कोपरगाव, येवल्यात धो-धो पाऊस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

राज्यातील पाऊस

  • मराठवाड्यातील ५८ तालुक्यांत पावसाची हजेरी
  • नगर जिल्ह्यातील ११ महसूल मंडळांत जोरदार पाऊस
  • नाशिक जिल्ह्यात येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यांत पाऊस
  • कोल्हापूरच्या गगनबावडा, भुदरगड, कागलमध्ये मुसळधार सरी 
  • वऱ्हाडात बुलडाणा, वाशीम, अकोला जिल्ह्यांत मध्यम पाऊस

पुणे - कोकणानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. औरंगाबाद जिल्हा, नगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता, नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने येथे नुकसानही झाले, येथे नदी-नाले दुथडी भरून वाहिले. उशिराचा मॉन्सून आणि वायू चक्रीवादळाने गायब झालेल्या बाष्पानंतर पुन्हा एकदा वरुणराजाच्या काही भागांतील जोरदार एंट्रीने बळिराजाला धीर आला आहे. 

कोपरगाव, येवल्यात धो-धो पाऊस
येवला तालुक्यातील निमगाव मढ या गावात अतिवृष्टी झाली. गावाच्या पूर्व भागातील मंडपी नाल्यावरील १९९२ साली झालेला वाणी बंधारा पाणी साचून फुटला. यामुळे येथील शेतकऱ्यांच्या चाळीतील कांदा मोठ्या प्रमाणावर पावसाच्या पाण्यात वाहून गेला.शेतकरी सयराम लभडे यांच्या कांद्याच्या चाळीसह दोन गायी वाहून गेल्या. त्यात एक गाय सापडली आहे. 

कोल्हापूर पेरण्यांना गती येणार 
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात शनिवारी सायंकाळी एक ते दोन तास चांगला पाऊस झाला. त्यामुळे या भागात समाधान आहे. गगनबावडा, भुदरगड, कागल तालुक्‍यांत पावसाच्या चांगल्या सरी कोसळल्या. या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती येणार आहे.

वऱ्हाडात पावसाळी वातावरण
वाशीम जिल्ह्यात सर्वत्र, बुलडाणा जिल्ह्यातही काल घाटावरील तालुक्यांमध्ये पाऊस झाला. अकोला जिल्ह्यात पातूर, बाळापूर, अकोट, तेल्हारा या तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात सार्वत्रिक स्वरूपात पाऊस झाला. 

अकोटला केळीचे नुकसान 
अकोला : आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त असलेल्या केळी उत्पादकांना शनिवारी रात्री झालेल्या वादळ व पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. अकोट तालुक्यातील विविध गावांतील केळी पिकांचे नुकसान झाले.

पुणतांब्यात धोधो पाऊस
राहाता (जि. नगर) तालुक्यातील पुणतांबे परिसरात शनिवारी रात्री सुमारे दीड तास धोधो पाऊस पडला. वादळ, जोराचा पाऊस असल्याने काही ठिकाणी झाडे पडली. तर काहींच्या घरात पाणी शिरले. या पावसाने ओढे नाले तुडुंब भरले आहेत. 

कोपरगावात अतिवृष्टी
नगर जिल्ह्यातील शनिवारी-मध्यरात्री कोपरगाव, नेवासा, कर्जत, राहुरी, शेवगाव, नगरसह सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. अकरा महसूल मंडळांत चांगला पाऊस झाला. कोपरगाव मंडळात सर्वाधिक ब्राह्मणगाव येथे १३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rain in Kopargaon and Yeola Maharashtra Monsoon