पुणे - राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील शून्य ते १८ वयोगटातील १ कोटी ९९ लाख बालके व मुलांची आरोग्य तपासणी करण्याचा व त्यांच्यावर उपचार व शस्त्रक्रिया करण्याचा महत्वकांक्षी उपक्रम हाती घेण्यात येणार आहे.
त्यामध्ये राज्यातील १ लाख १० हजार अंगणवाडीतील ७१ लाख ८४ हजार बालके तर ८५ हजार ७७३ निमशासकीय, शासकीय शाळांमधील १ कोटी २७ लाख मुला-मुलींची तपासणी करण्याचा मानस आहे. राज्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाकडून ही तपासणी मोहीम राबवण्यात येणार असून त्याची सुरवात २८ फेब्रुवारीपासून पुण्यात होणार आहे.
बालके व मुलांची ही तपासणी अंगणवाडी, शासकीय शाळांमध्ये करण्यात येईल. यामध्ये बालकांत आढळणारे आजार, व्यंग, जीवनसत्त्वांची कमतरता तसेच किशोरवयीन समस्या त्या अनुषंगाने ही तपासणी होईल. त्यासाठी त्या-त्या जिल्ह्यातील व शहरातील ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) पथकातील महिला व पुरुष वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व औषध निर्माण अधिकारी यांचा समावेश आहे.
या तपासणीमध्ये ज्या मुलांना उच्च स्तरीय उपचार व शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. त्यांना जवळील वैद्यकीय महाविद्यालये, मनपा रुग्णालये, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत योजना अंतर्गत अंगीकृत रुग्णालयांत संदर्भित करण्यात येतील. याबाबतचे पत्र कुटुंब कल्याण, माता व बालसंगोपन व शालेय आरोग्याच्या अतिरिक्त संचालक डॉ. बबिता कमलापूरकर यांनी सर्व जिल्हा, शहराच्या आरोग्य विभागांना दिले आहे.
पुण्यातून मोहिमेला सुरवात
या तपासणी मोहिमेची सुरवात पुण्यातून शुक्रवारी होत आहे. औंध येथील इंदिरा गांधी मॉडेल स्कूल येथे सकाळी उद्घाटन होणार आहे. यावेळी शहरातील ९ शाळांमधील बालके व मुलांना देखील आमंत्रित केले आहे.
माजी आरोग्यमंत्री यांचा गिरवला कित्ता
वास्तविक पाहता ही तपासणी प्रत्येक जिल्ह्यांतील पथकाकडून सातत्याने होत असते. परंतु, गेल्या सरकारमधील आरेाग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्यातील वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांच्या आरोग्य तपासणी करण्याच्या विविध मोहिमा आखल्या होत्या व त्यातून कोटयावधी तपासण्या झाल्याचे कागदोपत्री का होईना दाखवले होते. आताचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर देखील सावंत यांचाच कित्ता गिरवत असल्याचे दिसून येत आहेत.
काय करणार तपासणी?
– प्रत्येक बालकाची डोक्यापासून तळपायापर्यंत सविस्तर वैद्यकीय तपासणी करण्यात यावी
– वजन व उंची घेऊन बॉडी मास इंडेक्स (६ वर्षावरील बालकांमध्ये) काढावेत
– आवश्यकते नुसार विद्यार्थ्यांचा रक्तदाब, तापमान मोजावे
– नवजात बालकांमधील जन्म जात व्यंग ओळखून आवश्यकतेनुसार उपचार
– रक्तक्षय, डोळ्यांचे आजार, गलगंड, दंतविकार, हृदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, कर्करोग, दमा, इपिलेप्सी (फीट येणे) या आजारांच्या संशयित रुग्णांना ओळखणे
–ऑटीझम, विकासात्मक विलंब ई. च्या संशयित रुग्णांना ओळखणे
– किशोरवयीन मुला-मुलींमधील शारीरिक, मानसिक आजार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.