आरोग्य मंत्री टोपे : सर्वच जिल्ह्यात टेली-आयसीयू सुरू करण्याचा विचार, सोलापूर, जालना आणि औरंगाबाद येथे टेली आयसीयूचे ऑनलाईन लोकार्पण 

प्रमोद बोडके
Sunday, 6 September 2020

भिवंडीत पहिल्यांदा टेली आयसीयू सुरू

टेली आयसीयूमुळे कोरोनाच्या व इतर रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी चांगला उपयोग होत आहे. भिवंडीत मागील महिन्यात पहिल्यांदा टेली आयसीयू सुरू केले. त्याठिकाणी रुग्णांना चांगला फायदा होत आहे.

सोलापूर : अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी होण्यास मदत होत आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी टेली आयसीयू संपूर्ण राज्यात सुरू करण्याचा विचार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. सोलापूर, जालना आणि औरंगाबाद येथे टेली आयसीयूच्या ऑनलाईन लोकार्पणप्रसंगी श्री. टोपे बोलत होते. 

यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त एन. रामस्वामी, आरोग्य सेवा संचालनालयाच्या संचालक डॉ साधना तायडे, मेड स्केप इंडियाच्या संस्थापक आणि वुई डॉक्‍टर कॅम्पेनच्या डॉ. सुनिता दुबे, सीआयआय फाउंडेशनचे बी. थायगाराजन, डॉ. संदीप दिवाण, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, औरंगाबाद आणि जालन्याचे जिल्हा शल्यचिकित्सक, आयसीयू प्रमुख यांची ऑनलाईन उपस्थिती होती.

श्री. टोपे म्हणाले, मेड स्केप इंडियाच्या मदतीने राज्यात सहा ठिकाणी टेली आयसीयू सुरू आहेत. यांचे काम उत्कृष्ट सुरू आहे. टेली आयसीयूद्वारे कोरोनाच्या काळात रुग्णांना विविध तज्ञांचा सल्ला मिळत आहे. अनेक ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक आणि अधिष्ठाता यांनी टेली आयसीयूचे काम उत्कृष्ट सुरू ठेवले आहे. याचा अत्यवस्थ रुग्णांना लाभ होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून संपूर्ण राज्यात टेली आयसीयू सुरू करण्याचा विचार आहे. 
टेली आयसीयू हे नवीन तंत्रज्ञान आहे, यामुळे आणखी प्रशिक्षणाची गरज आहे. कोरोना रुग्णांना इतर औषधे दिली जात आहेत. टेली आयसीयूमुळे कोणत्याही प्रकारच्या रुग्णांना सर्वोत्तम डॉक्‍टरचा सल्ला घेता येतोय, ग्रामीण भागात याचा उपयोग झाला पाहिजे. यामध्ये आणखी काही सुधारणा अपेक्षित असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.

डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. शुभलक्ष्मी जैस्वाल यांनी सोलापुरातील कोरोना रुग्णांची स्थिती मांडली. टेली आयसीयूचा चांगला उपयोग होत असून तज्ज्ञांचे मार्गदर्शन होत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. वैभव लाडे यांनी सोलापुरात टेली आयसीयूचे काम कसे चालते याबाबत माहिती दिली. इथे 15 बेड संशयित कोविड रुग्णांसाठी आहेत. इथले डॉक्‍टर दिल्ली येथील तज्ज्ञ डॉक्‍टरशी कॅमेरा आणि टीव्हीच्या माध्यमातून संपर्क साधून रुग्णांवर उपचार करीत आहेत. सर्वांची मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले.

या ऑनलाईन कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुनिता दुबे यांनी केले. त्यांनी टेली आयसीयू आणि नवीन तंत्रज्ञान याबाबत माहिती दिली. वेळोवेळी डॉक्‍टर रुग्णांना वेळ देत आहेत. वुई डॉक्‍टर कॅम्पेनशी दहा हजार डॉक्‍टर जोडले गेले आहेत. सर्व डॉक्‍टर कोरोना योध्दा म्हणून काम करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कॉर्डिओलॉजिस्ट डॉ. मोहसीन वली यांनी आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Health Minister Tope: The idea of starting tele-ICUs in all districts, online launch of tele-ICUs in Solapur, Jalna and Aurangabad