Video : सोलापूरचे पालकमंत्री गडबडले...फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणाले 

प्रमोद बोडके
Friday, 26 June 2020

पालकमंत्र्यांनाही समजेना सोलापुरात निलंबित अधिकारी आलेच कसे? 
सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोलापुरातील कोरोना आटोक्‍यात आणण्यासाठी पालकमंत्री भरणे सातत्याने सोलापूरचा दौरा करत आहेत. सोलापूरचे जिल्हा प्रशासनही शर्थीचे प्रयत्न करत आहे. सोलापूर महापालिकेसाठी राज्य सरकारने एक नवीन अतिरिक्त आयुक्त व सहाय्यक आयुक्त यांची नियुक्ती केली आहे. सोलापूरसाठी नियुक्‍त केलेले सहाय्यक आयुक्त नानासाहेब महानवार हे निलंबित होते. निलंबित अधिकारी सोलापूरला देण्याची वेळ आली आहे का? असा प्रश्‍न पालकमंत्री भरणे यांना विचारला असता? याबाबत आपल्याला माहिती नाही. माहिती घेऊ असे उत्तर पालकमंत्री भरणे यांनी दिले. 

सोलापूर : महाराष्ट्रात राजकीय चमत्कार झाला. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार अस्तित्वात आले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक जागा मिळून देखील भाजपला सत्तेपासून आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदापासून वंचित रहावे लागले आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर आली आणि महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, कोरोना आणि निसर्ग वादळाचा तडाखा अशी संकटाची मालिकाच सुरू झाली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण? याचा विसरच सर्वसामान्य जनतेला पडू लागला आहे. सर्वसामान्य जनतेचे ठीक आहे, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात काम करणाऱ्या एखाद्या मंत्री महोदयालाच हा विसर पडला तर? 

असाच विसर सोलापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री दत्तात्रेय भरणे यांना गुरुवारी पडला. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी चक्क माजी मुख्यमंत्री व राज्याच्या विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाच उल्लेख केला. सोलापुरातील कोरोना स्थितीचा व उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भरणे गुरुवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते.

जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठक संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी हा प्रकार घडला. राज्यातील नाभिक समाजाच्या प्रश्‍नाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना सोलापूरचे पालकमंत्री भरणे म्हणाले, हा प्रश्‍न मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला आहे. आपल्याकडून मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचे नाव उच्चारले गेले असल्याचे पालकमंत्री भरणे यांच्या लक्षात आले. त्यांनी अवघ्या काही क्षणातच स्वत:ला सावरत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असा उल्लेख केला. मुख्यमंत्री फडणवीस असा उल्लेख करताच बाजूला थांबलेल्या कार्यकर्त्यांचेही चेहरे अवाक्‌ झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Guardian Minister of Solapur is confused Chief Minister called Fadnavis