Sharad Pawar : "शरद पवारांची चावी कुठेही चालते" ; शिंदे सरकारमधील मंत्र्यांचे विधान! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ncp sharad pawar

Sharad Pawar : "शरद पवारांची चावी कुठेही चालते" ; शिंदे सरकारमधील मंत्र्यांचे विधान!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची चावी कुठेही चालते, असं वक्तव्य शिंदे सरकार मधील मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. शरद पवार कलाकार आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बंडखोर नेचे संजय पवार विजयी झाले. याबद्ल गुलाबराब पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

पवार हे कलाकार आहेत. शेवटी ते पवार आहेत. शरद पवार कसे चावी देतात. कधी ही चावी दे, तर कधी ती चावी दे. शरद पवारांची चावी कुठेही चालते. त्यांनी बरोबर काँग्रेसवाले पटवले. उठोबा-बठोबाचा एक माणूस पटवला आणि अशी मिसळ तयार झाली.

जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपद निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला आहे. पक्षाचे संजय पवार यांनी बंडखोरी करीत उमेदवारी दाखल केली होती. त्यांनी ‘राष्ट्रवादी’चे ॲड. रवींद्र पाटील यांचा पराभव करून अध्यक्षपदी विजय मिळविला. शिवसेना शिंदे गट, भाजप व शिवसेना ठाकरे गटाच्या एका संचालकानेही त्यांना मदत केली होती.

अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. त्याला सूचक गुलाबराव देवकर, तर अनुमोदक नाना राजमल पाटील होते. मात्र राष्ट्रवादीचेच संजय पवार यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

‘राष्ट्रवादी’त पवारांची बंडखोरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीची बैठक घेण्यात आली होती. त्यात अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या चार जणांपैकी ॲड. रवींद्र पाटील यांचे नाव एकमताने निश्‍चित करण्यात आले. मात्र संजय पवार यांनी आपल्याला संधी मिळावी, अशी मागणी कायम ठेवत बंडखोरी करून आपली उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे याच ठिकाणी पक्षाला धक्का बसला.

शिवसेना शिंदे गट भाजपची साथ

संजय पवार यांच्या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाच्या पाचही संचालकांनी तर भाजपच्या एका व शिवसेना ठाकरे गटाच्या एका संचालकांनी साथ दिली. त्यामुळे पवार यांच्या मताची संख्या आठ झाली होती. विजयासाठी त्यांना तीन मतांची आवश्‍यकता होती. कारण महाविकास आघाडीकडे तब्बल १३ मते होती. यात राष्ट्रवादी काँग्रेसची नऊ, शिवसेना ठाकरे गटाचे एक, काँग्रेसची तीन अशी मते होती.