण्याबाबत एसएमएस करा. यामध्ये महानगरपालिकेच्या शिक्षकांना सहभागी करून घ्या. या मोहिमेत स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांना सहभागी करून घ्या. 
- डॉ.सुधाकर शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य 

पालकमंत्री भरणे म्हणाले, सोलापूरच्या जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी कोरोनाबाधित आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेले सोलापूरचे जिल्हाधिकारी व पोलिस आयुक्त यांना होम क्वारंटाईन केले होते. वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या दोन्ही अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असून सोमवारपासून (ता. 6) हे अधिकारी कार्यालयात रुजू होतील अशी माहितीही पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

पालकमंत्री भरणे म्हणाले, सोलापुरातील प्रतिबंधित क्षेत्रात आज मी फिरलो. या भागातील नागरिकांनी सोलापुरात लॉकडाऊन करण्याची मला विनंती केली. काही लोक लॉकडाऊन नको म्हणत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या दोन्ही मतप्रवाहांचा विचार केला जाईल. सोलापुरातील एक लाख लोकांची रॅपिड अँटीजेन टेस्ट, या टेस्टमध्ये बाधित सापडणाऱ्या व्यक्ती, त्यांच्या संपर्कातील व्यक्ती, यांच्यासाठी उपचार व विलगीकरणाची व्यवस्था आणि लॉकडाऊन अशा सर्व पद्धतीचा विचार केला जाईल अशी माहिती सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 

सोलापुरातील लॉकडाऊन हा अचानकपणे होणार नाही. लोकप्रतिनिधी, प्रशासन, व्यापारी यांच्याशी चर्चा केली जाईल. नागरिकांना चार ते पाच दिवसांची मुदत दिली जाईल. त्यानंतर लॉकडाऊनची घोषणा होईल अशी माहितीही पालकमंत्री भरणे यांनी दिली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधाकर शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे आदी उपस्थित होते. 

  • पालकमंत्री भरणे यांच्या सूचना 
  • सर्व यंत्रणा सज्ज करुनच लॉकडाऊनचा निर्णय 
  • कोरोना चाचण्यांची संख्या तिप्पट करा 
  • महानगरपालिकेला आवश्‍यक मनुष्यबळ, निधी, पोलिस बळ देऊ 
  • येत्या तीन-चार दिवसात महानगरपालिकेला उपलब्ध होणार किट्‌स 
  • चाचण्यापुर्वी मनपाच्या क्वारंटाईन सेंटर, कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची क्षमता वाढवा