अहंमन्य मराठीजनांस राग कशाचा येतो?

अहंमन्य मराठीजनांस राग कशाचा येतो?
अहंमन्य मराठीजनांस राग कशाचा येतो?
अहंमन्य मराठीजनांस राग कशाचा येतो?Canva

मुंबईवर गुजरातचे अतिक्रमण मराठी मनाला सोसवत नाही. आपल्या जायबंदी अस्मितेच्या जखमेवर गरब्याचे मीठ टाकल्यासारखं मराठी मन अदानीच्या गरब्याने तळमळून उठलं.

मुंबईवर गुजरातचे (Gujarat) अतिक्रमण मराठी (Marathi) मनाला सोसवत नाही. आपल्या जायबंदी अस्मितेच्या जखमेवर गरब्याचे मीठ टाकल्यासारखं मराठी मन अदानीच्या गरब्याने तळमळून उठलं. काहींना मळमळही झाली. त्यांनी गरब्याला झिंगाटने प्रत्युत्तर देण्याची भाषा केली. हरकत नाही, पण अदानीने विमानतळ ताब्यात घेतले हे जर सहन होत नसेल, तर आपल्याकडे आहे का कोणी खमका मराठी उद्योजक, जो त्याला आव्हान देऊ शकेल? (Gujarat's encroachment on Mumbai is not tolerated by the Marathi mind-ssd73)

अहंमन्य मराठीजनांस राग कशाचा येतो?
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 24 जुलै 2021

मुंबईतील (Mumbai) आंतरराष्ट्रीय विमानतळ आतापर्यंत जीव्हीके ग्रुपच्या (GVK Group) शेट्टींच्या ताब्यात होते. आता त्याचा ताबा अदानींनी (Adani) घेतलाय. साहजिकच मुंबई विमानतळावर त्यांचं व्यवस्थापन असणार आहे. मुंबईतील बहुसंख्य मोठी हॉटेल्स आणि उपाहारगृहे शेट्टी कंपनी चालवते. पूर्वीपासून सुरक्षारक्षकाचे काम नेपाळी, आसामी लोक करायचे, आता ते काम उत्तर प्रदेश, बिहारच्या लोकांनी ताब्यात घेतले आहे. फेरीवाल्यांचे सारे धंदेही त्यांनीच काबीज केलेत. एवढंच नव्हे, तर हल्ली हेच लोक- ज्यांना महाराष्ट्रात सामान्यपणे परप्रांतीय म्हणून संबोधले जाते ते- मासेविक्रीसारख्या स्थानिकांच्या रोजगारातदेखील शिरलेत. तुम्ही कुठल्याही मोठ्या माणसाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण आहे विचारा, बहुतेक ठिकाणी परप्रांतीयच ती नोकरी करतात. मराठी माणसाला स्थळ, काळाची अधिक चिंता असल्यामुळे तो सहसा अशा कमी महत्त्वाच्या कामांमध्ये पडत नाही. टॅक्‍सी, रिक्षांसारखे वाहतुकीचे व्यवसाय तर उत्तर प्रदेश, बिहारच्या लोकांनी केव्हाच काबीज केलेत. मुंबईतील मोठमोठ्या इमारतींच्या बांधकामांसाठी, अंगमेहनतीच्या कामांसाठी येणारे लोक हे झारखंड, बिहार, छत्तीसगडसारख्या राज्यांमधून येतात. दक्षिण भारतीयांनी तर महाराष्ट्रात त्यांची खाद्यसंस्कृती अशी काही रुजवली आहे, की आता डोसा आणि इडली हे जणू अळूवडी आणि शिरा-पोह्यांच्याच पंगतीतले भाऊ-बहीण वाटतात. चहावाल्यांचा मुंबईसारख्या गर्दीच्या भागातील अत्यंत महत्त्वाचा धंदा अमृततुल्यसारखा एखादा अपवाद वगळला तर मोठ्या प्रमाणात राजस्थानी लोकांनी हातात घेतलाय. पूर्वी एखाद्या चौकाच्या उंबरठ्यावर असणारी केश कर्तनालये आता पार्लरसारख्या मोठ्या प्रतिष्ठापनांमध्ये रूपांतरित झाली आहेत. वातानुकूलित व्यवस्थेसह अन्य महागड्या सोई-सुविधा पुरवणारे हे पार्लर्स आता कोट्यवधींची उलाढाल करतात. ते चालवणारे परप्रांतीय त्याच दुकानात राहून कोटींची उड्डाणे घेत आहेत. मुंबईच काय, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातीलही छोटेखानी सुपर मार्केटचा पसारादेखील राजस्थानी, कच्छी लोक चालवतात.

एकंदरीतच काय "जशी बाजारपेठ तशी सेवा' या साध्या सूत्रानुसार या लोकांनी मुंबईतली एक-एक बाजारपेठ हळूहळू काबीज केली आहे. मुंबईतील किरकोळ बाजारपेठेवर तर कायमच गुजराती लोकांचा वरचश्‍मा राहिला आहे. प्रत्येकाने धंद्याचे तंत्र जोखून आपापली जागा तयार केली आहे. झवेरी बाजार, हिरे बाजारात मराठी माणूस शोधायला तर कुठले तरी भिंगच घेऊन बाहेर पडायला लागेल.

अहंमन्य मराठीजनांस राग कशाचा येतो?
पक्षीदर्शन : ब्रेकफास्ट विथ ओडीकेएफ

मुंबई हे मुळातच गर्दीचे शहर. इथली साधी लोकल रेल्वे पाहिली, तरी या एवढ्याशा डब्यात इतकी माणसं कशी बसतात, असा प्रश्न पडतो; पण तरीही प्रत्येक जण त्या गर्दीत स्वत:ची जागा तयार करत असतो. फक्त त्याकरिता सोसावा लागणारा त्रास सहन करण्याची तुमची तयारी कशी आहे, यावर गर्दीतले तुमचे स्थान किती भक्कम हे ठरते. वेगवेगळ्या प्रांतांमधून आलेल्यांनी जशीजशी आपली क्षेत्रे काबीज केली आहेत, तशीच गुजराती माणूस म्हणजे धंदा, असे गुजराती माणसाने स्वत:चे गुणसूत्र विकसित केले आहे. प्रत्येक गोष्टीत पैसा आणि प्रगती शोधणाऱ्या गुजराती माणसाला तुम्ही त्याला त्याच्या या स्वभावावरून कितीही टोमणे मारा, तो ते त्याला त्याच्या पाठीवर पडलेली थाप समजतो. त्यांच्या पुढच्या पिढ्यांची जडणघडणदेखील ते याच एका गुणसूत्रावरून ठरवतात आणि म्हणूनच त्यांच्या अंगात धंदा मुरलाय. तेच मराठी माणूस अंगमेहनतीच्या कामात मागे पडतो आणि आपली ही ओळख आपण स्वत: तयार केली आहे. धंदा करावा तो गुजराती, मारवाड्यांनीच, ते आपले काम नाही, ही आपणच आपली घातलेली समजूत; पण त्यातून आपल्यावरच नव्हे, तर आपल्या येणाऱ्या पिढीच्या मानसिकतेवरदेखील परिणाम होत असतो, याचा विचारच कुणी केलेला नाही. शेअर मार्केटसारख्या जोखमीच्या धंद्यात पडायला, तर मराठी माणूस सहज तयार होत नाही. त्या व्यवसायाला तर आपण केव्हाच जुगार ठरवून मोकळे झालोत. मुंबईतल्या, प्रामुख्याने दक्षिण मुंबईतल्या मराठी माणसाला आता तेथे राहणेदेखील परवडत नाही. पुनर्विकासाच्या गगनचुंबी स्वप्नांमध्ये मराठी माणसाच्या स्वप्नांची केव्हाच राखरांगोळी झाली आहे. मलबार हिल, कुलाबा, मरिन लाईन्स, वाळकेश्वर वगैरे सोडाच, साध्या दादर आणि वांद्रयासारख्या परिसरात पुनर्विकासात घर मिळालेल्या मराठी माणसाला त्या घरांचा साधा देखभाल खर्चही परवडेनासा झालाय. त्यामुळे गेल्या पाच-दहा वर्षांमध्ये अशी कित्येक कुटुंबे दक्षिण मुंबईतून स्थलांतरित होऊन उपनगरांमध्ये वास्तव्याला गेली आहेत. कित्येकांनी तर थेट नवी मुंबई आणि वसई-विरारसारख्या मुंबईबाहेरच्या जागा धरल्या आहेत. हे सर्व बोचणारे असले, तरी वास्तव आहे आणि आपल्याला कितीही वाईट वाटले, तरी ते नाकारता येत नाही.

मराठी माणूस कुठल्याच कामाचा नाही किंवा तो काहीच करत नाही, असे म्हणण्याचा इथे अजिबात उद्देश नाही; पण कुठल्याही गोष्टीवर व्यक्त होताना परिस्थितीचा आरसा पाहणे फार महत्त्वाचे आहे. काही उद्योग मराठी माणसाची खासियत आहेत. सहकारातून उभे झालेले कारखाने ही आपली ओळख होती; मात्र आज त्यांची अवस्था पाहवत नाही. तोच गुजरातच्या दुग्ध व्यवसायाचा चेहरा म्हणून अमूलने जग पादाक्रांत केले आहे. आमची कुठेही शाखा नाही, अशी बिरुदावली मिरवणाऱ्या मराठी माणसाला भरदुपारी ग्राहकाच्या तोंडावर दुकानाचे शटर ओढताना आपण आपल्याच भविष्यावर वरवंटा फिरवतोय, याची जाणीव कधी होणार, हा खरा प्रश्न आहे. तेच बाहेरून आलेले लोक तास लोकांना आपली सेवा देऊन आपली उत्पादनक्षमता वाढवत आहेत. गेल्या काही वर्षांत मराठी उद्योगांनीदेखील तसे बदल केलेले दिसतात; पण उत्पादन क्षमतेच्या बाबतीत मात्र अजूनही आपल्याला काहीही करता आलेले नाही. आपल्याकडे कामगार मंडळींना एकंदरीतच कामाच्या चर्चेपेक्षा त्यातून पळवाटा काढण्यात, युनियनबाजी करण्यात जास्त रस असतो. अन्यायासाठी आवाज उठवण्यात गैर काहीच नाही. मात्र मुंबई आणि महाराष्ट्रातील या कंपनी दादांच्या जाचाला कंटाळून आज अनेक कंपन्या महाराष्ट्राला रामराम ठोकून गुजरातवासी होण्याच्या तयारीत आहेत, याची कुणाला खंत नाही. सरकारदरबारी तर यावर साधकबाधक चर्चाही होताना दिसत नाही. मराठी माणसाची अस्मिता ही केवळ त्याच्या भाषेपुरतीच आहे का? बरं, ती तशी असेल तर मग तुम्ही निदान तुमच्या भाषेसाठी तरी नेमकं काय केलंय. मराठीला साधा अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्यायलाही मराठी बाणा पुरा पडला नाही. सरकारने आयोजित केलेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात पुढे बसण्यासाठी पाहुणे शोधावे लागावेत, इतके ते आपले आपल्या मायमराठीवरचे प्रेम. मग पैसे मोजून विमानतळाची मालकी मिळवणाऱ्या गुजराती माणसाने विमानतळावर गरबा केला, तर आपल्या दु:खास कारण ते काय? मराठी जनांच्या अहंमन्य मेंदूस नेमका राग कशाचा येतोय? मराठी माणूस ढोलकीच्या नादाने खुळावतो, पंजाबी भांगड्यावर ताल धरतो आणि गुजराती गरब्यावर डोलतो; पण तरीही मग मुंबईवर गुजरातचे अतिक्रमण मराठी मनाला सोसवत नाही. आपल्या जायबंदी अस्मितेच्या जखमेवर गरब्याचे मीठ टाकल्यासारखं मराठी मन अदानीच्या गरब्याने तळमळून उठलं. काहींना मळमळही झाली. त्यांनी गरब्याला झिंगाटने प्रत्युत्तर देण्याची भाषा केली. हरकत नाही, पण मुद्दा काय, अदानीने विमानतळ ताब्यात घेतला हे जर सहन होत नसेल, तर तुमच्याकडे आहे का कोणी खमका मराठी उद्योजक जो त्याला आव्हान देऊ शकेल. प्रश्न साधा आहे, पण उत्तरासाठी अजून वाट पाहायला लागेल. इतक्‍यात तोंडावर मारून फेकता येईल, असे उत्तर आपल्याकडे नाही. काही मोजके मराठी उद्योजक मोठ्या स्वप्नांना गवसणी घालण्याचा प्रयत्न करताना दिसतात; पण त्यासाठी मराठी माणसाची स्वतःची अशी कुठलीही तयारीची रूपरेषा नाही. आपल्या अभ्यासक्रमांपासून ते घरात आपण आपल्या मुलांवर करत असलेल्या संस्कारांपर्यंत कुठेही, कुणीही मराठी माणूस आपल्या मुलांना तू उद्योजक हो, असे स्वप्न पाहायला सांगत नाही. मग आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? मोठे होण्यासाठीची मेहनत सोडाच, तशी स्वप्नं पाहायलादेखील मराठी माणूस घाबरतो. आमचे सरकारदेखील मराठी माणसाला कुठले स्वप्न दाखवते, तर ते झुणका-भाकर आणि वडापावच्या गाड्या टाकण्याचे. आमच्या घरापासून ते मंत्रालयापर्यंतच्या प्रवासात कुठेही मोठ्या स्वप्नांची जागा आपण तयार केली नाही, तर उरलीसुरली मुंबईदेखील आपल्या हातातून जाईल. मुंबई आणि गुजरातचा वाद काही आजचा नाही. त्याला इतिहास आहे, त्यामागे राजकारण आहे आणि षड्‌यंत्रदेखील. मुंबई कुणाची या प्रश्नाला "आमची मुंबई' हे उत्तर मिळवून देण्यासाठी जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. त्यांच्या बलिदानावर मुंबई आपण जिंकली; पण ती आपल्याला टिकवता मात्र आली नाही. म्हणूनच "मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची' म्हणेपर्यंत त्यांची मजल गेली. स्वतः मात्र धंद्याची औपचारिक भाषा म्हणजे गुजराती, असे ब्रॅंडिंग ते करतात. आपल्यालाही हे सर्व करण्यापासून कुणी रोखले नव्हते, नाही.

शेजारचे गुजराती, उत्तर प्रदेश, बिहारमधून आलेले भय्ये कुणी बाहेरचे नाही, हे सर्व आपल्या एकाच मातीतले. कुणाची माती काळी आहे, तर कुणाची लाल; एवढाच काय तो फरक. पण प्रत्येकाने स्वत:ची दिशा ठरवली आणि मेहनतीवर त्या दिशेने ते धावत सुटले. मराठी माणूसही धडपडतोय; पण त्याची दिशा चुकतेय का, याचा विचार करण्याची गरज आहे. उठाओ लुंगी बजाव पूंगी, खळ्ळ-खट्याक करून आपल्याला त्यांना घाबरवता येईल; पण त्यांना खरे उत्तर द्यायचे असेल, तर निखळ स्पर्धेत उतरावे लागेल. नाही तर शाहीर साबळे म्हणतात, तसे "पुसला राहिली टिकली, आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली', असे होईल.

- राहुल गडपाले

rahulgadpale@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com