
आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणी चौघांना अटक
पुणे : आरोग्य भरती परीक्षेत गट क संवर्गातील पेपरफुटी प्रकरणी आंबेजोगार्इ मनोरुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना दोन मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Health Department Recruitment Fraud Case)
महेश सत्यवान बोटले (वय ५३, रा.मुंबई), लातूर सार्वजनिक आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत व्यंकटराव बडगिरे (वय ५०), आंबेजोगार्इ मनोरुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप त्रिंबकराव जोगदंड (रा. बीड) आणि श्याम महादू मस्के (वय ३८, रा. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. या आरोपींना यापूर्वी आरोग्य भरती परीक्षेत गट ड संवर्गातील पेपरफुटी प्रकरणी अटक करण्यात आली होती. याबाबत दाखल असलेला हा दुसरा गुन्हा आहे. मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
हेही वाचा: युक्रेनमध्ये अडकले असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन
अटक आरोपी हे आरोग्य विभागातील उच्च पदस्थ अधिकारी असून त्याच्याकडे संबंधित विभागाच्या उमेदवार भरती प्रक्रियेची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र आरोपींनी त्यांना दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून भरती प्रक्रियेतील गोपनीयतेचा भंग करून त्यांच्या ताब्यात असणाऱ्या प्रश्नपत्रिका परीक्षेपुर्वीच त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने कट रचून, फोडून त्या उमेदवारांपर्यंत पोचवल्या आणि आर्थिक लाभ मिळवला, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे.
हेही वाचा: बारामती : लाचप्रकरणी वडगाव निंबाळकरचे दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात
आरोपींनी त्यांच्या जबाबदारीत असणाऱ्या प्रश्नपत्रिका परीक्षेपुर्वीच फोडून त्या पेनड्राईव्हव्दारे त्यांच्या साथीदारांमार्फत उमेदवारांना पुरवली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याबाबत तपास करून तो पेनड्राईव्ह हस्तगत करायचा आहे. आरोपींनी परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या छापील अथवा हस्तलिखित प्रती काढल्या आहेत का? त्या काढल्या असतील तर कशा याबाबत तपास करायचा आहे. आरोपींनी अशा फोडलेल्या प्रश्नपत्रिका किती उमेदवारांना दिल्या आहेत याबाबत तपास करून उमेदवारांची नावे निष्पन्न करण्यासाठी आरोपींना आठ दिवसांची पोलिस कोठडी देण्याचा युक्तिवाद सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केला.
Web Title: Health Deaprtment Fraud Recruitment Two Arrest
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..